Anshu and Sonam Malik
Anshu and Sonam MalikSaptarang

दंगल पार्ट २

आपल्या देशात कुस्तीची मोठी परंपरा आहे. मल्लयुद्धाचे दाखले थेट महाभारतातही मिळतात. माती ते गादी अशी कुस्तीची प्रगती झाली आणि कुठं तरी आपण मागं राहिलो.

आपल्या देशात कुस्तीची मोठी परंपरा आहे. मल्लयुद्धाचे दाखले थेट महाभारतातही मिळतात. माती ते गादी अशी कुस्तीची प्रगती झाली आणि कुठं तरी आपण मागं राहिलो. सन १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी पदक जिंकल्यानंतर कुस्तीतलं पुढचं पदक सन २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुशीलकुमारनं जिंकलंं. कुस्तीतील दोन पदकांमधील ५० वर्षांचा हा कालावधी फारच मोठा; पण याच कुस्तीत गेल्या काही वर्षांत आशादायी चित्र निर्माण झालं आहे. जागतिक विजेतेपदापेक्षा ऑलिंपिकपदकावर श्रेष्ठत्व मोजलं जातं आणि ऑलिंपिकपदक विजेते हे काही रातोरात तयार होत नसतात, त्यासाठी कित्येक वर्षांची तपश्चर्या लागते. मात्र, जेव्हा ज्युनिअर गटातील खेळाडू मोठी भरारी घेण्यासाठी झेपावतात तेव्हा निश्चितच आशेचा किरण दिसत असतो. अंशू आणि सोनम मलिक या १८-१९ वर्षीय मुलींनी कुस्तीत ऑलिंपिकपात्रता मिळवून भारताचं कुस्तीतील भवितव्य उज्ज्‍वल असल्याचं दाखवून दिलं आहे.

फोगटभगिनी, ऑलिंपिक ब्राँझविजेती साक्षी मलिक अशी महिलाकुस्तीत असलेली भारताची परंपरा आता नवोदित खेळाडूंच्या हाती आली आहे. विशेष म्हणजे, सर्वत्र कोरोनाचं संकट पुन्हा वाढलेलं असताना आणि गतवर्षातील बराचसा काळ लॉकडाउनमध्ये वाया गेलेला असतानाही अंशू आणि सोनम मलिकसारख्या हरहुन्नरी कुस्तीगीर ऑलिंपिकपात्रतेची पहिली वीट रचत असतील तर, केवळ कुस्तीच नव्हे तर, देशातील इतर खेळांसाठी आणि खेळाडूंसाठी ते स्फूर्तिदायी आहे.

क्रिकेटसारख्या खेळात आपण कितीही प्रगती केली, प्रसिद्धी-पैसा मिळवला तरी क्रिकेटचा अपवाद वगळता इतर खेळांना तेवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत नाही. काही खेळाडूंचं क्षेत्र सोडलं तर त्यापलीकडच्या जनतेला काही देणं-घेणंही नसतं. मग कधी तरी ‘दंगल’सारखे चित्रपट पाहिल्यानंतर प्रेम वाढू लागतं. विजेता होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांची आणि त्यागाची महती इतरांनाही कळते.

त्यामुळे लहान वयात जिथं वयोगटातील स्पर्धा खेळण्याचं वय असतं तिथं, भल्याभल्यांना चीतपट करून ऑलिंपिकपात्रता मिळवणाऱ्या अंशू आणि सोनम आहेत तरी कोण, याची चर्चा सुरू होते आणि या दोघींची माहिती पुढं येते व ती निश्चितच थक्क करणारी असते.

अल्माटी इथं झालेल्या पात्रतास्पर्धेत या दोघींनी आपलं कर्तृत्व दाखवलं; पण दिल्ली ते अल्माटी हा प्रवास जेवढा आव्हानात्मक होता तेवढाच जिद्दही निर्माण करणारा होता. विमानतळावर अनेकजण सेल्फी काढताना दिसतात; पण या दोघींनी मात्र ताश्कंद विमानतळ हा कुस्तीच्या सरावासाठी आखाडा बनवला! ‘इच्छा तिथं मार्ग,’ हे या दोघींनी सिद्ध केलं. या पात्रतास्पर्धेत त्यांचा पराभव झाला असता तर कुणीही त्यांना दोष दिला नसता. ‘आम्हाला पुरेसा सराव करायला संधी आणि वेळ मिळाला नाही,’ अशी कारणं दोघींनी दिली असती तर कुणी टीकाही केली नसती; पण अंशू आणि सोनम यांना ती कारणं द्यायची नव्हती. ऑलिंपिकपात्रता मिळवणं हेच त्यांच्यासमोरचं एकमेव लक्ष्य होतं आणि अशा प्रकारे जेव्हा खेळाडू झपाटलेला असतो तेव्हा परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ध्येयपूर्ती होतेच होते.

