पारशांचा वारसदार

इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ जाहीर होताच, सर्व प्रमुख खेळाडूंना स्थान मिळणार, हे अपेक्षित होतं.
Arzan Nagwaswalla
Arzan NagwaswallaSakal

इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ जाहीर होताच, सर्व प्रमुख खेळाडूंना स्थान मिळणार, हे अपेक्षित होतं. आपल्या वेगवान गोलंदाजांना नेटमध्ये जास्त गोलंदाजी करण्याचा ताण पडू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्याय उपलब्ध असावेत म्हणून राखीव खेळाडू निवडण्याची प्रथा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात त्याचा सर्वात मोठा फायदा झाला. टी. नटराजन असाच राखीव खेळाडू होता आणि महंमद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव असे प्रमुख वेगवान गोलंदाज जखमी झाल्यावर नटराजन कामाला आला. पुढं काय घडलं तो इतिहास सर्वांनाच माहीत आहे. हाच प्रयोग आता इंग्लंडच्या दौऱ्यासाठी करण्यात आला. हे स्वाभाविक होतं. कारण, हा दौरा तब्बल चार महिन्यांचा आहे, त्यामुळे राखीव वेगवान गोलंदाज निवडावे लागणारच होते. ही संघनिवड जाहीर झाली आणि त्यातील एक नाव सर्वांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं. पारशी खेळाडू अर्झान नाग्वसवाला!

तसं पाहिलं तर हे नाव भारतीय क्रिकेटसाठी परिचित नाही. कारण, आयपीएलमधून अनेक नवे खेळाडू उदयास येत असतात आणि नावाजलेल्या खेळाडूंप्रमाणे तेही प्रसिद्ध होत असतात; पण आयपीएलही न खेळलेला हा अर्झान थेट राखीव खेळाडूंत स्थान मिळवतो याचं आश्चर्य अनेकांना वाटणं स्वाभाविक होतं. कारण, या राखीव संघात असलेला प्रसिध कृष्णा, आवेश खान यांना आयपीएलमध्ये खेळताना अनेकांनी पाहिलं होतं. मग या अर्झानची वर्णी लागली कशी, असा प्रश्न पडू शकतो. याचं उत्तर सोपं आहे. ‘भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आयपीएल हा काही एकमेव निकष नाही,’ ही निवड समितीची भूमिका स्वागतार्ह आहे.

पारशी क्रिकेटपटूंचा इतिहास

अहमदाबादच्या नरगोल गावातील हा पारसी डावखुरा वेगवान गोलंदाज एक वेगळा इतिहास पुढं घेऊन आला आहे. २८ वर्षांनंतर एखादा पारशी पुरुष खेळाडू भारतीय संघासोबत जोडला गेला आहे. भाषा-प्रांत, जात-जमात अशा विविधतांनी नटलेला आपला देश खेळाच्या दुनियेतही ‘टीम इंडिया’ म्हणून लढतो तेव्हा हे असल्या बाह्यांगाच्या पाकळ्या अर्थातच गळून पडलेल्या असतात. तिथं टीम एकसंध दिसून येते; पण विविधतेचे हे रंग ठसा उमटवून जातात. असाच ठसा पारशी खेळाडूंनीही भारतीय क्रिकेटवर उमटवलेला आहे. फिरोझ एडलजी पालिया यांच्यापासून सुरू झालेला हा इतिहास फारुख इंजिनिअर यांच्यापर्यंत आल्यानंतर थांबला होता. आता तब्बल २८ वर्षांनंतर अर्झानच्या रूपानं नवा इतिहास सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही. महिला खेळाडू डायना एडलजी यांच्यासह एकूण १३ पारशी खेळाडूंनी भारतीय क्रिकेटचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुळात भारतीय क्रिकेटच्या उभारणीत पारशांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. या खेळाडूंत अर्थात फारुख इंजिनिअर, रुस्तमजी मोदी यांनी मोठा ठसा उमटवला; पण पॉली उम्रीगर आणि नरी काँट्रॅक्टर यांचंही योगदान अनन्यसाधारण आहे. या दोघांनीही भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. उंच, धिप्पाड आणि अष्टपैलू गुणवत्ता असलेले पॉली उम्रीगर यांच्या नावानं तर बीसीसीआय ‘मोसमातील सर्वोत्तम क्रिकेटपटू’चा पुरस्कारही देते.

