आहे सर्वोत्तम तरीही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shailesh Nagvekar writes about Karim Benzema got Ballon d'Or award football

यंदाचा पुरस्कार फ्रान्सच्या आणि रेयाल माद्रिद या प्रसिद्ध क्लबमधून खेळणाऱ्या करीम बेन्झेमाने जिंकला

आहे सर्वोत्तम तरीही...

कितीही उत्कांती झाली तरी कालचक्राचे काटे आपला वेग बदलत नाहीत; पण सध्याच्या युगाचा बदलाचा वेग इतका आहे की, डोळ्यांदेखत पिढीच्या पिढी कधी बदलली हे उमजत नाही. जागतिक फुटबॉल क्षेत्रात काल-परवापर्यंत लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचं युग होतं, म्हणजे क्लब फुटबॉलमधील सर्वोत्तम बॉलन डी`ऑर पुरस्कार मिळालेले फुटबॉलपटू कोण..? एक तर मेस्सी किंवा रोनाल्डो यांच्याशिवाय दुसरा कोणीच नव्हता. गेल्या १३ वर्षांत मेस्सीने सात वेळा, तर रोनाल्डोने पाच वेळा हा सन्मान मिळवला. २०१८ मध्ये लुका मॉड्रिच या एका वेगळ्या खेळाडूने आपला ठसा उमटवला. आता यंदाचा पुरस्कार फ्रान्सच्या आणि रेयाल माद्रिद या प्रसिद्ध क्लबमधून खेळणाऱ्या करीम बेन्झेमाने जिंकला. तसं पाहायला गेलं तर हा अपवाद होता असं कोणीही म्हणू शकेल, पण गेली १३ वर्षं मक्तेदारी असणारा मेस्सी यंदा शर्यतीतही नव्हता, तर रोनाल्डो २० व्या क्रमांकावर होता. याचाच अर्थ, या दोघांची मक्तेदारी संपत येत आहे, यापेक्षा नव्या खेळाडूच्या हाती बॅटन जात आहे, ही दुसरी बाजू आहे.

फुटबॉलपटूंची प्रतिष्ठा पणास लावत असलेल्या क्लब फुटबॉलमध्ये फारच उलटफेर झालेत. बार्सिलोना म्हणजे मेस्सी आणि रेयाल माद्रिद म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो ही समीकरणं, आर्थिक असो वा अन्य कोणतीही कारणं असोत; पण बदललीत. प्रकाश दूर झाल्यावर हिऱ्याचंही चकाकणं कमी होतं असं म्हणतात, तसं कदाचित क्लब बदलानंतर मेस्सी आणि रोनाल्डो यांचं झालं असेल; पण या घडामोडीत बेन्झेमा हा हिरा कमालीचा तेजोमय झाला.

तो ज्या देशाचा खेळाडू आहे, त्या फ्रान्सने २०१८ च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळवलं. त्यांच्या यशाचा शिलेदार कायलियन एम्बापे! ज्याला नव्या पिढीचा पेले म्हणून संबोधण्यात येत आहे, तोही बेन्झेमाच्या तेजापुढे झाकोळला. विशेष म्हणजे, कमालीची गुणवत्ता असलेल्या बेन्झेमाशिवाय फ्रान्सने ते विश्वविजेतेपद मिळवलं होतं.

कोणताही मोठा पुरस्कार हा तुम्ही दिलेल्या योगदानाची आणि तुमच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला दिलेली पोचपावती असते. बेन्झेमामध्ये या दोन्ही गोष्टी आहेत. याक्षणी त्याचा फॉर्म आणि खेळ कमालीचा प्रभावशाली आहे यात शंकाच नाही. तो ३४ वर्षांचा आहे. खरंतर अतिशय वेगवान असलेल्या फुटबॉलमध्ये हे वय निवृत्तीकडे नेणारं असतं, म्हणजे पिढीबदलाला वयाचं बंधन नसतं हेच खरं. जगभरात अनेक लीग आहेत, त्यातून असंख्य फुटबॉलपटू खेळतात. या महासागरात जो सर्वोत्तम ठरतो तो किती महान असेल हे आकडेवारीने स्पष्ट होतं. बेन्झेमाने २०२०-२१ या मोसमात चॅम्पियन्स लीगमध्ये १५ आणि स्पॅनिश अर्थात ला लीगामध्ये २७ गोल केले. विशेष म्हणजे प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स लीगमध्ये प्रत्येक बाद फेरीच्या सामन्यात त्याने शेवटच्या मिनिटांमध्ये गोल करून रेयाल माद्रिदला अंतिम फेरीत नेलं होतं. थोडक्यात काय, तर गोल किती केले यापेक्षा ते कधी केले, म्हणजे कामगिरीपेक्षा प्रभाव किती पाडला याचं मोल सर्वोत्तम असतं. यामुळे बेन्झेमा हा प्रभावशाली खेळाडू आहे हे सिद्ध होतं.

