esakal | ‘टॉयलेट ब्रेक’ एक टेनिस कथा...
sakal

बोलून बातमी शोधा

Andy Mary

‘टॉयलेट ब्रेक’ एक टेनिस कथा...

sakal_logo
By
शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

मध्यंतरी अक्षय कुमार याचा एक चित्रपट प्रसिद्ध झाला होता. त्याचे नाव होते टॉयलेट एक प्रेमकथा! सध्या टॉयलेट ब्रेक हा शब्द टेनिस खेळात फारच प्रसिद्ध झाला आहे. प्रत्येक खेळाचे एक वैशिष्ट आणि गुणधर्म असतो. देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ क्रिकेटमध्ये लंच ब्रेक, टी ब्रेक सारखे ब्रेक असतात आयपीएलमध्ये तर स्ट्रॅटेजिक ब्रेक हा खेळाडूंसाठी नव्हे तर जाहिरातदारांसाठी आणि त्यामार्गे ब्रॉडकास्टर तसेच बीसीसीआय यांचा गल्ला भरण्यासाठी असतो. समारोप होणाऱ्या यूएस टेनिस स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल लागले, पण सर्वांत चर्चेत हा तो टॉयलेट ब्रेक.

बेस्ट ऑफ थ्री सेटचा सामना असला तरी तो किती काळ चालेल याचा नेम नसतो, पाच सेटचे सामने चार चार तासही रंगलेले आहेत. त्यामुळे सलग काळ कोर्टवर रहावे लागत असल्याने टेनिसचे नियम तयार करताना सर्वच बाबींचा विचार करण्यात आलेला आहे. त्यातलाच हा टॉयलेट ब्रेक. पण म्हणतात ना नियम कसेही आणि कशा कारणासाठी असले तरी ते आपल्याला फायदेशीर ठरतील अशा प्रकारे वाकवले जातात. पूर्वीही असे नियम होते पण आधुनिक काळात स्पर्धा वाढलेली असताना साम, दाम, दंड, भेद याचा सर्रास वापर होताना दिसून येतो. त्यातलाच हा प्रकार.

या यूएस ओपनमध्ये त्सित्सिपासने हा ब्रेक सर्वाधिक चर्चेत आणला. प्रतिथयश टेनिसपटू अँडी मरेने तर त्सित्सिपासवर तोफच डागली. पहिल्याच फेरीत या दोघांमध्ये सामना झाला आणि ऐन महत्वाच्या क्षणी त्सित्सिपासने घेतलेल्या या ब्रेकवरून महाभारत घडले. त्सित्सिपासच्या या ब्रेकची चौकशी करा किंवा असे ब्रेक रद्द करा अशी थेट मागणी मरेने केली....का बरे मरे एवढा चिडला असेल ? सामन्याला स्कोअर पाहिला तर आणि या ब्रेक नंतर त्सित्सिपासचा प्रभावी खेळ पाहिला त्यामुळे शंकेला वाव आहे. या पहिल्याच सामन्यात या ब्रेकवरून महाभारत घडल्यावर सुधारेल तो त्सित्सिपास कसला. त्याने हीच क्लुप्ती पुढच्या दोन सामन्यात वापरली. एकदा सामना पलटवण्यात तो यशस्वी ठरला मात्र नंतर त्यालाच स्पर्धेतून `ब्रेक` झाला.

ही घटना घडल्यानंतर टेनिस विश्वास दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली. वास्तविक पाच सेटच्या सामन्यात दोन आणि तीन सेटच्या सामन्यात एक टॉयलेट ब्रेक असतो. त्यामुळे त्सित्सिपासने नियमबाह्य काहीही केले नाही पण नियमाचा गैरवापर तर केला नाही ना, असे अँडी मरेसह अनेकांना वाटू लागले. आव्हान संपुष्टात आल्यावर जेव्हा त्सित्सिपासला या ब्रेकबाबत विचारले असता तो म्हणाला होता. ‘‘ घामामुळे माझे टीशर्ट अत्यंत ओले झाले होते. त्यामुळे मी नवा टीशर्ट परिधान केला आणि काही काळ थांबून एकाग्रता मिळवली.’’ मुळात हे ब्रेक किती मिनिटांचे असावे असाही ठोस निर्णय नाही. पण त्सित्सिपासने सात सात मिनिटे घेतली होती. त्सित्सिपाससाठी हे ठिक होते, पण प्रतिस्पर्धी खेळाडूंची अशा ब्रेकमुळे लय बिघडते. जो सामना ते जिंकत असतात त्यात त्यांचा पराभव होत असतो. हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. त्यामुळे अशा खेळाडूंकडून त्रागा होणे स्वाभाविक आहे.

