कोट्यवधींचे सागरगोटे

सर्कशीमधील विदूषक जोपर्यंत मनोरंज करत असतो तोपर्यंत तो प्रेक्षकांचा लाडका असतोच; पण सर्कशीचा मालकही त्याच्या अदाकारीवर फिदा असतो.
कोट्यवधींचे सागरगोटे
Summary

सर्कशीमधील विदूषक जोपर्यंत मनोरंज करत असतो तोपर्यंत तो प्रेक्षकांचा लाडका असतोच; पण सर्कशीचा मालकही त्याच्या अदाकारीवर फिदा असतो.

सर्कशीमधील विदूषक जोपर्यंत मनोरंज करत असतो तोपर्यंत तो प्रेक्षकांचा लाडका असतोच; पण सर्कशीचा मालकही त्याच्या अदाकारीवर फिदा असतो. मात्र, अचानक कधी लय बिघडली की आणि हाच विदूषक काम न देणारा ठरू लागला की मालक डोळे वटारतो आणि हास्य लोप पावतं. स्वतःचाच चेहरा उदास झाला की समोरच्या प्रेक्षकांनाही तो विदूषक नकोसा होत असतो...आयपीएल हीसुद्धा एक सर्कस आहे! इथं अमाप पैसा आणि प्रसिद्धीही तेवढीच भरघोस. या मायाजालात आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची लढाई प्रत्येक सामन्यात करावी लागते. कुठं कमी पडलात की खेळ खल्लास! कारण, इथं प्रश्न तुमच्यासाठी रित्या केलेल्या पैशाच्या पोत्याचा असतो आणि खेळाडूंच्या भवितव्याचाही असतो.

‘ये सर्कस है तीन घंटे का...’ सर्कस तीन तासांची असते, त्याचप्रमाणे आयपीएलचा एक सामनाही तीन तासांचाच असतो (आता मात्र टाईमपास होऊन वेळ वाढतो हे अलाहिदा!). या तीन तासांत खेळाडूंसाठी संघमालकांनी मोजलेल्या पैशाचा मोबदला द्यायचा असतो. जेवढे जास्त पैसे एखाद्या खेळाडूसाठी मोजलेले असतात तेवढं जास्त दडपण... आणि, त्याच्या ओझ्याखाली दबलात की तेलही जातं आणि तूपही...अशा या चक्रव्यूहात यंदाच्या लिलावात सर्वाधिक, म्हणजेच १५.२५ कोटी मिळालेला,‘मुंबई इंडियन्स’चा ईशान किशन इतका अडकला की, त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वयाच्या तेविसाव्या वर्षीच पणाला लागली आहे. मुळात आयपीएल आणि राष्ट्रीय क्रिकेटची सांगड घातली जात नाही, असं म्हटलं जात असलं तरी, आयपीएलमधील कामगिरी खेळाडूंसाठी अनेक दरवाजे उघडत असते आणि बंदही करत असते. हाच ईशान काही वर्षांपूर्वी ‘मुंबई इंडियन्स’ संघातून केलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघात स्थान मिळवू शकला होता. आता हेच स्थान तो गमावण्याच्या स्थितीत आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत ठळकपणे स्थान असलेल्या अंबानी उद्योग समूहाच्या ‘मुंबई इंडियन्स’नं लिलावातून ईशानला आपल्या संघात घेण्यासाठी जंग जंग पछाडलं आणि सर्वाधिक किंमत मोजली; पण पहिल्या आठ सामन्यांत त्याला १९९ च धावा करता आल्या.

प्रत्येक सामन्यातील त्याची सरासरी २८.५०. ट्वेन्टी-२० मध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला स्ट्राईक रेट १०८.२५ चाच आहे. मुंबई संघाच्या दारुण अपयशाचं पोर्समॉर्टेम होतं तेव्हा ईशानचं अपयश ठकळपणे अधोरेखित होतं आणि त्यापाठोपाठ केवळ आयपीएलच नव्हे तर, व्यावसायिक लीगमध्ये सर्वाधिक किंमत मिळाल्यानंतर तिचा मोबदला देऊ न शकलेल्या खेळाडूंची यादी लांबच लांब होते.

