जो जिता वही सिकंदर

श्रेष्ठ असो वा कनिष्ठ कुणालाही कमी लेखू नये. खेळाच्या दुनियेत अनेकदा चमत्कार घडलेले आहेत. एखाद्या संघासाठी टाकाऊ असलेलं दुसऱ्या संघासाठी कसं टिकाऊ होतं याचीही उदाहरणं अनेक आहेत.
Luis Suarez
Luis SuarezSakal

Don`t underestimate power of common man. फुटबॉलस्टार लुईस सुवारेझबाबत हे तंतोतंत खरं आहे.

श्रेष्ठ असो वा कनिष्ठ कुणालाही कमी लेखू नये. खेळाच्या दुनियेत अनेकदा चमत्कार घडलेले आहेत. एखाद्या संघासाठी टाकाऊ असलेलं दुसऱ्या संघासाठी कसं टिकाऊ होतं याचीही उदाहरणं अनेक आहेत. जागतिक क्लब फुटबॉलबाबत सांगायचं तर श्रेष्ठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बार्सिलोना’नं ऊर बडवला, तर ‘ॲटलेटिको माद्रिद’ला आनंदाच्या उकळ्या फुटल्या...या दोहोंबाबत हे असं होण्याचा केंद्रबिंदू होता तो लुईस सुवारेझ! ‘आता याचा काही उपयोग नाही’ म्हणून ‘बार्सिलोना’नं ज्याला बाहेरचा रस्ता दाखवला तो सुवारेझ तडफेनं खेळला आणि त्याच्या अफलातून खेळामुळे ‘ॲटलेटिको माद्रिद’नं ‘स्पॅनिश लीग’ अर्थात ‘ला लीगा’चं १४ वर्षांनंतर विजेतेपद मिळवलं. याच वेळी मेस्सी खेळत असतानाही ‘बार्सिलोना’ तिसरं आहे. कर्मदरिद्रीपणा कदाचित यालाच म्हटलं जात असावं!

सुवारेझ हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर एक ठरावीक छबी येते. राकट चेहरा...स्मितहास्य असलं तरी त्यामागं दडलेली खंत...गुणवत्ता असली तरी सर्वोत्तम खेळाडूंत आपण गणले जात नाही याविषयी वाटत असलेलं दुःख आणि त्यामुळे कधी कधी कृतीतून दिसणारा उद्वेग...कधी फारच भावनिक! राग अनावर झाल्यामुळे वर्ल्ड कप फुटबॉलमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूच्या कानाचा चावा घेण्याची कृती...आपल्यावरच्या अन्यायानंतर कर्तृत्व सिद्ध केल्यावर भर मैदानात अश्रू ढाळणं...सुवारेझची अशी अनेक रूपं फुटबॉलचाहत्यांनी पाहिली आहेत.

सध्याच्या खेळाडूंमध्ये तुलना करायची तर सुपरस्टार लिओनेल मेस्सी किंवा ख्रिस्तियानो रोनाल्डो हे कितीही श्रेष्ठ असले तरी सुवारेझला दुर्लक्षित करता येणार नाही. त्याला कमी लेखून चालणार नाही. शेवटी, प्रत्यक्ष मैदानावरचं योगदान आणि त्यामुळे संघानं मिळवलेलं यश हे सर्वश्रेष्ठ असतं. जो जीता है वही सिकंदर होता है!

स्पॅनिश लीगमध्ये मेस्सी खेळत असलेल्या ‘बार्सिलोना’चा तिसरा क्रमांक...अब्जावधी डॉलर देऊन रोनाल्डोला खरेदी केलेल्या ‘जुवेंटस’ची इटलीतील लीगमध्ये झालेली घसरण...पण याच वेळी सुवारेझनं संपूर्ण मोसमात सर्वाधिक २१ आणि तेही निर्णायक श्रेणीगोल केल्यामुळे ‘ॲटलेटिको माद्रिद’नं मिळवलेलं विजेतेपद...अशी तुलना होते तेव्हा सुवारेझ सिकंदरच असतो.

‘सर्वश्रेष्ठ’ या श्रेणीतील खेळाडू तुलनेनं कमी धोकादायक असतात; पण सुवारेझसारख्या खेळाडूंना थोडसं जरी डिवचलं गेलं तरी त्यांच्याकडून जो होतो तो चमत्कार असतो आणि अशा खेळाडूंना कोणीही थोपवू शकत नाही. याच सुवारेझची किंमत ‘बार्सिलोना’ला कळली होती २०१५ मध्ये. सुवारेझ ‘बार्सिलोना’त आला त्या वेळी या क्लबनं ‘ला लीगा’, ‘चॅम्पियन्स लीग’ आणि ‘कोपा डेल रे’ असं तिहेरी यश मिळवलं होतं. दोन वर्षांनतर सुवारेझ दुखापतीशी झुंजत होता, त्यामुळे ते वर्ष त्याच्यासाठी निरााशाजनक गेलं. परिणामी, ‘बार्सिलोना’च्या क्लबचे अध्यक्ष असलेले बार्टोमेऊ यांना सुवारेझ नकोसा झाला. ‘आमच्या प्लॅनमध्ये तू बसत नाहीस, त्यामुळे तू दुसरा पर्याय शोध,’ असं त्याला मार्गदर्शकांकडून थेट सांगण्यात आलं. नाराज झालेल्या सुवारेझला ‘ॲटलेटिको माद्रिद’नं हात दिला आणि सुवारेझनं त्यांच्या हातात विजेतेपदाचा करंडकच दिला.