अगदी त्सित्सिपासच कशाला दिग्गज नोवाक जोकोविचच्या फ्रेंच ओपन आणि विमब्लडनचे अंतिम फेरीचे सामने आठवा ? फ्रेंच स्पर्धेत राफेल नदाल पहिले दोन सेट जिंकला होता त्यानंतर जोकोविचने हा ब्रेक घेतला आणि पुढचे तीन सेट जिंकून नदालचे लाल मातीवरचे साम्राज्य खालसा केले होते. त्यानंतर लगेचच झालेल्या ग्रास कोर्टवरील विम्बल्डनधील अंतिम सामन्यात त्सित्सिपासने पहिले सेट जिंकून वादळाची नांदी केली होती, पण यावेळीही जोकोविचनने ब्रेक घेतला आणि पुढचे सेट जिंकून आपले २० वे ग्रँडस्लॅम जिंकले होते. त्सित्सिपासने त्या सामन्यापासूनच ब्रेकचा खुबीने वापर करण्याचा बोध तर नसावा ना, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

ही यूएस ओपन स्पर्धेच्या अगोदर झालेल्या सिनसिनाती ओपन ग्राँप्री स्पर्धेतही त्सित्सिपास वेगळेच आरोप झाले होते. अलेक्झँडर झेरेवविरुद्धच्या सामन्यात त्सित्सिपास त्याच्या सोबत असलेली कपड्यांची बॅग लॉकररुध्ये घेऊन गेला. त्याच्या बॅकमध्ये मोबाईल असावा आणि त्याने तेथून टेक्स मेसेज करून आपल्या प्रशिक्षकांशी खेळात सुधारणा करण्यासाठी संवाद साधल्याचे आरोप झाले. झेरेवलाही अशा प्रकारची शंका आली होती, पण उपांत्य फेरीचा हा सामना त्याने जिंकला आणि प्रकरण फार ताणले गेले नाही.

खेळता खेळता दुखपती होत असतात त्यामुळे वैद्यकीय ब्रेकचीही सुविधा आहे. तीन मिनिटांचा हा ब्रेक असतो पण कधी कधी काही खेळाडू एकाग्रता मिळवण्यासाठी त्याचाही खुबीने वापरत करतात. प्रेक्षकांना हे सहजगत्या समजत नसते, पण जाणकारांच्या नजतेतून ही गोष्ट सुटत नसते म्हणून चेअर अंपायरने अगोदरचा गुण जाहीर केल्यानंतर पुढची सव्हिस २५ सेकंदात करायचा नियम तयार करण्यात आलेला आहे. तरीही काही खेळाडू सव्हिस करण्यापूर्वी चेंडू अनेक वेळा जमिनीवर आपटत असतात.

काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानानुसार प्रत्येक खेळात नियमाबत बदल करावे लागत असतात. फुटबॉलसारख्या अखंड खेळातही `वार`चा (Video Assistant Referee) वापर केला जातो. टेनिस, बॅडमिंटनमध्ये खेळाडूंना लाईन कॉलचा फेरविचार करण्याची संधी मिळू लागली आहे. हॉकीतही तिसऱ्या पंचांची मदत घेता येते. एकूणच काय तर खेळाडूंवर अन्याय होऊ नये आणि निकोप स्पर्धा व्हावी यासाठी नियमात काळानुरुप बदल करण्यात आले आहे. त्सित्सिपासकडून वारंवार होणारा टॉयलेट ब्रेक टेनिस प्रशासकांना मात्र जुन्या नियमात सुधारणा करण्यासाठी विचार करायला लावणारा आहे हे नक्की. येत्या काळात यात बदल घडला तर त्याचा जनक त्सित्सिपास असेल हे सुद्धा तेवढेच खरे असेल. त्सित्सिपास आणि त्याचा सामन्यातील टॉयलेट ब्रेक असा अध्याय तयार होईल.

loading image
go to top