शास्त्री गेले... द्रविड आले ! ravi shastri rahul dravid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ravi shastri and rahul dravid
शास्त्री गेले... द्रविड आले !

शास्त्री गेले... द्रविड आले !

sakal_logo
By
शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

गुणवत्ता आणि क्षमता असलेला कलाकार रंगमंचावर कितीही प्रभावीपणे आपली अदाकारी सादर करत असला तरी पडद्यामागचा कला दिग्दर्शक तेवढाच महत्त्वाचा असतो. त्या कलाकाराचा आत्मविश्वास उंचावण्यापासून छोट्या छोट्या प्रसंगांनेही मैदान कसे मारायचे हे तो दिग्दर्शक शिकवत असतो आणि या टीमवर्कचा परिणाम रंगमंचावर अफलातून नाट्य सादर होत असतो. खेळाच्या मैदानवरही असेच घडत असते. रंगमंचाच्या ठिकाणी भव्य मैदान असते. पात्र बदलतात पण टीमवर्क तेच असते. कधी कधी दिग्दर्शक बदलला तरी त्याने आखून दिलेली दिशा, नवी जबाबदारी घेणारी व्यक्ती, सन्मान कायम राखण्यासाठी आपले खांदे बळकट करत असते....

भारतीय क्रिकेटच्या रंगमंचावर असाच मोठा बदल झाला आहे. शास्त्री मास्तर गेले आणि द्रविड गुरूजी आले. असा बदल कधी न कधी तरी होणार होता. फरक पडला तो कोणत्या वेळेत हा बदल झाला याचा ! इंग्रजीमध्ये अशा बदलला ट्रान्झिशन असे म्हणतात. खेळाच्या भाषेत सांगायचे तर `बॅटन पास झाला` रिलेच्या शर्यतीतून हा शब्द रुढ झाला, पण हा बॅटन एका धावपटूकडून दुसऱ्या धावपटूकडे, योग्य क्षणी आणि पास होतो तेव्हा टीमचा वेग कायम राहातो आणि प्रगतीचा आलेख चढताच राहातो. रवी शास्त्री आणि राहुल द्रविड दोघेही भारतीय क्रिकेटमधील प्रतिथयश खेळाडू असताना `ऑडी`ची मालकी स्वकर्तृत्वाने मिळवलेल्या शास्त्रीं यांनी टीम इंडियाचे मास्तर म्हणून उमटवलेला ठसा कायमस्वरुपी प्रेरणा देणारा आहे. पण त्यापेक्षा भारतीय संघाची बदललेली मानसिकता आणि विचाराबरोबर कोणाविरुद्धही लढण्याची दिलेली उर्जा आणि दिशा अफलातून आहे. यालाच आधुनिक मार्गदर्शन म्हणतात. `मी` पणाच्या अहंकाराला तिलांजली देऊन त्यांनी `आम्ही` हे बिरुद रुजवले. अपयशाचाही त्यांनी खुल्या मनाने स्वीकार केला. पण शेवटी शास्त्री आणि कोहली ही गुरू शिष्याची जोडी बीसीसीआयच्या शोकेसमध्ये आयसीसीची एकही ट्रॉफी आणू शकले नाहीत. हे तेवढेच सत्य आहे. शेवटी वार्षिक परीक्षेत मिळवलेल्या गुणांवर विद्यार्थ्याची हुशारी मोजली जात असते.

एकीकडे शास्त्री गुरुजींचा अध्याय संपत असताना द्रविड मास्तर आता टीम इंडियाचे दिग्दर्शक झाले आहे. खेळाडू म्हणून द्रविड यांची भिंत किती अभेद्य होती हे आपण सर्वच जण जाणतो, पण त्यांच्या विचाराची प्रगल्भता अनन्यसाधारण आहे. ज्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले त्या विद्यालयाने दिलेली मानद डॉक्टरेट ही पदवी आपण या पदासाठी आवश्यक असलेले शिक्षण घेऊ तेव्हाच मी हा सन्मान स्वीकारेन असे सन्मानपूर्वक सांगण्याचे काम केवळ द्रविडच करू शकतात.

अशी सभ्यता आणि प्रामाणिकपणा दाखवणारे द्रविड मुलाच्या शाळेत पालक म्हणूनच जातात आणि रांगेत उभे राहून मुलांच्या वैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी होतात...ही सभ्यता सर्वांसाठी आदर्श आहे. अशी व्यक्ती टीम इंडियाचे प्रशिक्षक कधीच होऊ शकली असती, परंतु पदासाठी थेट उडी मारण्यापेक्षा मी बालवर्गातून (ज्युनियर क्रिकेटपासून) प्रवास सुरू करेन असे विचार द्रविड यांनी पाच-सहा वर्षांपूर्वीच बोलून दाखवले होते. प्रशिक्षकपदाचा हा प्रवास बालवर्गातून सुरू करताना त्यांनी अनेक मोहरे घडवले, पिढीच तयार केली म्हणा ना. याच द्रविड यांना आदर्श मानणारे खेळाडू आता शिष्य म्हणून मुख्य संघात असणार आहेत.