महागड्या मॉरिसचा भ्रमनिरास

सर्वात महागड्या खेळाडूंकडून भ्रमनिरास होणं हे नित्याचंच असतं. गतवेळी मिनी लिलाव असला तरी दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने १६ कोटी २५ लाख मोजले होते. आयपीएलमधला आजवरचा हा विक्रम आहेड; पण २०२१ च्या मोसमात मॉरिसला तीन सामन्यांतून वगळण्याची वेळ आली होती. त्यातील ११ सामन्यांत त्याला १४ विकेटच मिळवता आल्या आणि फलंदाजीत ६७ धावाच करता आल्या होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्याचा राजस्थान संघ आठ संघांत सातवा आला होता.

सुपरस्टार युवराजही अपयशी

आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक किंमत कधीकाळी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत एका षटकात सहा षटकार मारणाऱ्या युवराजला मिळाली होती. सन २०१५ मध्ये दिल्ली संघानं १६ कोटी मोजले होते; पण युवराजला १४ सामन्यांत २४८ धावा करता आल्या होत्या. प्रत्येक सामन्याची सरासरी १९.०७ इतकीच होती आणि दिल्ली संघाला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. थोडक्यात काय तर, सर्वाधिक किंमत मिळालेले खेळाडू त्या किमतीचा पुरेपूर मोबदला देऊ शकलेले नाहीत.

विराट, रोहितही अपवाद नाहीत

विराट कोहली आणि रोहित शर्मा पांढऱ्या चेंडूवरील क्रिकेटमधील ‘दादा फलंदाज’. अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम नावावर असलेले असे हे सुपरस्टार फलंदाज; पण यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांना मिळणारं मानधन आणि त्यांनी दिलेल्या धावांचं ‘मोल’ यांचा मेळ बसूच शकत नाही.

  • विराट कोहली - १५ कोटी - ९ सामन्यांत १२८ धावा.

  • रोहित शर्मा - १६ कोटी - ८ सामन्यांत १५३ धावा.

मेस्सी, रोनाल्डोही....

व्यावसायिक लीगचा विचार केला जातो तेव्हा फुटबॉलचा प्राधान्यक्रम सर्वात वरचा असतो आणि आघाडीवर असतात ते लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो. सर्वाधिक गोलांचे, हॅटट्रिकचे अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत; पण सध्याची आकडेवारी निराशाच करणारी आहे. ‘बार्सिलोना’शी नातं संपलेला मेस्सी ‘पीएसजी’ संघात दाखल झाला, तर रोनाल्डोनं पुन्हा ‘मँचेस्टर युनायटेड’ची वाट धरली; पण त्यांचे संघ ‘चॅम्पियन्स लीग’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अगोदरच गारद झाले. त्यांच्यासाठी मोजलेलं कोट्यवधी डॉलरचं मुसळ केरातच गेलं.

  • लिओनेल मेस्सी - पीएसजी संघ - ३० सामने - ९ गोल

  • ख्रिस्तियानो रोनाल्डो - (मँचेस्टर युनायटेड २०२१-२२ मध्ये) - ३५ सामने - २२ गोल

‘प्रो कबड्डी’तही तेच चित्र

भारतात आयपीएलनंतर दुसरी सर्वात लोकप्रिय लीग म्हणजे प्रो कबड्डी. इथं कोटींचा नसला तरी लाखांचा पाऊस पडत असतो. पहिला लखपती मोनू गोयत याला सर्वाधिक म्हणजे एक लाख ५१ हजार रुपये मिळाले होते; परंतु त्याच मोसमात त्याच्या कामगिरीचा आलेख झपाट्यानं खाली आला होता. प्रदीप नरवाल तर विक्रमांचा बादशहा समजला जातो. त्यासाठी ‘यूपी-योद्धा’ या संघानं एक लाख ६५ हजार मोजले; पण काही सामन्यांत त्याला वगळण्याचीही वेळ आली होती. एकूणच, त्याच्या चढायांची सरासरी ४० टक्के इतकीच होती, म्हणजेच २४ सामन्यांत १८८ गुण. याच प्रदीपनं गेल्या मोसमात ३०२ गुण कमावले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com