सन १९७५ मध्ये फारुख इंजिनिअर, तर महिला क्रिकेटमध्ये डायना एडलजी जुलै १९९३ मध्ये आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्या. त्यानंतर किती तरी वर्षांनी आर्झनचा जन्म झाला. हा तेवीसवर्षीय युवक देशांतर्गत स्पर्धांत कमालीची कामगिरी करून पुढं आला आहे. सर्व प्रकारच्या मिळून १६ सामन्यांत ६२ विकेट ही निश्चितच दखल घेण्याजोगी कामगिरी आहे. अचूक टप्पा आणि दिशा यावर नियंत्रण असलेला अर्झानकडे दोन्ही बाजूंना स्विंग करण्याची क्षमता आहे. इंग्लंडमधील वातावरण ही तर त्याच्यासाठी सुवर्णसंधीच असेल.

अशी झाली सुरुवात

सन २०१८ च्या बडोद्याविरुद्ध अर्झानला रणजी सामन्यात खेळण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. त्यात त्याला अवघा एकच फलंदाज बाद करता आला होता. त्यानंतर बलाढ्य मुंबईविरुद्ध त्यानं पाच विकेट मिळवण्याची केलेली कामगिरी सर्वांच्या नजरेत भरली. यात त्यानं सूर्यकुमार यादव, अरमान जाफर, सिद्धेश लाड आणि आदित्य तरे अशा नावाजलेल्या फलंदाजांना बाद केलं होतं. याच सूर्यकुमारनं अर्झानची आता निवड झाल्यावर शुभेच्छांचा पहिला संदेश पाठवला. रणजी स्पर्धेच्या या पदार्पणात मोसमात त्यानं आठ सामन्यांत मिळून २१ फलंदाज बाद केले.

पुढच्या वर्षात साठ सामन्यांत मिळून ४१ विकेट मिळवण्याची केलेली कामगिरी प्रगतीचा आलेख उंचावणारी होती. कोरोनाचा देशात प्रादुर्भाव सुरू होण्याअगोदर झालेल्या २०२० च्या मोसमात पंजाबविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावांत मिळवलेल्या दहा विकेट या यशानंतर अर्झाननं मागं वळून पाहिलं नाही. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ‘विजय हजारे स्पर्धे’त सात सामन्यांत १८ आणि ‘मुश्ताक अली स्पर्धे’त पाच सामन्यांत नऊ विकेट अशी कामगिरी निवड समितीला निश्चितच दखल घ्यायला लावणारी होती. असं मोठं यश मिळवत असताना त्याला कोणत्याही आयपीएल संघानं घेतले नाही हे एक आश्चर्यच.

बॅटन पास होणार...?

फारुख इंजिनिअर हे लंडनमध्येच स्थायिक आहेत. अर्झान आता भारतीय संघाबरोबर लंडनमध्ये असणार आहे. कदाचित त्याची आणि इंजिनिअर यांची भेट होईल. तो क्षण पारशी क्रिकेटसाठी बॅटन पास करण्याएवढा भावनिक असेल हे निश्चित. ‘पारशी मुलगा भारतीय संघात, राखीव खेळाडू म्हणून का होईना, स्थान मिळवतो याचा मला अभिमान आहे. आता त्यानं अंतिम संघातही स्थान मिळवावं,’ अशी इच्छा इंजिनिअर यांनी व्यक्त केली आहे.

भारताकडून खेळलेले पारशी खेळाडू

फिरोझ एडलजी पालिया, सोराबजी हार्मसजी मुंचेरशा कोलाह, रुस्तमजी जमशेटजी, खेरशेद रुस्तमजी मेहेरहोमजी, रुसितोमजी शहरीयार मोदी, जमशेद खोदादाद इराणी, केकी खुर्शीदजी तारापोर, पहलान रतनजी उम्रीगर (पॉली उम्रीगर), नरीमन जमशेदजी कॉन्ट्रँक्टर (नरी कॉन्ट्रँक्टर), रुसी सूरती, फारुख इंजिनिअर, डायना एडलजी (महिला खेळाडू), बेहरोझ एडलजी.

(रुसी जिजिभॉय हे १९७१ च्या इंग्लंडच्या दौऱ्यात राखीव यष्टिरक्षक होते.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com