संवेदनांचा सखा

अतुल क.तांदळीकर 
सोमवार, 31 डिसेंबर 2018

जिथे संवेदना आहेत तिथे आपुलकी, स्नेह आणि मित्रता आहे. आजकाल समाजात हे हरवल्याचे चित्र वरवर जरी दिसत असले तरी, या संवेदनांमुळेच मानवी जीवनातील वाटचाल प्रगल्भ होत असते हे कित्येकदा स्पष्ट झाले आहे. चित्रपट माध्यम हे प्रभावशील आहे. भारतात सत्यजीत रे, ऋत्विक घटक, बिमल रॉय, मृणाल सेन यांनी ही कामगिरी चोख पार पाडली. यातील मृणाल सेन यांचेही परवाच निधन झाले. आपल्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी समाजातील संवेदनांचं शब्दावाचून चित्रण केलं आणि ते संवेदनशील माणसाशी नेहमी बोललं भविष्यातही बोलत राहील ...

माणूस हा मूळात संवेदशनील असतो. परिस्थीतीनुरूप त्याच्यातील बदल होत असतात. आजचा काळ हा धकाधकीचा असला तरी समाजात संवेदनशीलता जिवंत आहे. तिची रूपं वेगळी आहेत. रातभोर, बाईशे-श्रावण, आमार भुवन शोम अशा चित्रपटातून त्यांनी वास्तववाद मांडला. सहसा चित्रपट माध्यमाकडे करमणूकीचे साधन म्हणून बघणाऱ्यांना त्यांच्या या कलाकृतीचा तिटकारा येणे स्वाभाविक आहे. मात्र वास्तवादी साहित्यापेक्षा हे माध्यम किंचीत प्रभावी असल्याने त्यांच्या अशा कथानकांचा जागतिक पातळीवर गौरव झाला.

माणसाचं दु:ख अगदी सहजपणे आहे. तसं साकार करणं ही कला त्यांना अवगत होती. दु:ख मांडल्याने आणि ते मन मोकळं केल्याने हलकं होतं हा स्थायीभाव ते जाणून होते.त्यांच्या चित्रपटातून हे नाविन्यपूर्ण,कल्पकतेने मांडून त्यांनी एक वेगळी शैली अंगिकारली होती. ती चित्रपटसृष्टीतील काही मोजक्‍याच दिग्दर्शकांकडे आहे. दु:खाचा अतिरेक किती असावा यालाही काही मर्यादा असतात, पण जगातील काही प्रसंग आठवले तर अंगावर शहारा येईल असे त्याचे आक्राळ विक्राळ स्वरूप असते. इंडोनेशियातील भूकंप, त्सुनामी अनुभवलेल्यांचे विश्‍व आज असेच संवेदनशील आहे. आपल्या देशात असे रोज एक तरी विपरित आक्रीत घडत असते, त्याच्या सभोवतालचा परीघ हा अतिशय संवेदनशील असतो. ज्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळतो त्याच्या सभोवतालचं विश्‍व कालानुरूप कमी होत असलं तरी त्याला आलेला हा अनुभव जीवनातील न विसरण्याजोगा प्रवास असतो. हे सर्व त्यांच्या चित्रपटात नेमकेपणानं मांडल्याने त्यांच्यावर देशातील लोकांच्या दु:खांचे, वेदनेचे प्रदर्शन मांडणारे म्हणून आरोपही होत गेलेत, मात्र मृणालदांनी याला दाद दिली नाही. या सर्व घडामोडींना कलाकृतीत सामावून घेत त्यांनी त्यांच्या कृती अजरामर केल्यात. 

बिमलदांच्या दो गज जमीन के नीचे चित्रपटातील प्रसंग आठवा. जगणं कितीही समृध्द होत असलं तरी नेमकं जगण्याचं बळ कसं आणायचं आणि हा जीवन संघर्ष कसा जगायचा हे अतिशय कल्पकतेने सांगण्यात या दिग्दर्शकांनी आपली हयात घालविली. मृणालदांनी देखील अनेक कलाकृतीतून नेमकं हेच वास्तव मांडलं आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात अशी दु:ख एकमेकांकडे व्यक्‍त करायला कुणाला वेळ नाही, त्यामुळे संवेदनशीलता हरवत चालल्याचे आरोप होत असतात, यावर वेगळे मंथन केल्या जाऊ शकते, मात्र मानवी जीवनातील संवेदनशीलतेला त्याचे प्रदर्शन न करता कल्पकतेने कलात्मकरित्या सादर केल्यास त्याचा पुढच्या पिढीतील संवेदनशील लोकांना लाभ होणारच आहे हे विसरून चालणार नाही. अन्यथा सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे ज्यांच्यावर दूषणं लावले जाते त्या पिढीतील लोक जेव्हा चार्ली चॅपलीनच्या व्हीडीओजना आजही यु ट्यूबर पसंती देतात. तेव्हा संवेदनशीलता अजूनही संपली नसल्याचे लक्षात येते. मृणाल सेन यांनी ती आपल्या अजरामर कलाकृतीतून अधोरेखित केली आहे. त्यांच्या या कलाकृतींना आपण जपलं पाहिजे. संवेदनांचा सखा असलेल्या या कलाकाराचा आपल्या मनात सदैव गौरवच केला पाहिजे.त्यांच्या या चित्रपटांना जपलं पाहिजे. दु:ख न झेपणाऱ्यांना ते समजाऊन सांगितलं पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensitive Mrunal sen