esakal | australian open : आता ओसाकाची ‘ताईगिरी’

बोलून बातमी शोधा

naomi-osaka}

सप्ततारांकित
ख्रिस एव्हर्टच्या खेळातील मुलायमता...मार्टिना नवरातिलोवाचा जोरकसपणा, तर लावण्यवती स्टेफी ग्राफची नजाकत ही केवळ टेनिसचाहत्यांनाच नव्हे, तर नव्वदच्या दशकातील सर्वांनाच मोहून टाकणारी होता. मार्टिना हिंगिस, गॅब्रिएला साबातिनी, मोनिका सेलेस यांचा खेळ अक्षरशः खिळवून ठेवायचा. यादरम्यान अनेक महिला टेनिसपटू आल्या, प्रभाव पाडून गेल्या.

australian open : आता ओसाकाची ‘ताईगिरी’
sakal_logo
By
शैलेश नागवेकर nshailu@gmail.com

ख्रिस एव्हर्टच्या खेळातील मुलायमता...मार्टिना नवरातिलोवाचा जोरकसपणा, तर लावण्यवती स्टेफी ग्राफची नजाकत ही केवळ टेनिसचाहत्यांनाच नव्हे, तर नव्वदच्या दशकातील सर्वांनाच मोहून टाकणारी होता. मार्टिना हिंगिस, गॅब्रिएला साबातिनी, मोनिका सेलेस यांचा खेळ अक्षरशः खिळवून ठेवायचा. यादरम्यान अनेक महिला टेनिसपटू आल्या, प्रभाव पाडून गेल्या. दशकं उलटली; पण महिला टेनिस गाजवणाऱ्या या खेळाडूंची आठवण, तारुण्य ओसरलेल्या आजच्या पिढीच्या मनात, जागी असते.  त्यानंतरचा काळ विल्यम्सभगिनींचा होता; खासकरून सेरेनाचा पॉवरफुल्ल खेळ अक्षरशः दादागिरी, म्हणण्यापेक्षा ‘ताईगिरी’ करणारा असायचा. तिच्या खेळाचं वर्णन त्या वेळी ‘ताईगिरी’ असंच केलं जायचं. मात्र, आता नाओमी ओसाकानं अशा भारदस्त खेळाची रॉयल्टी स्वतःकडे घेतली आहे! आत्तापर्यंतच्या स्पर्धांमध्ये तरी ओसाकाच सेरेनाची ‘ताई’ ठरली आहे. ही नव्या युगाची नांदी आहे असंही म्हणायला हरकत नाही.

सेरेनावर वर्चस्व
तेवीसवर्षीय ओसाका आणि एकोणचाळीसवर्षीय सेरेना यांची तुलना करणं योग्य नाही; पण या दोघींमध्ये आत्तापर्यंत पाच सामने झाले आहेत आणि विजयाचं प्रमाण ओसाकाच्या बाजूनं  ३:२ असं आहे. सन २०१८ च्या अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात ओसाकानं सेरेनाचा दोन सेटमध्ये पराभव केला आणि तिथून ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. तीनपैकी दोन विजय ओसाकानं ग्रँड स्लॅम स्पर्धांत मिळवलं आहे, त्यामुळे तिचं पारडं निश्चितच जड आहे.  
काय योगायोग असतो पाहा...सेरेना आणि व्हिनस यांचा खेळ पाहून ओसाकाचे वडील लिओनार्ड फान्स्वा यांनी ओसाकाला आणि आपल्या दुसऱ्या मुलीलाही टेनिस शिकवलं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज तीच ओसाका सेरेनाहून सरस ठरायच्या मार्गावर आहे. ‘गुरूची विद्या गुरूलाच’ असं थेट उदाहरण इथं योग्य ठरणार नाही; पण आपल्यासाठी आदर्श असलेल्या खेळाडूपेक्षा सरस असं निश्चितच म्हणता येईल. ओसाकाचे वडील लिओनार्ड हे मूळचे हैतीचे, तर आई तामाकी ओसाका ही जपानची. ओसाकाचा जन्म जपानच्या ओसाका शहरात झाला; पण ती तीन वर्षांची असल्यापासून अमेरिकेत राहत आहे. अमेरिका ही तिची कर्मभूमी असली तरी ती नागरिक आहे जपानचीच. तिच्या आईच्या देशाची. मात्र, वडिलांचा देश असलेल्या हैती या देशाबाबतही तिला अभिमान आहे.

