esakal | आता जेवढं काम... तेवढाच दाम!
sakal

बोलून बातमी शोधा

Saptarang

आता जेवढं काम... तेवढाच दाम!

sakal_logo
By
शैलेश नागवेकर

नुकताच संपलेला ऑगस्ट महिना भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी क्रांतीकारी ठरला. या महिन्याच्या सुरवातीला नीरज चोप्राचा भाला ऑलिंपिकमध्ये सुवर्णभेद करणारा ठरला तर महिनाअखेरीस त्याच टोकियामध्ये पॅरालिंपिक मध्येही पदकांचा वर्षाव होत राहिला. यामध्ये क्रिकेट या खेळात एका कसोटीत मान उंचावली तर पुढच्या कसोटीत हीच मान शरमेने खाली गेली हा अपवाद. एकीकडे क्रिकेटपेक्षा वेगळ्या खेळात घवघवीत यश मिळत असताना प्रो कबड्डीचा लिलाव पार पडला आणि अनेक खेळाडूंच्या अपेक्षांचा फुगा फुटला. भारतीय कबड्डीच्या नभांगणात उडणारे तारे जमिनीवर आले आणि येथून पुढे जेवढ काम तेवढाच दाम अशी गणिते मांडली जाणार हे निश्चितच झाले.

खरे तर भारतात क्रिकेटनंतर प्रो कबड्डी हा दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा होती, पण कोरोनाने या खेळाचीही पकड केली. स्पर्धा लोकप्रिय होऊ लागली तसे संघ मालकांनी खेळाडूंवर पैशाचा वर्षाव केला. लक्ष्मीचा वरदहस्त खेळाडूंवर होता. राज्य किंवा राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा खेळून हजार रुपयांचा असपास मानधन किंवा बक्षिस रुपाने मिळाणारे खेळाडू लाखोच काय करोडोत खेळू लागले होते. पण या कोरोनारुपी दानवाने आपल्या सर्वांनाच पैशांची किंमत ओळखायला शिकवली. मुळात एक मोसम वाया गेल्यानंतर प्रो कबड्डीचे संघ मालक खर्चाला आळा घालणार हे निश्चित होते आणि त्याचे प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या लिलावात दिसून आले.

वरवर दिसणारी ही एक बाजू झाली पण खरच हेच सत्य आहे का? की वाढीव मानधनाची सुज आता कमी झाली आहे का ? एकंदरीत लिलावात सर्वच संघ मालकांनी हातचे राखूनच पैसे खर्च केले आहे. पण हे सर्व होत असताना खेळाडूंनाही अस्तित्वाची जाणीव करून देण्यात आली आहे. शेवटी अशा व्यावसाईक स्पर्धांध्ये ग्लॅमर जेवढे लवकर मिळते तेवढाच लवकर अंधारही होत असतो. एक तर या स्पर्धेत टिकायचे असेल तर स्पर्धा करत रहावी लागते नाहीतर तुमची `किंमत` केली जाते तसेच तुम्ही अगोदर मिळवलेल्या मानसन्माची लकाकी कमी होत असते. याचे ताजे उत्तम उदाहरण म्हणजे काही वर्षांपूर्वी कबड्डीचा विराट कोहली म्हणून समजला जाणारा राहुल चौधरी. प्रो कबड्डीत दोनदा सर्वाधिक चढाया करणारा एका मोसमात तर कोटीपेक्षाही अधिक किंमत मिळवणाऱ्या राहुलला गतवेळेस ९४ लाख मिळाले होते पण आता त्याच्यासाठी कोणताच संघ मालक स्पर्धा करण्यास उत्सुक नव्हता पायाभूत किंमत ३० लाख आणि त्याला जेमतेम ४० लाख देऊन पुणे संघाने आणि तेही त्यांचा प्रशिक्षक असलेल्या अनुप कुमारमुळे संघात घेतले. ही घसरण केवळ राहुल चौधरीसाठी नाही तर सर्वच कबड्डीपटूंसाठी धोक्याची घंटा वाजवणारी आहे.

