राव आणि रंक

आयपीएल स्थगित होत असल्याची घोषणा होणं ही केवळ औपचारिकताच होती. जेव्हा खेळाडूच कोरोनाबाधित व्हायला लागले तेव्हा बीसीसीआयला खडबडून जाग आली.
David Warner
David WarnerSakal

कोरोनाबाधितांची दिवसागणिक वाढणारी हृदयद्रावक आकडेवारी पाहता आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित होणं अपरिहार्यच होतं. देशाची राजधानी दिल्लीत एकीकडे प्राणवायूअभावी रुग्णांचा रस्त्यांवर जीव जात असताना त्याच दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानात मात्र आयपीएलचा खेळ होत राहणं हे चित्र कधीही पटणारं नव्हतं. या पार्श्वभूमीवर,

आयपीएल स्थगित होत असल्याची घोषणा होणं ही केवळ औपचारिकताच होती. जेव्हा खेळाडूच कोरोनाबाधित व्हायला लागले तेव्हा बीसीसीआयला खडबडून जाग आली. आयपीएल रद्द झाल्यावर ‘झालं ते बरं झालं’ अशी भावना काही खेळाडूंचीही झाली असेल; पण सुटकेचा खरा निःश्वास टाकला असेल तो हैदराबाद संघाचा नुकताच माजी कर्णधार झालेला ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर यानं. कर्णधारपदाबरोबर संघातलं स्थानही त्यानं गमावलं. लगेचच पुढच्या सामन्यात बारावा खेळाडू म्हणून तो मैदानात धावत होता...सहकाऱ्यांना पाणी देत होता...हेल्मेट देत होता.‘टीम मॅन’ असल्याचं दर्शवण्यासाठीची त्याची ही धडपड होती. एका सामन्यापुरतं हे ठीक होतं. हैदराबादच्या पुढच्या सामन्यातही त्यानं असं केलं असतं का? याचं उत्तर कदाचित वॉर्नरकडेही नसेल! मात्र, तेवढ्यात आयपीएल स्थगित झाली आणि वॉर्नरनं ‘सुटलो एकदाचा’ अशीच भावना व्यक्त केली असेल.

आयपीएल जेवढी भव्य-दिव्य दिसते तेवढीच ती मृगजळासारखीही आहे! या स्पर्धेतून पैसा, प्रसिद्धी मिळते हे खरं आहे. या स्पर्धेतून हिऱ्याला जसे पैलू पाडले जातात तसाच नवखा खेळाडूही रातोरात स्टार होतो. क्रिकेटच्या नभांगणी त्याची दखल घ्यायला सुरुवात होते. हे केवळ भारतीयांबाबतच नव्हे, तर परदेशी खेळाडूंबाबतही घडलं आहे. किती तरी उदाहरणं देता येतील. शेन वॉटसन, मिशेल जॉन्सन यांना आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघात त्या काळी पुन्हा स्थान मिळालं होतं. भारतीयांबाबत ताजी उदाहरणं द्यायची तर प्रसिध कृष्णा, कमलेश नागरकोटी, शुभमन गिल, कार्तिक त्यागी हे १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेतील यशामुळे आयपीएलमध्ये आले आणि तिथं त्यांना पैलू पडल्यानं आता ‘टीम इंडिया’चं ते ‘भवितव्य’ ठरले आहेत.

हे सर्व सांगण्याचा हेतू एवढाच की, आयपीएल जसं शिखरावर नेतं तसं खालीही आपटतं. हेच पाहा ना, काही महिन्यांत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणाऱ्या ॲरॉन फिंचला यंदा कुणीही बोली लावली नाही.

ट्वेन्टी-२० मध्ये फलंदाजीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या डेव्हिड मलानला आयपीएलमध्ये एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. यावरून इथं कुणाचं नाणं खणखणीत वाजेल आणि कुणाचं खोटं ठरेल हे काळच ठरवत असतो.

डेव्हिड वॉर्नरबाबत सांगायचं तर, तो हैदराबाद संघाचा सर्वाधिक प्राधान्य असलेला खेळाडू होता. कर्णधारही होता. त्याच्याच नेतृत्वात हैदराबादनं पहिलंवहिलं विजेतेपद मिळवलं होतं. आता फलंदाजीत फॉर्म हरपला आणि नेतृत्वात काही चुका झाल्या म्हणून थेट संघाबाहेर! आयपीएलमध्ये असं याअगोदरही घडलेलं आहे. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली, रिकी पाँटिंग, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, कुमार संगकारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक अशी किती तरी उदाहरणं आहेत...पण ज्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं, त्याच संघातून मध्यावरच दूर करण्यात आलेला वॉर्नर हा एकमेव कर्णधार आहे. मात्र, संघातूनही वगळण्यात आल्यानंतर लगेचच बारावा खेळाडू म्हणून वॉर्नरची धडपड केविलवाणी वाटत होती.

वॉर्नर हा तसा वरच्या श्रेणीतला खेळाडू. ऑस्ट्रेलियातून खेळताना अनेक सामन्यांत त्यानं एकहाती विजय मिळवून दिलेले आहेत. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय धावांचा आणि विजयांचा कितीही मोठा बँक बॅलन्स असली तरी आयपीएलमध्ये तो रंक झाला. एकूणच परिस्थिती पाहता, हैदराबाद त्याला पुढच्या लिलावात आपल्या संघात घेईल असं वाटत नाही. हैदराबादचा माजी खेळाडू डेल स्टेनच्या म्हणण्यानुसार, ‘वॉर्नर हैदराबादकडून अखेरचा सामना खेळला आहे.’

उतरता काळ...

खरं तर खेळाडूंनी केवळ कर्तृत्व दाखवून भागत नाही, तर त्यांची वर्तणूक आणि विचारही तेवढेच प्रगल्भ असावे लागतात. एखादी चूक कारकीर्दीचा चढता आलेख बदलण्यास कारणीभूत ठरू शकते. वॉर्नर आणि त्याचा सहकारी स्टीव्ह स्मिथ यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात चेंडू कुरतडण्याचा गुन्हा वॉर्नर-बँकक्राफ्ट आणि स्मिथ यांच्याकडून घडला. त्याच वेळी स्मिथ कर्णधार, तर वॉर्नर उपकर्णधार होता. त्यानंतर या दोघांवर एका वर्षाची बंदी आली. बंदी संपण्यास काही कालावधी असताना या दोघांना आयपीएलनं सामावून घेतलं. तेही कमी नव्हतं; पण त्याच आयपीएलनं आता या दोघांनाही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. स्मिथला तर राजस्थान रॉयल्स संघानं काढून टाकलं. दिल्ली कॅपिटलनं हात दिला नसता तर स्मिथ आयपीएलमध्ये दिसलाच नसता. चेंडू कुरतडण्याचा एक गुन्हा या दोघांच्याही आलेखांची दिशा बदलणारा ठरत आहे. ‘स्मिथनं पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाचा विचार करू नये’ असं त्याला सांगण्यात आलं आहे; मग वॉर्नर तर दूरच राहिला. फॉर्म मिळवता आला नाही तर ऑस्ट्रेलियाच्या संघातलं स्थानही वॉर्नर गमावू शकतो. एकूणच काय तर, आयपीएलनं त्याला ‘राव’ही केलं आणि नंतर ‘रंक’ही केलं आहे.

हा बोध सर्वांसाठीच आहे हे निश्चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com