याच ‘बार्सिलोना’नं सुवारेझसाठी मोठं धाडस केलं होतं यावर विश्वास बसणार नाही. वर्ल्ड कपमध्ये आपल्या उरुग्वे देशाकडून खेळणाऱ्या सुवारेझनं इटलीच्या खेळाडूच्या कानाचा चावा भर मैदानात घेतला होता. त्यामुळे सुवारेझवर मोठी कारवाई झाली. वर्ल्ड कपनंतर क्लब मोसम सुरू होणार होता, तरी ‘बार्सिलोना’नं त्याला आपल्या क्लबशी करारबद्ध केलं. एकतर बदनाम झालेला आणि बंदीमुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळणार नसला तरी ‘बार्सिलोना’नं सुवारेझबाबत हे धाडस केलं होतं. अर्थात्, यात त्यांचे तत्कालीन मार्गदर्शक सर्वश्रेष्ठ लुईल हेन्रिके यांच्या आग्रहामुळे हे डील झालं होतं.

हेन्रिके यांनी हिऱ्याची किंमत ओखळली होती; पण हेन्रिके यांनी ‘बार्सिलोना’चं मार्गदर्शकपद सोडल्यावर या घडामोडी घडत गेल्या. नेमार तर केव्हाच दूर गेला होता. मेस्सीही क्लब सोडण्याच्या मार्गावर होता. बार्टोमेऊ यांच्या हटवादी भूमिकेचा हा परिणाम होता. अर्थात्, त्यांनाही आपलं पद सोडावं लागलं; पण सुवारेझला बाहेर काढल्याचा फटका ‘बार्सिलोना’ला बसला यात शंका नाही.

मेस्सीबरोबर घट्ट मैत्री

मेस्सी हा सर्वश्रेष्ठ खेळाडूंच्या श्रेणीतला फुटबॉलपटू; पण त्याला याचा जराही दर्प नाही. मेस्सी-नेमार-सुवारेझ या त्रयीनं ‘बार्सिलोना’तून धुमाकूळ घातला होता. पुढं नेमारलाही बाहेरचा रस्ता दाखवला गेला, त्यानंतर निराश मेस्सी स्वतःच ‘बार्सिलोना’ला गुडबाय करणार होता; पण त्याची समजूत काढण्याची जबाबदारी त्या वेळी सुवारेझला देण्यात आली होती. मात्र, मेस्सीला काही कळायच्या आत सुवारेझलाच वगळण्यात आलं. ‘ला लीगा’च्या अंतिम साखळी सामन्यापूर्वी मेस्सी आणि सुवारेझ हॉटेलमध्ये सपत्नीक भेटले होते. छान गप्पाही झाल्या होत्या. त्याच सुवारेझनं त्या सामन्यात संघ पिछाडीवर असताना शानदार गोल केला आणि ‘ॲटलेटिको’साठी इतिहास घडवला. मैत्री असावी तर अशी.

वादग्रस्त सुवारेझ

सुवारेझसारखे खेळाडू दुधारी तलवारीसारखे असतात. अशा खेळाडूंना कधीही गृहीत धरायचं नसतं. त्यांच्या कलानं घेत त्यांच्यातील सर्वोत्तम खेळ करून घ्यायचा असतो. ‘बार्सिलोना’चे अगोदरचे मार्गदर्शक हेन्रिके आणि आत्ता ‘ॲटलेटिको’चे दिएगो सिमियॉनी यांनी असंच केलं होतं. सुवारेझसारखे खेळाडू कधी काय करतील याचा नेम नसतो. सोळाव्या वर्षी राष्ट्रीय ज्युनिअर संघात खेळत असताना रेफ्रींनी रेडकार्ड दाखवल्यामळे चिडलेल्या सुवारेझनं त्यांना डोक्यानं मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मैदानावरचा त्याचा शीघ्रकोपीपणा अधूनमधून कायमच होता. २०१० मध्ये ‘अजेक्स’ संघातून खेळताना ‘पीएसी’ संघातील एका खेळाडूच्या खांद्यावर त्यानं जोराचा प्रहार केला, त्यामुळे त्याच्यावर काही सामन्यांची बंदी आली होती. पुढं ‘लिव्हरपूल’ संघातून खेळताना ‘मँचेस्टर युनायटेड’ संघातील खेळाडूविरुद्ध वांशिक शेरेबाजी केल्यामुळे त्याला आठ सामने बाहेर राहावं लागलं होतं. वर्ल्ड कपमध्ये कान चावण्याचा प्रकार तर परिसीमा गाठणारा होता; पण असे बदनाम खेळाडू अफाट गुणवत्तेचे असतात म्हणूनच ते सिकंदरही असतात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com