प्रेरणादायी आयकॉन (शैलेश नागवेकर)

shailesh nagvekar
shailesh nagvekar

महिला क्रिकेटमध्ये अल्पावधीत सर्व पुरस्कार मिळवत उत्तुंग भरारी घेणाऱ्या सांगलीच्या स्मृती मानधनाची फोर्ब्जच्या अंडर 30 श्रेणीत अव्वल तीस खेळाडूंत निवड झाली. पुरुषप्रधान भारतीय क्रीडा संस्कृतीला स्मृतीच्या रूपानं आणखी एक आयकॉन मिळाला आहे. स्मृतीच्या या वाटचालीवर एक नजर...

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रीडा क्षेत्राचा चेहरा बदललाय. पुरुषांप्रमाणं महिलाही तितक्‍याच प्रयत्नपूर्वक स्वतःचं स्थान निर्माण करत आहेत. याच बदलांतून अनेक तारका भारतीय क्रीडा नभांगणात चमकू लागल्या आहेत. एकीकडं विराट कोहलीच्या नावाचीच चर्चा सगळीकडं सुरू असताना स्मृती मानधना हा ताराही तेवढाच तेजोमय झाला आहे. पुरुषांच्या क्रिकेटला मोठी परंपरा आहे, वातावरण आहे. मात्र, अशा वातावरणात सांगलीची एक मुलगी महिला क्रिकेटमध्ये पाऊल ठेवते काय आणि वर्षभरात गगनभरारी घेते काय, हे थक्क करणारं आहे. ही झेप महिला क्रिकेटला नवी चमक देतेच, शिवाय देशातील समस्त नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणाही बनत आहे.
महिलांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबाबत सांगायचं, तर पी. टी. उषानं महिला खेळाडूंसाठी आदर्श तयार केला. त्यानंतर बऱ्याच काळानंतर, सानिया मिर्झा, मेरी कोम, साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि आता स्मृती मानधना यांच्या नावाची चर्चा आहे! थोडा विचार केला तर लक्षात येतं, की मेरी कोमच्या ठोशाची गुंज जगभरात निनादल्यानंतर सानिया, साईना आणि सिंधू या सुपरस्टार महिला खेळाडूंनी एकमेकींना खो द्यावा अशा घटना पाठोपाठ घडल्या. त्याचे खेळ भले वेगवेगळे असतील; पण क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या देशातल्या समस्त मुलींना प्रेरणा मिळाली. एरवी पुरुषप्रधान असलेल्या आपल्या क्रीडा क्षेत्रात महिलांची ही प्रगती गौरवास्पद आहे.

मोबाईल पिढीलाही बोध
स्मृतीचा हा उदय आणखी एका दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आतापर्यंतचे अनेक आयकॉन मुंबई, हैदराबाद, दिल्ली अशा मोठ्या महानगरांतून तयार झाले; पण स्मृतीचा उदय सांगलीतून झाला. नैसर्गिक गुणवत्तेचा स्रोत अन्य शहरांतून आणि गावागावांतून तयार होत आहे आणि तो जोपासायला प्रोत्साहन मिळत आहे, हे विशेष. आत्ताची तरुण पिढी मोबाईलमय होत असताना स्मृतीसारखा आयकॉन तयार होणं हे क्रीडा क्षेत्रासाठीच नव्हे, तर सुदृढ भारतासाठीही महत्त्वाचं आहे.
महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताला उपविजेतेपद मिळालं. त्या संपूर्ण स्पर्धेत स्मृतीच्या गुणवत्तेचा प्रकाश तेजोयम झाला होता. अंतिम सामन्यात ती यशस्वी ठरली असती, तर इतिहास घडला असता हे नक्कीच; पण या स्पर्धेनंतर मायदेशी पतरणाऱ्या या महिला संघाचं मुंबईत झालेलं स्वागत अफलातून होतं. मुंबईत झालेल्या स्वागत समारंभात अर्थात मिताली राज, जुलन गोस्वामी आदी वरिष्ठ खेळाडूंवर प्रकाशझोत होता; पण त्यातही स्मृती ज्या आत्मविश्वासानं वावरत होती, त्यातूनच तिचा असामान्यपणा जाणवत होता. त्या घटनेला अजून दोन वर्षंही पूर्ण झालेली नाहीत. त्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर आठ महिन्यांनंतर महिलांचा संघ आंतराष्ट्रीय सामना खेळला. मध्येच काही द्विपक्षीय मालिका झाल्या, टी-20 चा विश्वकरंडक झाला. या सगळ्या संधी साधत स्मृतीनं थक्क करणारी प्रगती केली.
आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू, सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू, आयीसीच्या सर्वोत्तम टी-20 संघात स्थान, एकदिवसीय क्रमवारीतलं पहिलं स्थान, फोर्ब्जच्या यादीत पहिल्या तिसांत स्थान... हा स्मृतीच्या या प्रगतिपुस्तकातला चढता क्रम लक्षात घेता, ती येत्या काळात क्रांती घडवणार हे निश्‍चित.
मुंबईत गेल्या आठवड्यात प्रतिष्ठेच्या दोन पुरस्कारांचं वितरण झालं. त्यातला एक होता "स्पोर्टस स्टार' मासिकाचा आणि दुसरा शिवछत्रपती पुरस्कार वितरणाचा. या दोन्ही कार्यक्रमांत स्मृतीला पुरस्कार मिळाले. हे केवळ क्रिकेटविषयक पुरस्कार नव्हते- अन्य खेळांतही सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा त्यात समावेश होता. असे सोहळे वेगवेगळ्या खेळांतल्या खेळाडूंनाही स्पूर्ती देणारे असतात. याचवेळी पुलवामा हल्लात शहीद झालेल्या जवानांच्या आदरांजली वाहण्यासाठी विराट कोहली फौंडेशनचा पुरस्कार सोहळा विराटनं रद्द केला. या सोहळ्यातही स्मृतीनं बाजी मारली असती हे नक्कीच.

