वर्कलोडची ऐशीतैशी | Cricket | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket
वर्कलोडची ऐशीतैशी

वर्कलोडची ऐशीतैशी

sakal_logo
By
शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

भारतीय क्रिकेट ही बीसीसीआयसाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी होती आणि राहणार आहेच. याच बीसीसीआयकडून बोध घेत आयसीसीनं जणू काही ‘पोल्ट्री’च तयार करण्याचा घाट घातला आहे! एक मालिका संपली की दुसरी मालिका तयारच असते. खेळाडूंना श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. अंडं तयार व्हायला ठराविक कालावधी लागत असतो; पण बीसीसीआयनंतर आता आयसीसीलाही थांबायला वेळ नाही. संपूर्ण भूतलावर सर्वाधिक लोकप्रिय असलेलं फुटबॉल वर्षभर सुरू असतं; परंतु आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे कार्यक्रम सोडल्यास व्यावसायिक लीगचे सामने साधारणतः शनिवारी-रविवारी असे वीकेंडला होत असतात. मात्र, क्रिकेटचं तसं नाही. वीकेंड महत्त्वाचाच; पण आठवड्याच्या कोणत्याही दिवशी क्रिकेटच्या सामन्यांची रेलचेल सुरूच असते. आता हेच पाहा ना.

प्रतिष्ठेची ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा आखातात पार पडली. रविवारी अंतिम सामना झाला. न्यूझीलंडचा संघ तो अंतिम सामना खेळला आणि बुधवारी त्यांनी भारतात येऊन पहिला ट्वेन्टी-२० सामनाही खेळला. इतकंच नव्हे तर, आजच्या रविवारी ते तिसरा सामना खेळणार आहेत, म्हणजे रविवार ते रविवार एका आठवड्यात दोन देशांत मिळून ते एकूण चार सामने खेळणार आहेत. एकीकडे सामन्यांच्या अतिरेकासंदर्भात सर्वत्र ओरड केली जात असताना न्यूझीलंडबाबत हे अतीच झालं आहे. भारतीय संघाचं आव्हान साखळीत संपुष्टात आल्यामुळे त्यांना एका आठवड्याची जास्त विश्रांती मिळाली एवढंच.

वर्ल्ड कपनंतर भारत-न्यूझीलंड मालिका अगोदरपासून नियोजित होती. ती अखेरच्या क्षणी तयार केली नव्हती हे खरं असलं तरी बहुराष्ट्रीय स्पर्धांनंतर कोणत्याही द्विपक्षीय मालिकेचं नियोजन करताना सर्वसाधारण विचार करणं अपेक्षित आहे. बहुराष्ट्रीय स्पर्धांचं नियोजन आयसीसी करत असतं.

दोन देशांच्या मालिका कशा आणि किती सामन्यांच्या आयोजित करायच्या याचे अधिकार जरी दोन देशांचे असले तरी आयसीसीच्या मान्यतेनंच ते होत असतं. आता क्रिकेटमालिका किंवा स्पर्धा या सोन्याचं अंडं देणाऱ्या आहेत हे उघड आहे; पण कुठंही मर्यादेचं उल्लंघन होत नाही ना यावर लक्ष ठेवणं, थोडक्यात सोन्याच्या अंड्याच्या हव्यासापायी कोंबडीच कापण्याचा प्रयत्न होणार नाही ना यावर आयसीसीनं लक्ष ठेवणं आवश्यक आहे; पण तसं आता होताना दिसत नाही...

कोरोनानं बदललं चक्र

कोरोनामुळे सर्व चक्र बदललं आहे. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा पुढं ढकलाव्या लागल्या. दर दोन वर्षांनी होणाऱ्या स्पर्धांमध्ये आता झालेल्या स्पर्धेत आणि पुढच्या स्पर्धेत ११ महिन्यांचं अंतर राहिलं आहे. कधीही न अपेक्षिलेली परिस्थिती आल्यामुळे दोन स्पर्धांमधल्या या बदलावर कुणीही आक्षेप घेणार नाही; पण कोरोनामुळे साधारणतः एक वर्ष खंडित राहिलेल्या द्विपक्षीय मालिका आता पाठोपाठ घेण्याच्या घाईत खेळाडूंचा विचार केला जाणार की नाही? आखातातील वर्ल्ड कपनंतर लगेचच भारतात न्यूझीलंडविरुद्धची मालिका होत आहे, तर बांगलादेशामध्ये पाकिस्तानविरुद्धची मालिका सुरू झाली आहे. तिकडे ऑस्ट्रेलियात प्रतिष्ठेची अॅशेस मालिका होणार आहे; पण वर्ल्ड कपचा अंतिम सामना आणि अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना यांमध्ये पुरेसं अंतर ठेवण्यात आलं आहे. असंच नियोजन अपेक्षित आहे; पण विचार करतो कोण?

