esakal | राहुल को गुस्सा क्यूँ आता है?

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid
राहुल को गुस्सा क्यूँ आता है?
sakal_logo
By
शैलेश नागवेकर nshailu@gmail.com

कोण म्हणतं, आयपीएल केवळ मैदानावरच रंगत असते किंवा तिची अधिक चर्चा होत असते? आयपीएलचा मसाला मैदानाबाहेरही तेवढाच चवदार असतो...!

आठवतं का? मंदिरा बेदीची कॉमेंट्री? खरं तर क्रिकेटवर चर्चा करायला आपण सारे पंडित! कुणी कसा खेळ करायला पाहिजे होता, कुणाकडून कोणत्या चुका झाल्या याचं भारतीयांमध्ये असलेलं ज्ञान अफाट; तरीही त्या वेळी मंदिरा बेदीकडून विश्लेषण ऐकायला अनेकांचे कान टवकारलेले असायचे...

झूझूच्या जाहिराती आठवतायत का? व्होडाफोन नेटवर्कच्या त्या जाहिराती कमाल असायच्या. एरवी, ब्रेकमध्ये लागत असलेल्या जाहिराती नकोशा वाटतात; पण झूझूच्या जाहिराती वारंवार दिसूनही पुनःपुन्हा पाहिल्या जायच्या. आता व्होडाफोन आणि आयडिया एक झाल्यामुळे या जाहिराती कालबाह्य झाल्या...

इतिहासाची ही पानं उलगडण्याचा हेतू एवढाच की, आयपीएल ही मैदानाबाहेरही रंजक असते किंवा चर्चेत असते. यंदा आयपीएल सुरू होत असताना एक जाहिरात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एवढंच कशाला, अनेक दिग्गज या जाहिरातीवर रिॲक्टही होत आहेत. स्वतःला ‘गुंडा’ म्हणवून घेणाऱ्या, संताप अनावर झालेल्या आणि दुसऱ्यांच्या गाडीवर बॅटनं प्रहार करणाऱ्या दस्तूरखुद्द राहुल द्रविडची ‘क्रेड’ ही ती जाहिरात! मुळात जाहिरात कितीही आकर्षक असली तरी काही काळानंतर तिची आधीची मजा राहत नाही; पण आयपीएल सुरू होऊन इतके दिवस झाले तरीही द्रविडची जाहिरात मनात अजूनही घर करून आहे. त्याचं कारण, जाहिरात आणि वास्तव यांमध्ये असलेला विरोधाभास. द्रविड आणि राग? किंवा अकांडतांडव? या दोन बाबी एकत्रित असण्याचा विचार कुणी स्वप्नातही करू शकत नाही. त्यामुळे ही जाहिरात इतकी लोकप्रिय होत आहे. ज्यानं कुणी या जाहिरातीची संकल्पना तयार केली असेल व त्यासाठी द्रविडची निवड केली असेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, या जाहिरातीसाठी द्रविडचं मन वळवलं असेल त्याला सलामच! संताप आलेलं क्रिकेटमधील कॅरॅक्टर दाखवायचं असेल तर विराट कोहलीशिवाय दुसरं नाव पुढं येणार नाही; पण जेव्हा विरोधाभास दाखवला जातो तेव्हा चर्चा तर होणारच!

द्रविड म्हणजे मूर्तिमंत आदर्श, निश्चयाचा महामेरू, शांततोचा आणि संयमाची मूर्ती. ‘कोणत्याही खेळात मोठं व्हायचं तर द्रविडसारखी शिस्त बाळगा,’ अशी शिकवण दिली जाते. गुणवत्तेच्या जोरावर यशाचं शिखर गाठता येईल; पण मानसन्मान हा स्वभावगुणांमुळे आणि तुम्ही निर्माण केलेल्या आदर्शामुळे मिळत असतो.

यात सर्व बाबतींत द्रविड अग्रेसर आहे, म्हणूनच भारतीय संघातील आजची तरुण पिढी द्रविडसरांचं नाव वेळोवेळी आदरानं घेत असते. हेच नवोदित खेळाडू भारतीय संघाच्या विजयी पताका तर फडकवत असतातच; पण स्वतःच्या स्वभावाला मुरड घालत सभ्यतेचंही दर्शन घडवत असतात.

