कोरोना काळातील लैंगिक आरोग्य! जागरुकता आणि सजगता गरजेची

dil final
dil final

सध्या कोरोना संक्रमणाचा काळ आहे. जगभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच आहे. म्हणून ‘कोरोना काळातील लैंगिक आरोग्य’ या विषयावर चर्चा करू.
गेल्या 50 दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सगळे आपल्या घरीच आहेत. केवळ जीवनावश्यक सामानाची खरेदी करण्यास बाहेर पडत आहेत. अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ पण सुरू आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये निम्न मध्यमवर्गीय नागरिकांसमोर अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. त्यांना मानसिक, सामाजिक, कौटुंबिक आणि महत्त्वाचे म्हणजे आर्थिक प्रश्‍न भेडसावत आहे. अशा वेळी अनेकांचे लक्ष आपल्या वैवाहिक जीवनाकडे जात देखील नसेल...! मात्र, वैवाहिक नात्यात आपण चर्चा केल्याप्रमाणे शारीरिक संबंध फार महत्त्वाचे असतात. किंबहुना ते सुरळीत असतील तर अन्य समस्यांना प्रतिबंध होऊ शकतो. त्यामुळे आपण कोरोनाच्या काळात लैंगिक स्वास्थ्य कसे ठेवावे, यावर या लेखात चर्चा करणार आहोत.
कोरोना काळात पती-पत्नी दोघेही घरातच असल्याने दोघांमध्ये सेक्स अधिक होत असावा, असा एक सर्वसाधारण समज आहे. सतत घरी असल्याने संबंधांची इच्छा जास्त होऊ शकेल अथवा खूप जवळ असल्याने संबंधांची इच्छा कमी देखील होऊ शकते. याशिवाय लैंगिक संबंधांमध्ये वय, स्त्री/पुरुष, अस्तित्वाच्या चिंता, आर्थिक नुकसान आणि घरातील समस्या (छोटे घर व मिळणारा एकांत) या सगळ्यांचा विचार होणे आवश्यक आहे. याशिवाय एलजीबीटी लैंगिक अल्पसंख्यकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असावे. अविवाहित लोकांमध्ये सुद्धा समस्या असू शकतात. आपल्या प्रियकर-प्रेयसीची भेट न झाल्याने मानसिक व लैंगिक उपासमार होत असते. मात्र, यात वाहून न जाता यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अशात लैंगिक भावना उद्दीपित झाल्यास हस्तमैथूनाचा आधार घेतल्यास काहीही हरकत नाही. येथे आपण समजून घेतले पाहिजे की, हस्तमैथूनामुळे स्त्री अथवा पुरुषांच्या आरोग्यावर कुठलाही विपरित परिणाम होत नाही. किंबहुना लैंगिक भावना उद्दीपित झाल्यानंतर त्यास या प्रकारे वाट मोकळी करून दिली तर मन शांत होऊ शकते.
लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून जे जोडीदार एकमेकांपासून दूर राहत आहेत, त्यांनी देखील अविवाहित स्त्री-पुरुषांसाठी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा. मात्र, जे सोबत राहत आहेत, त्यांनी आपल्या लैंगिक भावना समजून घेऊन लैंगिक संबंधांमध्ये रममाण व्हायला हवे. ज्यांच्या लैंगिक इच्छा कमी अथवा जास्त असतील, त्या त्यांनी सामंजस्याने सोडवायला हव्यात. काही व्यक्तींना लैंगिक समस्या देखील आधीपासून असू शकतात; मात्र, त्यामुळे त्यांनी लैंगिक संबंध करणे बंद करू नये. किंबहुना काही अपेक्षा न ठेवता एकमेकांसोबत प्रणय करणे गरजेचे आहे. हा प्रणय संभोगामध्ये रुपांतरित होईलच ही अपेक्षा न ठेवता त्यांनी हा प्रणय केला, तर मानसिक कारणांनी उद्भवलेल्या लैंगिक समस्या आपोआप सुटू शकतात.  तरी देखील समस्या न सुटल्यास योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जर दोन्ही जोडीदार घरीच राहत असतील, बाहेर जात नसतील, तर त्यांनी एकमेकांशी संबंध ठेवल्यास काही हरकत नाही; त्यांना एकमेकांपासून कोरोना होण्याचा धोका नाही. मात्र, ज्या स्त्रिया अथवा पुरुष कामासाठी बाहेर जातात, त्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, कोरोनाच्या प्रादुर्भावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, शारीरिक दुरीच्या नियमांचे पालन करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, चेहर्‍याला हात न लावणे, बाहेरून आल्यावर कपडे धुण्यास टाकणे, अशा बाबी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते. दरम्यान एक वृत्त व्हायरल झाले होते की, विर्यामध्ये कोरोनाचे विषाणू आढळले...! मात्र, कुठल्याही वैद्यकीय अथवा जागतिक आरोग्य संघटनेने सेक्स टाळा असा सल्ला दिलेला नाही. त्यामुळे कोरोना लैंगिक संबंधातून पसरतो असे म्हणता येणार नाही. पण संबंधांसाठी जवळीक साधल्याने फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमाचा भंग होतो. त्यामुळे या दिवसांमध्ये मुख मैथून, गुदा मैथून, चुंबन घेणे या गोष्टी टाळायला हव्या.
आपण स्वतःचे सर्वात सुरक्षित जोडीदार असतो अथवा ज्या जोडीदारासोबत आपण घरी राहतो तो सर्वात सुरक्षित जोडीदार. बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीसोबत या काळात संबंध करणे धोकादायक ठरू शकते. संबंध करताना निरोध वापरणे गरजेचे आहे. कारण या काळात विवाहित व्यक्तींनी सुद्धा गर्भधारणा ठेवायची की नाही यावर विचार करणे गरजेचे आहे.  सेक्सच्या आधी आणि नंतर आपल्या जननेंद्रियांची स्वच्छता राखली पाहिजे. जोडीदाराला अथवा स्वतःला सर्दी, खोकला, ताप असेल तर संबंध करणे टाळावे. तुमचा जोडीदार आरोग्य सेवक असेल तर त्याच्या कामाचे स्वरुप बघून आणि आपल्याला काय धोका आहे, हे पडताळूनच सेक्स करावा.
या काळात लैंगिक अत्याचार होण्याची पण शक्यता असते. विशेषतः लहान मुले पण अशा अत्याचाराला बळी पडू शकतात. त्यामुळे पालकांनी आपल्या बालकांकडे विशेषत्वाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर मुलं काही सांगू इच्छित असतील तर ते ऐकून घेतले पाहिजे. म्हणूनच या काळात लैंगिकतेबद्दल सजग असणे हे स्वतःसाठी व सगळ्या कुटुंबासाठी आवश्यक आहे हे लक्षात ठेवावे. या दिवसांतील सगळ्यात मोलाचा सल्ला पुन्हा सांगतो, ‘घरातच रहा व सुरक्षित  रहा...!’
...........................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com