भारतीय क्रिकेट संघ नाजूक वळणार असताना व्यवस्थापनात ही मोठा बदल होत आहे. केवळ राहुल द्रविडच नव्हे तर प्रशिक्षककांची सर्व टीम बदलणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत साखळीतच गारद होण्याचा प्रश्न नाही. पण त्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहे. २००७ मध्ये राहुल द्रविड भारतीय संघाचा कर्णधार असताना वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत सलामीला बांगलादेशकडून पराभूत झाला आणि साखळीतच आव्हान संपुष्टात आले होते. आता तेच राहुल द्रविड ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळीत आव्हान संपलेल्या संघाची जबाबदारी घेणार आहेत हा केवळ योगायोगच म्हणावा लागेल.

आयपीएलचे नियोजन योग्य हवे

आखातातील या स्पर्धेत लवकर गाशा गुंडाळल्यानंतर अतिक्रिकेटपेक्षा आयपीएलचा मुद्दा ऐरणीवर आला. माजी विश्वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी थेट देशहिताचा मुद्दा उपस्थित केला तर पायउतार झालेल्या रवी शास्त्री यांनीही भारतीय खेळाडू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकल्याची कबुली दिली. भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीची कारणे शोधली तर ती आयपीएलच्या नियोजनावर येऊन थांबतात. बीसीसीआयचे पदाधिकारी आयपीएलचे कितीही समर्थन करो, पण विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी आयपीएल नसती तर भारतीय संघाच्या कामगिरीत निश्चितच फरक पडला असता. विश्वकरंडकासारख्या स्पर्धांच्या अगोदर केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक विश्रांती आवश्यक असते त्याचा कसा परिणाम होतो याचे दुसरे उदाहरण म्हणजे वेस्ट इंडीजचा संघ. खरे तर ते गतविजेते होते. पण अगोदर मायदेशात कॅरेबियन लीग आणि आखातात आयपीएल खेळल्यानंतर विश्वकरंडक स्पर्धेत त्यांची कामगिरी खालावली. आयपीएलमध्ये नावालाच सहभाग असलेले किंवा ज्यांना आयपीएलमध्ये स्थान दिले जात नाही असे पाकिस्तानी खेळाडू मात्र विश्वकरंडक स्पर्धेत ताज्या दमाने कामगिरी करत आहेत.

जैव सुरक्षेचे आव्हान

कोरोनापूर्वीचे क्रिकेट आणि त्यानंतरचे क्रिकेट यात मोठा फरक पडला आहे. आता जैवसुरक्षा वातावरणात राहावे लागते अर्थात याचा मानसिकतेवर परिणाम होत असतोच. एवढ्यात तरी यातून सुटका नाही. हे सत्य स्वीकारूनच आता पुढे जायचे आहे.

वेगवेगळे संघ हाच पर्याय

राहुल द्रविड आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली एकत्र खेळले आहेत. गांगुलींच्या विनंतीला मान देऊनच द्रविड यांनी हे पद स्वीकारले आहे. भारतीय खेळाडूंच्या क्षमता आणि गुणवत्तेबाबत प्रश्नच नाही, मुद्दा आहे तो सततच्या क्रिकेटमधून मिळणाऱ्या विश्रांतीचा. भारतीय क्रिकेट सामन्यांचे काय तर आयपीएलचेही हक्क कोट्यवधींना विकले गेले आहेत त्यात आता बदल होणार नाही, पण सुवर्णमध्य साधायचा असेल तर कसोटी आणि मर्यादित षटकांच्या (५०-५०, टी-२०) प्रकारासाठी दोन संघ तयार करणे हाच पर्याय समोर आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असताना श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी दुसरा संघ खेळला आणि त्याचे प्रशिक्षक राहुल द्रविडच होते. त्यामुळे आता हाच प्रयोग द्रविड पुन्हा करू शकतात त्यामुळे प्रत्येकाला व्यवस्थित विश्रांती मिळू शकते आणि विश्वकरंडक स्पर्धांपूर्वी प्रमुख खेळाडू ताजेतवाने राहू शकतात. द्रविड हे जेवढे तांत्रिकदृष्ट्या महान खेळाडू होते तेवढेच ते अभ्यासू खेळाडू म्हणूनही प्रसिद्ध होते. ते नक्कीच नव बदल करतील यात शंका नाही. आखातातील हे अपयश पुढच्या यशासाठी मार्ग दाखवू शकेल हीच अपेक्षा.

loading image
go to top