असा झाला स्मृतीचा उदय
अल्पावधीतच मोठी भरारी घेणाऱ्या आणि त्याहूनही अधिक मोठी झेप घेण्याची क्षमता असलेल्या स्मृतीचा उदय कसा झाला हे पाहणं औत्सुक्‍याचं आहे. स्मृतीचा भाऊ श्रवण स्थानिक क्रिकेट खेळायचा, त्यामुळं स्मृतीमध्येही क्रिकेटची आवड निर्माण झाली. भाऊ डावखुरा फलंदाज असताना स्मृतीही डावखुरी फलंदाज व्हावी हा योगायोगच. खेळ कोणताही असो, प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी जिद्द आणि मेहनत समान असते. आपणही क्रिकेट खेळायचं हा स्मृतीचा हट्ट फार काळ टिकणार नाही, असं तिच्या आई-वडिलांना सुरवातीला वाटलं, परंतु त्यावेळी आपल्याकडं एका स्टार खेळाडू तयार होत आहे हे उमजण्यासाठी त्यांनाही परीक्षा द्यावी लागली. मेरठजवळ झालेल्या, 19 वर्षांखालच्या स्पर्धेतला सामना पाहण्यासाठी ते स्मृतीला घेऊन गेले. खरं क्रिकेट किती मोठं असतं, हे पाहून तरी स्मृती क्रिकेटचं वेड डोक्‍यातून काढून टाकेल असं त्यांना वाटलं; पण प्रत्यक्षात त्याचा उलटा परिणाम झाला. स्मृतीचं वेड अधिकच पक्कं झालं. वयाच्या अकराव्या वर्षीच महाराष्ट्राच्या अंडर 19 संघात तिची निवड झाली. मात्र, अंतिम अकरात खेळायला मिळेल, या प्रतीक्षेतच दोन वर्षं गेली.

खेळ की अभ्यास?
स्मृतीला पुढं अखेर मोठ्या स्तरावरचं क्रिकेट खेळायला मिळालं. मात्र, त्यावेळी तिच्यासमोर दोन पर्याय होते. सायन्समध्ये करिअर किंवा क्रिकेट! सायन्सकडं वळलं, तर क्रिकेटला वेळ मिळणार नाही याची जाणीव आईला होती. स्मृतीनं क्रिकेटची निवड केली; पण इथंही तिच्या कुटुंबानं मुलीच्या निर्णयाला प्राधान्य दिलं. त्याच वर्षी बडोद्यात झालेल्या महिला आंतरराज्य अंडर 19 क्रिकेट स्पर्धेत स्मृतीनं गुजरात संघाविरुद्ध 224 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली आणि त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलं नाही. सन 2014 मध्ये महिलांच्या टी-20 विश्‍वकरंकड स्पर्धेसाठी स्मृतीची भारतीय संघात निवड झाली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्मृतीला बारावीची परीक्षा सोडावी लागली. अनेक तरुण खेळाडूंची कारकिर्द बहरात असताना शिक्षण की खेळ हा प्रश्न निर्माण होतो; पण योग्य समन्वय साधला, की यातूनही मार्ग काढता येतो. राहुल द्रविड, अनिल कुंबळे, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, जवागल श्रीनाथ असे काही दिग्गज आणि प्रथितयश खेळाडू उच्चशिक्षित आहेत हेसुद्धा लक्षात घ्यावं लागेल.

असा आहे स्मृतीचा खेळ
स्मृतीची शरीरयष्टी सर्वसामान्य आहे; पण तिच्या फटक्‍यातली ताकद आणि टायमिंग अफलातून आहे. जिथं काही खेळाडूंना चौकार मारणं कठीण जातं तिथं ही स्मृती सहजगत्या चेंडू प्रेक्षकांपर्यंत टोलवते. म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात आयपीएलच्या धर्तीवर खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतही तिला खास आमंत्रण दिलं गेलं आणि तिथंही तिनं वादळी खेळी केलेल्या आहेत. गुणवत्ता अनन्यसाधारण असेल आणि तिला फुलवण्यासाठी मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असेल, तर तीन मुलं होऊनही मेरी कोम जशी पुन्हा जगज्जेती होऊ शकते तसं यश कोणालाही मिळवता येऊ शकतं. स्मृतीनं आपल्या कामगिरीनं ही बाब अधोरेखित केली आहे, यात काही वादच नाही.

भावाकडून मौल्यवान भेट
भावानं बहिणीला प्रोत्साहन देण्यासाठी भेटवस्तू देण्याकरिता भाऊबीज या सणाचीच गरज लागत नाही. श्रवण यांना राहुल द्रविड यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी आपल्या बहिणीची यशोगाथा संगितली. द्रविड यांनी लगेचच त्यांची स्वाक्षरी असलेली बॅट दिली आणि त्याच बॅटनं स्मृतीनं द्विशक केलं. त्यानंतर काही वेळा दुरुस्त झालेली ती बॅट स्मृतीच्या शोकेसमध्ये असंख्य ट्रॉफींप्रमाणं शान उंचावत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com