द्रविडचा आदर्श पुढं नेणारा अजिंक्य रहाणेसुद्धा या जाहिरातीत चपखल बसला असता. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात त्यानं केलेल संयमी नेतृत्व, त्यातून मिळवलेलं अभूतपूर्व यश, कुठंही न दाखवलेला उन्माद आणि विशेष म्हणजे, मुंबईत घरी परतल्यावर कांगारूची प्रतिकृती असलेला केप कापण्यास दिलेला नकार... हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की, द्रविडच्या संयमी वृत्तीचा आदर्श आताची पिढी ठेवत असून तशी वागतही आहे. म्हणूनच द्रविडला त्या जाहिरातीत वेगळ्या भूमिकेत पाहणं न पटणारं आहे आणि तरीही हे सगळं विरोधाभासात्मक गणित जो मनोरंजनासाठी जुळवून आणतो तो खरा डायरेक्टर!

रागानं फेकली होती कॅप

हे सर्व एका बाजूला; पण द्रविडला वास्तव आयुष्यात कधी राग येतच नाही का? असं क्वचितच घडलं आहे. कधी कधी त्याचाही संताप अनावर झाला आहे. मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडू डिवचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काही प्रसंग घडतात. द्रविडनंही याचा सामना केलेला आहे. रागही व्यक्त केलेला आहे; पण तो खेळाचा भाग असतो. तेवढी आक्रमकता दाखवावीच लागते; पण रागानं टोपी जमिनीवर फेकणारा द्रविड जेव्हा पाहण्यात आला तेव्हा अनेकांचा त्यावर विश्वासच बसला नव्हता.

सन २०१४ च्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघातील सामना. क्वालिफाय होण्यासाठी मुंबईला १४.३ षटकांत १९० धावा करणं आवश्यक होतं. प्रत्येक चेंडूगणिक समीकरणं बदलत होती. खेळाडूंनाही ती समजत नव्हती. अखेर काही तरी गोंधळ होत होता आणि तेवढ्यात आदित्य तरे यानं षटकार मारून मुंबईला विजयी केलं. तेव्हा डगआऊटमध्ये असलेल्या द्रविडनं रागानं डोक्यावरची टोपी आपटली होती. त्या वेळी तो राजस्थान संघाचा प्रशिक्षक होता. द्रविडचं ते रूप पाहून सर्वच जण अचंबित झाले होते.

दुसरा एक प्रसंग द्रविडची पत्नी विजेयता हिनं एका पुस्तकात लिहिला आहे. सन २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताचा पराभव झाला. ‘‘माझा फार संताप होतोय,’’ असं घरी आल्यावर द्रविड म्हणाला होता. ‘‘त्याचं हे रूप पाहून मलाही आश्चर्य वाटलं होतं,’’ असा उल्लेख विजेयतानं केला होता.

आपला हा आदर्शवत् पती असा कसा रागावला याची विचारणा तिनं काही महिन्यांनंतर वीरेंद्र सेहवागकडे केली होती. त्या वेळी सेहवागनं सांगितलं होतं...‘‘द्रविड ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर त्यानं खुर्ची फेकून दिली होती. पराभवामुळे नव्हे; तर ज्या प्रकारे खराब खेळ करून संघ हरला ते द्रविडला सहन होत नव्हतं.’’ तेव्हा द्रविड स्वतः नऊच धावा करू शकला होता.

स्वभावगुण

संयम...राग...लोभ...मत्सर...स्वार्थ...हे सर्व स्वभावगुण...आणि या गुणावगुणांनी माणूस तयार होत असतो, त्यानुसार वर्तनही करत असतो. अवगुणांपेक्षा गुणांचं पारडं ज्याचं जड असतं तो आदर्शवत् असतो. राहुल द्रविडचा स्वभावगुण निश्चितच फार मोठा आहे, म्हणूनच स्वतःला ‘गुंडा’ म्हणवणाऱ्या आणि रागानं बॅट गाडीवर मारणाऱ्या द्रविडची जाहिरात विरोधाभासामुळे चर्चेत राहते.