हा प्रश्न केवळ राहुल चौधरीचा नाही, डुबकी किंक म्हणून ओखळल्या जाणाऱ्या प्रदीप नरवालचा आत्ता तरी एकमेव अपवाद वगळला तर सर्वांसाठी महत्वाचा आहे. नाही तर जाने कहा गये वो दिन...असे म्हणायची वेळ सर्वांवर येऊ शकते. गतवेळच्या किंवा त्या अगोदरच्या लिलावात पाच खेळाडू करोडपती झाले होते. यंदा ही संख्या दोनवर आली आहे. प्रदीप नरवाल आणि दुसरा महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई. पण गतवेळेस त्याच्यासाठी ज्या तेलगू संघाने १ कोटी ४५ लाख मोजले होते त्यांनी यंदा १ कोटी ३० लाख दिले. म्हणजे लाखोपती होऊनही किंमत कमी झाली आहे. सिद्धार्थप्रमाणे काही मोसमापूर्वी लाखोपती असलेला महाराष्ट्राचा आणखी एक खेळाडू रिशांक देवाडिगा २० लाखांच्या पायाभूत किंमतीतच बंगालच्या संघात गेला. पहिल्या लिलावत तर त्याला कोणीच बोली लावली नव्हती. भारतीय कर्णधार अजय ठाकूर ब श्रेणीत होता.

नव्या पिढीचा शोध

राहुल चौधरी, सिद्धार्थ देसाई, रिशांक देवाडिगा किंवा अजय ठाकूर ही केवळ मोजकी उदाहणे आहेत. यावरून एक लक्षात येते की आता सर्वच संघ मालक नव्या पिढीचा शोध घेत आहेत. अनुप कुमार, राकेश कुमार, मनजित चिल्लर, मोहित चिल्लर, सुरेंद्र नाडा या सारख्या दिग्गज खेळाडूंनाचा काळ तसा मोठा होता पण राहुल चौधरी, अजय ठाकूर यांसारख्या खेळाडूंचा काळ आता संपत येत असल्याचे निर्देश या लिलावातून दिसून आले.

राष्ट्रीय संघातही परिणाम होणार?

प्रो कबड्डी असो वा आयपीएल अशा व्यावसायिक स्पर्धांवर राष्ट्रीय संघ निवडीचा प्रभाव नसतो असे सांगितले जात असले तरी अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. त्यानुसार आता राष्ट्रीय संघात बदल होणे अपेक्षित आहे. पण भारतीय कबड्डीत वर्षानुवर्षे सुरू असलेली प्रथा आहे. सहजासहजी नावाजलेले खेळाडूंना मग ते फॉर्मात असो वा नसो त्यांना वगळले जात नसते. या ताऱ्यांची चमक कमी झालेली असली तरी नभांगणात ते स्वतःचे स्थान टिकवून असतात. या पुढे आता काही महिन्यांनंतर आशियाई स्पर्धा होणार आहे. कबड्डीतील मक्तेदारीला गत आशिया स्पर्धा इराणने शह दिला होता. त्या संघात अजय ठाकूर, राहुल चौधरी, मोहित चिल्लर, दीपक हुडा प्रदीप नरवालसारखे खेळाडू होते. आता प्रदीप नरवालचा अपवाद वगळता इतर सर्वांना प्रो कबड्डीच्या लिलावाने आपली जागा दाखवली आहे. राष्ट्रीय स्तरावरही याची नोंद घेण्याची वेळ आली आहे. गेल्यावेळी शह मिळाला होता आता तर चीतपट होण्याची वेळ येईल.

२०१८ मध्ये आशिया स्पर्धेत सुवर्णपद गमावलेला भारतीय संघातील काही खेळाडूंची प्रो कबड्डीतील त्यावेळची आणि आत्ता घसरलेली किंमत

अजय ठाकूर (७६ लाख) आत्ता ४६ लाख

राहुल चौधरी (९४ लाख) आत्ता ४६ लाख

संदीप नरवाल (८९ लाख) आत्ता ६० लाख

मोनू गोयत (९३ लाख) आत्ता २० लाख

रिशांक देवाडिगा (१ कोटी ११ लाख) आत्ता २० लाख

दीपक हुडा (१ कोटी १५ लाख) आत्ता (५५ लाख)

loading image
go to top