बेधडक ओसाका
वास्तविक, कोणत्याही खेळातील खेळाडू त्याच्या खेळाव्यतिरिक्त तसा अव्यक्त, अबोल असतो. ‘आपला खेळ बरा आणि आपण बरं,’ अशी त्यांची भूमिका असते. ते कशात थेट सहभागी होण्याचं किंवा मतप्रदर्शन करण्याचं ते टाळत असतात. अर्थात्, याला आर्थिक बाजूही कारणीभूत असतात. कारण कधी कधी असा ‘सहभाग’ त्यांच्या ब्रँडला मारक ठरत असतो; पण स्वभावतःच बेधडकपणा असेल तर काहींसाठी ब्रँडपेक्षा स्वतःची भूमिका त्यांच्या आत्मसन्मानापेक्षा अधिक मौल्यवान असते. ओसाका त्याच श्रेणीतील. अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडला पोलिसांनी निर्घृण पद्धतीनं मारलं 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

तेव्हापासून वंशभेद आणि वर्णभेद यासंदर्भात ‘ब्लॅक लाईव्ज् मॅटर` ही मोहीम सुरू झाली आहे. ओसाका त्या वेळी अमेरिकन ओपन स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या स्पर्धेत खेळत होती. उपांत्यफेरीही तिनं गाठली होती. फ्लॉईडच्या स्मृतिस्तंभाला भेट दिल्यावर तिनं थेट उपांत्यफेरीतून माघार घेतली. असं धाडस या वयात करणं यातून तिचं मन किती कणखर आहे हे दिसून येतं.

ओसाका टेनिसक्षेत्रात तशी नवी आहे; पण तिनं आणखी एक धाडस दाखवलं होतं. गेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत ती प्रत्येक सामन्यात वेगवेगळा मास्क घालून कोर्टवर उतरली होती. तिनं काळा मास्क घातला होता. अमेरिकन पोलिसांकडून वर्णद्वेषापोटी मारल्या गेलेल्या कृष्णवर्णीय व्यक्तींची नाव त्या मास्कवर होती. असं धाडस जिच्या अंगी आहे ती कोर्टवर खेळताना बेधडक असणार हे स्पष्टच होतं. मास्कच्या माध्यमातून तिनं आपली भूमिका स्पष्ट केली असेल; पण टेनिसच्या प्रत्येक फटक्यातून तिचा राग व्यक्त होत असावा आणि त्याचा फटका प्रतिस्पर्धी खेळाडूंना बसला असावा असा काहींचा अंदाज होता.

विम्बल्डनचं गवत, फ्रेंचची लाल माती
गेल्या शनिवारी ओसाकानं जेनिफर ब्रॅडीचा पराभव करून आपलं दुसरं ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद मिळवलं. तिनं दोन अमेरिकन ओपनमध्येही विजेतेपदाचा मुकुट मिळवला आहे. चार ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम सामन्यात ती खेळली आणि चारही वेळा ती जिंकली आहे. म्हणजे शंभर टक्के यश. यंदाच्या या ऑस्ट्रेलियन स्पर्धेचं विजेतेपद मिळवताना तिनं सलग २१ विजय मिळवले आहेत. विजयपथावर येणं एक वेळ सोपं असेल; पण त्या मार्गावर सतत मार्गक्रमण करणं यासाठी असामान्य गुणवत्ता लागते आणि  असेच खेळाडू इतिहास घडवतात. 

तेवीसवर्षीय ओसाकाचा प्रवास त्याच दिशेनं सुरू आहे; परंतु परिपूर्ण होण्यासाठी विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन या दोन स्पर्धाही तेवढीच ‘ताईगिरी’ करून तिला मिळवायला हव्यात. कारण, विम्बल्डनचं गवत आणि फ्रेंचची लाल माती जो श्रद्धेनं खिशात बाळगतो तो खराखुरा चॅम्पियन म्हणून ओळखला जातो. महिला टेनिसमधील दिग्गजांबाबत बोलायचं तर त्यांनी विम्बल्डन आणि फ्रेंच स्पर्धाही गाजवल्या आहेत. कोरोनामुळे टेनिसचीही घडी विस्कटली आहे; पण ओसाकाही तिथली सम्राज्ञी असण्याचा काळ काही फार दूर नसेल.

Edited By - Prashant Patil