यशाच्या शिखरापर्यंत पोहण्याची धमक असलेल्या प्रत्येक खेळाडूची एक वेगळी कहाणीही असते, तशी ती बेन्झेमाचीही आहे. तो कमालीचा खेळाडू आहे यात शंकाच नाही; पण तेवढाच तो वादग्रस्तही आहे. अनेक अडथळे पार करून त्याने हा प्रवास केला आहे, म्हणूनच कधीही हार न स्वीकारण्याची वृत्ती आणि सर्व काही शक्य आहे ही खूणगाठ आपण बांधली आहे, ही व्यक्त केलेली भावना त्याचा स्वभावगुण दर्शवते. लहानपणापासूनच काहीशी बंडखोरी त्याच्या स्वभावात होती. बेन्झेमाचा जन्म जरी फ्रान्सच्या लेयॉन या शहरातला असला, तरी त्याचे आई-वडील अल्जेरिया देशातले. फ्रान्सच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळालं नाही, तर आपण अल्जेरियातून खेळू अशी धमकी त्याने तारुण्यातच दिली होती. या धमकीवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्यावर त्याने आपली बंडखोरी म्यान केली होती.

वयाच्या आठव्या वर्षी रहात्या ठिकाणी असलेल्या ब्रोन टेरालिओन या स्थानिक क्लबकडून तो खेळायला लागला. त्याचा पहिलाच सामना लेयॉन यूथ अकादमी या मोठ्या क्लबबरोबर होता. यात त्याने दोन गोल केले आणि प्रतिस्पर्धी लेयॉन अकादमीचे पदाधिकारी त्याच्या प्रेमात पडले. आपल्या अकादमीतून खेळण्याची त्याला ऑफर दिली. वयोगटातील स्पर्धांतून एकेक पायरी चढत जात १ जुलै २००९ मध्ये बेन्झेमा रेयाल माद्रिद क्लबशी करारबद्ध झाला.

एकीकडे क्लब फुटबॉलमधील त्याचा आलेख लक्षवेधक आणि झपाट्याने चढत जात होता, त्याअगोदर फ्रान्सच्या १६ वर्षांखाली राष्ट्रीय संघात प्रवेश मिळाला. १८ वर्षांच्या वयोगटात देशाकडून खेळताना तो संघातील प्रमुख खेळाडू होता. या १८ वर्षांच्या वयोगटात वर्षभरात त्याने १४ गोल केले होते. पुढे १९ आणि २१ वर्षांखालील संघांतलाही तो हुकमी एक्का झाला होता.

सर्वकाही व्यवस्थित मार्गी लागत होतं; पण कधी कधी स्वभावातील दुसरी बाजू पुढे येते आणि कारकीर्दीला डाग लागतो, तसंच बेन्झेमाचं झालं. लहानपणीच वाह्यात वृत्ती दिसून आलेल्या बेन्झेमाने फ्रान्सच्या सीनियर संघात स्थान मिळाल्यानंतर संघातील काही खेळाडूंसह नाइट क्लबमध्ये महिलांशी गैरवर्तन केलं. बेन्झेमावर तर अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप होते. कोर्ट-कचेऱ्या झाल्या; पण पुरेशा पुराव्याअभावी तो सुटला इतकंच. पण म्हणतात ना, ठेच लागल्यावर सर्वच जणांना शहाणपण येतं असं नाही. बेन्झेमाही त्यातलाच. आपल्याच संघातील सहकाऱ्याची सेक्स टेप काढून त्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्याच्यावर झाला. फ्रान्सच्या तत्कालीन पंतप्रधानांनाही लक्ष घालावं लागलं. हे प्रकरण इतकं गंभीर झालं की, त्याला राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं आणि मोठी बंदी घालण्यात आली. त्याचा परिणाम इतका झाला की, फ्रान्सने विजेतेपद मिळवलेल्या २०१८ च्या विश्वकरंडक स्पर्धेत बेन्झेमा नव्हता. स्टार खेळाडू; पण त्याच्याशिवाय आम्ही जिंकू शकतो, हे फ्रान्सच्या इतर खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाने दाखवून दिलं, तर आपण मैदानावर कितीही महान असलो तरी सर्वश्रेष्ठ नाही, हा धडा बेन्झेमाला मिळाला.

ही बंदी संपली आणि बेन्झेमा आता पुन्हा फ्रान्सच्या राष्ट्रीय संघात आला आहे. क्लब फुटबॉलसह राष्ट्रीय संघातूनही तो प्रभाव पाडत आहेच. आता कतारमध्ये होणारी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा महिन्यावर आली आहे. एकीकडे बॅलन डी’ऑर या श्रेष्ठ पुरस्काराची झालर अंगावर असताना प्रथमच विश्वकरंडक खेळण्याची संधी मिळणाऱ्या बेन्झेमाचे हात (नव्हे पाय) शिवशिवत असणार. फ्रान्सला यंदा विश्वविजेतेपद राखायचं आहे. एकीकडे एम्बापे आणि दुसरीकडे बेन्झेमा म्हणजे इतर संघांसाठीक्षेपणास्त्रंच असतील. या सर्व गदारोळात मेस्सी आणि रोनाल्डो यांचं युग संपणार की त्यांचाही प्रभाव कायम असणार, हे पहाणे औत्सुक्याचं ठरणार आहे.