साधारणतः आयपीएल सुरू झाल्यानंतर भारतात क्रिकेटच्या अतिरेकाबाबत बोललं जाऊ लागलं. पूर्वी मार्चच्या मध्यावर रणजी स्पर्धेचा अंतिम सामना व्हायचा आणि भारतातील क्रिकेट थांबायचं. त्यातही भारतीय संघ कधी तरी, एक तर इंग्लंडच्या किंवा वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर, तेही मे महिन्यात, जायचा. मात्र, २००८ पासून आयपीएलनं रणरणत्या उन्हात एप्रिल-मे हा आपला कालावधी निश्चित केला आणि त्यानंतर इंग्लंडदौरा असला की किंवा तिथं बहुराष्ट्रीय स्पर्धा असली की सर्वात दमछाक झालेली असते ती भारतीय संघाचीच आणि त्याचा परिणाम खेळाडूंच्या तंदुरुस्तीवरही होत असतो.

लोढांची शिफारस बेदखल

भारतीय क्रिकेट मंडळाच्या कारभाराची साफसफाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं न्यायमूर्ती लोढा यांची नियुक्ती केली होती. त्यांनी प्रशासनाइतकाच खेळाडूंचाही विचार केला होता. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या, त्यातील एक शिफारस, आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होण्याच्या १५ दिवस अगोदर तरी आयपीएल संपायला हवी, अशी होती. ही शिफारस सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारलेलीही आहे; पण अपूर्ण राहिलेल्या आयपीएलचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी झाली आणि ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील भारताचा सलामीचा सामना २४ ऑक्टोबर रोजी झाला. लोढांच्या या शिफारशींसह खेळाडूंवर येणारा ताण याचीही ऐशीतैशी झालीच.

खेळाडू हे यंत्रं नाहीत...

भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेणारे राहुल द्रविड यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ‘खेळाडू हे काही यंत्रं नाहीत, त्यांच्यावर येणारा ताण टाळण्यासाठी सामन्यांचं नियोजन अचूक करावं लागेल,’ असा मुद्दा मांडला. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनीही कर्णधारपदाची आणि प्रशिक्षकपदाची सूत्रं घेतली त्या वेळी त्यांनीही, दोन मालिकांमध्ये पुरेशी विश्रांती हवी, असा मुद्दा त्यावेळच्या प्रशासकीय समितीसमोर मांडला होता. शास्त्री काय किंवा द्रविड काय, हे प्रथितयश खेळाडू आहेत. खेळाडूंना कधी आणि किती विश्रांती हवी हे ते जाणतात. एवढंच कशाला, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हेही पूर्वी कर्णधारपदी होते; त्यांनीसुद्धा सततचे सामने आणि विश्रांती ही ‘परिक्रमा’ पूर्ण केली आहे. क्रिकेटच्या बाजारात सामन्यांची मागणी वाढत असताना गांगुलीसुद्धा हतबल असल्याचं दिसून येत आहे.

‘वाढती मागणी’ हे सत्य

आता ‘वाढती मागणी’ हे सत्य स्वीकारावं लागेल. आखातातील वर्ल्ड कपची स्पर्धा संपत असताना ‘खेळाडूंवरील वर्क लोड’ हा मुद्दा अधिक प्रमाणात चर्चिला जात असला तरी काही दिवसांतच आयसीसीनं सन २०२३ ते २०३१ या आठ वर्षांतील दोन्ही विश्वकरंडक आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धांचं वर्ष आणि ठिकाण जाहीर केलं. या कार्यक्रमाचा अभ्यास केला असता, एक गोष्ट सिद्ध होते व ती म्हणजे, प्रत्येक वर्षात एक तरी बहुराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. थोडक्यात काय तर, आयसीसीनं त्यांच्या प्रायोजकासाठी आणि ब्रॉडकास्टरसाठी ‘मागणी तसा पुरवठा’ करण्याचा आपला ‘शब्द’ पाळला. आता खेळाडूंनी आणि त्यांच्या देशाच्या क्रिकेट मंडळांनी हा ‘पुरवठा’ करताना, आपण किती श्रम घ्यायचे, याचं नियोजन करायचं आहे.

त्रयीवर मोठी जबाबदारी

एखाद्या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघ अपयशी ठरला की वर्कलोडचा मुद्दा प्रकर्षानं चर्चेत येतो. अन्यथा सगळे मुद्दे झाकले जातात. आताही यंदाच्या वर्ल्ड कपमधील अपयशानंतर हे घडलं आहे. अचूक अशा परिपूर्ण नियोजनासाठीची वेळ अजूनही गेलेली नाही. सुदैवानं भारतीय क्रिकेटसाठी नव्या आणि गुणवत्ताधारी खेळाडूंचा ओढा वाहता आहे.

एकीकडे सौरव गांगुली अध्यक्ष, दुसरीकडे राहुल द्रविड मुख्य संघाचे प्रमुख प्रशिक्षक आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख (ही जबाबदारी लवकरच निश्चित होणार आहे) असे भारतीय क्रिकेटचे तीन महान खेळाडू प्रशासनात असताना स्पर्धांचं, मालिकांचं अचूक नियोजन करणं सहज सोपं आहे.

सन २००१ मध्ये कोलकत्याच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मण-द्रविड यांनी इतिहास घडवला होता. अशक्य ते शक्य करून दाखवणाऱ्या त्या संघाचा गांगुली सेनापती होता. खेळाडूंवरील वर्कलोडची ऐशीतैशी होणार नाही याची काळजी आता ही त्रयी घेईल ही अपेक्षा.

loading image
go to top