ताश्कंद विनानतळावर त्यांना नऊ तास सक्तीचा मुक्काम करावा लागला होता. मग एवढा वेळ करायचं काय? निर्णय पक्का झाला. सरावाचे सूट चढवले गेले आणि जॉगिंग व वॉर्मअप् सुरू झालं. दिल्ली ते ताश्कंद विमानतळ आणि तिथून स्पर्धेचं ठिकाण अस अठरा तासांचा प्रवास होता.

मध्यरात्री पोहोचल्यावर कोरोनाचाचणीची प्रकिया पूर्ण करणं अपरिहार्य होतं. काही तासांचीच झोप मिळाली. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी स्पर्धा आणि त्यात पात्रता मिळवणं हे ऑलिंपिकपदक मिळवण्याच्या आनंदाएवढंच समाधान देणारं आहे. कुस्ती हा वजनी गटाचा खेळ. वजन एका किलोनं वाढलं तरी त्या गटासाठी अपात्र ठरवलं जातं. दिल्लीहून निघताना दोघींचं वजन वाढलेलं होतं. स्पर्धेसाठी वजनचाचणीपूर्वी वजन कमी असावं म्हणूनही त्यांनी विमानतळावर वॉर्मअप् करत घाम गाळला होता. एवढा काटेकोरपणा आणि त्याची समज लहान वयात येणं हे वैचारिक प्रगल्भतेचं लक्षण आहे. कुस्ती हा खेळ केवळ ताकदीनंच नव्हे, तर विचारानंही लढला जातो.

दुश्मनी आणि आता दोस्ती

एकमेकींना साथ देत आंशू आणि सोनम या दोघींनीही मिळवलेली ऑलिंपिकपात्रता आणि त्या प्रवासाची ही कहाणी पाहून, या दोघी किती घट्ट मैत्रिणी असतील असं कुणालाही निश्चितच वाटत असणार. तशी चर्चाही सुरू झालेली आहे. त्या मैत्रिणी आहेतच; पण त्याअगोदर या दोघी एकमेकींच्या कट्टर वैरी होत्या हे ऐकून कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र ते सत्य आहे. फोगटभगिंनीबाबत नेहमीच चर्चा होत असते. हरियानात जवळपास प्रत्येक घरात कुस्तीची परंपरा जपली जाते. त्यात मुलींचा वाढता सहभाग असतो. त्याप्रमाणे अंशू आणि सोनम या शालेय वयापासूनच कुस्तीकडे आकर्षित झाल्या. शाळेत एकाच गटात दोघीही खेळायच्या. त्यामुळे एकमेकींमध्ये नेहमीच स्पर्धा व्हायची. त्याची परिणती शत्रुत्वात झाला. हे शत्रुत्व केवळ खेळापुरतं मर्यादित नव्हतं, तर कुटुंबापर्यंत त्याची झळ पोहोचली. दोघींचे वडीलही एकमेकांना पाण्यात पाहू लागले! एवढंच नव्हे तर, एकमेकांवर फसवणुकीचाही आरोपही करण्यात आला. एखाद्या चित्रपटात शोभावं असं वैर दोन्ही कुटुंबांत निर्माण झालं होतं आणि याला कारण होतं आंशू आणि सोनम यांच्यातील कुस्तीचा संघर्ष!

दोघीही अशाच एकाच गटात खेळत राहिल्या असत्या तर दोघींचंही भलं झालं असतं आणि एकीला कुणाला तरी आशियाई किंवा ऑलिंपिकसारख्या स्पर्धांतून बाहेर जावं लागलं असतं व शेवटी नुकसान देशाचंच झालं असतं. अखेर, तोडगा काढण्यात आला. सन २०१६ च्या राष्ट्रीय शिबिरात या दोघींना रूम-पार्टनर करण्यात आलं आणि तिथं मैत्रीचा पहिला धागा विणला गेला. पुढं दोन्ही कुटुंबं एकत्र झाली आणि दोघींना वेगवेगळ्या गटांत खेळवण्याचा निर्णय झाला. सर्वांना आनंद प्राप्त व्हावा असा क्लायमॅक्स चित्रपटाच्या शेवटी झाला! आणि त्याची फलश्रुती दोघीही ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यात झाली. आता टोकियो ऑलिंपिकमध्ये या दोघींनी पदक जिंकलं तर निश्चितच ‘दंगल : पार्ट २’ असा चित्रपट तयार होऊ शकेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com