रशीद खानला तालिबानची दहशत ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashid Khan

रशीद खानला तालिबानची दहशत !

रशीद खान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा सध्याचा प्रतिथयश खेळाडू. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड या देशांच्या तुलनेत अफगाणिस्तान क्रिकेटच्या या बलाढ्य देशांच्या तुलनेत फारच मागे तरीही त्यांच्या देशातील रशीद खान हा खेळाडू विराट कोहलीच काय, स्टीव स्मिथ, केन विल्यमन्सन अशा दिग्गजांना पुरून उरतो. त्याचा लेगस्पिन भिंगरीप्रमाणे फिरतो तर गुगली दांडी गूल करतो.

अफगाणिस्तानमध्ये इतर देशांच्या तुलनेत फारसे नावाजलेले क्रिकेट नसताना रशीद खानने केलेली प्रगती थक्कच करणारी आहे. म्हणून काही महिन्यांपूर्वी ट्वेन्टी-२० मधील गोलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. एवढेच कशाला त्याचा अफगाणिस्तानचा संघ आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पात्र ठरलेला आहे. अशी कामगिरी नावाजलेल्या श्रीलंका आणि बांगलादेशलाही अजून करता आलेली नाही. असा रशीद खान आणि त्याचा राष्ट्रीय संघ अफगाणिस्तान-तालिबान या कात्रीत सापडला आहे.

सध्याचे युग फास्टफूड क्रिकेटचे म्हणजेच ट्वेन्टी-२० वर अधिक प्रेम करणारे आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अफगाणिस्तानला कसोटीचाही दर्जा देणे यामुळे तेथील गुणवत्तेची कदर करण्यासारखे आहे. एकीकडे खेळाडू अशी प्रगती करत असताना त्याच अफगाणिस्तानमध्ये तालिबानची पुन्हा राजवट येण्याअगोदरही एकही आंतरराष्ट्रीय सामना होऊ नये यावरून तेथील परिस्थिती किती बिकट आहे हे स्पष्ट होते.

याच अफगाणिस्तानला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात अनेक खेळाडूंचा हातभार आहेच, परंतु नावारुपाला आणण्यात रशीद खान हुकमी एक्का आहे म्हणूनच जगभरातील ट्वेन्टी-२० लीगमध्ये त्याला मागणी असते. तेवढे मानधनही त्याच्यासाठी मोजले जाते त्यामुळे तो सातत्याने देशाबाहेरच असतो आताही तो लंडनमध्ये हंड्रेड ही स्पर्धा खेळत आहे तेथून तो अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील नियोजित मालिका शक्य झाली तर श्रीलंकेत जाईल तेथून आयपीएलसाठी अमिराती आणि ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठीही तो अमिरातीत असेल त्यानंतर कधी मायदेशी परतेल हे तोच जाणो पण आता ते त्याला शक्य होणार आहे का ?

अफगाणिस्तानमधील सध्याची सर्वांत मोठी उलथापालथ अफगाणवासींसाठी आणि त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारा आहे. केवळ क्रिकेटचे नव्हे तर फुटबॉलसारख्या खेळात अफगाणचा संघ आशिया खंडात मातब्बरांमध्ये गणला जातो. क्रीडा क्षेत्रात त्यांच्या महिलांनीही मोठी प्रगती केलेली आहे, पण आता सर्व बुरख्यात बंद होणार हे निश्चित झाले आहे. या सर्व घडामोडीत दोघा खेळाडूंनी आवाज उठवला. त्यातील एक होती पॅरालिंपिक खेळाडू झाकिया खुदादादी आणि दुसरा रशीद खान. पॅरालिंपिक स्पर्धेत खेळणारी अफगाणिस्तानची पहिली वहिली महिला खेळाडू होण्याचा मान मिळण्याचे आपले स्वप्न भंगले एवढीच ती म्हणाली, पण रशीद खानने तर तर तालिबानवर तोफच डागली होती. सर्व जगातील सामर्थ्यवान नेत्यांना माझ्या देशवासीयांना वाचवा असे आर्जव करणारे ट्विट त्याने केले आणि त्यानंतर काही दिवसांत तालिबान फौजा काबूलमध्ये घुसल्या.

तालिबानने एकेक करून सर्व क्षेत्रांवर कब्जा मिळवण्यास सुरवात केली, क्रिकेट मंडळाच्या कार्यालयात बंदुकधाऱ्यांनी प्रवेश करून क्रिकेटचाही ताबा घेतला आणि विशेष म्हणजे ते छायाचित्र जगभरात प्रसिद्ध होईल हे ही त्यांनी पाळले. खरे तर यातून त्यांना रशीद खानसह सर्वांना इशाराच द्यायचा होता. रशीद अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करतो जगभरातील ट्वेन्टी-२० लीगमध्ये तो खेळत असला तरी त्याच्या नाड्या आता पर्यायाने तालिबानच्या हातात आहेत.

अँडी फ्लॉवर विरुद्ध मुगाबे राजवट

कात्रीत सापडलेला रशीद खानचा विचार होतो तेव्हा झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये अँडी फ्लॉवर आणि त्यांचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या राजवटीचे संदर्भ पुढे येतात. जसा रशीद खान अफाणिस्तानचा मोठा खेळाडू तसा फ्लॉवर बंधूंमधील अँडी फ्लॉवर हा झिम्बाब्वे क्रिकेटचा तारणहार होता. झिम्बाब्वेत कृष्ण आणि गौरवर्णीय यांच्यात द्वेष होताच. मुगाबे यांच्या राजवटीविरुद्ध अँडी फ्लॉवरने आवाज उठविण्यास सुरुवात केली. कधीही त्याला अटक होण्याची शक्यता होती, पण तसा तो इंग्लंडमध्येच जास्त रहात होता झिम्बाब्वेत फारच कमी असायचा. २००३ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात संयुक्तपणे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेचे टायमिंग त्याने अचूक साधले. स्पर्धेदरम्यान त्याने मुगाबे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. स्पर्धेच्या वृत्तांकनासाठी आंतरराष्ट्रीय मिडिया आलेला असल्यामुळे मुगाबे यांचा पंचाईत झाली होती, ते अँडी फ्लॉवरवर अटकेची कारवाई करू शकत नव्हते. फ्लॉवर झिम्बाब्वेतला सामना खेळला आणि त्यानंतर त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेत होता. तेथून त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला त्याच्या अगोदर इंग्लंडचे नागरिकत्व मिळवले होते आणि कुटूंबालाही झिम्बाब्वेतून इंग्लंडला आणले होते.

अँडी फ्लॉवरने अचुक टायमिंगसाधत मुगाबे राजवटीला शह दिला पण रशीद खान असे धाडस करू शकेल ? यावेळीही विश्वककरंडक तोंडावर आली आहे. दहशत तेवढीच असली तरी मुगाबे आणि तालिबान या दोन राजवटींमध्ये फरक आहे. तो झिम्बाब्वे देश होता हा अफगाणिस्तान आहे. रशीदला भले इतर देशांचे राष्ट्रीयत्व मिळू शकेल पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रशीदचे कुटुंबीय काबूलमध्येच आहेत. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणचा संघ खेळणार का आणि खेळलाच तर त्यात रशीद खान असणार का? हा प्रश्न कायम आहे

Web Title: Shailesh Nagvekar Writes About Rashid Khan Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top