
घडलेली एखादी घटना प्रतिकूल असली तरी तिच्यातच सुसंधीही दडलेली असते, अशा आशयाचा A blessing in disguise हा इंग्लिशमधला वाक्प्रचार फार प्रसिद्ध आहे.
घडलेली एखादी घटना प्रतिकूल असली तरी तिच्यातच सुसंधीही दडलेली असते, अशा आशयाचा A blessing in disguise हा इंग्लिशमधला वाक्प्रचार फार प्रसिद्ध आहे. इंग्लंडचा सध्याचा फॉर्मात असलेला फलंदाज जॉनी बेअरस्टॉ याला हा वाक्प्रचार वारंवार आठवत असेल आणि इतरांनाही तो वाक्प्रचार प्रेरणादायक ठरायला हरकत नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये हरवलेला फॉर्म आणि त्यातच इंग्लंडच्या १२ कसोटींतून खेळण्यासाठी मिळालेला अवघा एक सामना...परिणामी, कसोटीतील वार्षिक करारात त्याला स्थान न मिळणं यामुळे नाराजी असणं स्वाभाविक; पण त्याचं दुःख करत बसण्याऐवजी तो संधी शोधत राहिला आणि ती मिळताच त्यानं कसोटी संघातील आपली जागा ध्रुवासारखी - सध्या तरी - अढळ केली! गेल्या पाच कसोटी डावांत चार मॅचविनिंग शतकं करूनही ज्या इंग्लंड क्रिकेट मंडळानं त्याला करार नाकारला, त्या मंडळालाच त्यानं आता करार घेऊन आपल्या मागं धावायला भाग पाडलं आहे. याला म्हणतात, प्रतिकूल परिस्थितीत हतबल न होता त्वेषानं लढून आपलं कर्तृत्व सिद्ध करणं.
बेअरस्टॉ याची गणना अव्वल खेळाडूंत तशी कधीच केली जात नव्हती. उदाहरणच द्यायचं तर, सध्याचे टॉप खेळाडू विराट कोहली, बाबर आझम, ज्यो रूट किंवा स्टीव स्मिथ हे आहेत. अशा खेळाडूंच्या पंक्तीत बेअरस्टॉ कधीच नव्हता; पण ‘टॉप खेळाडू’ आणि ‘उपयुक्त खेळाडू’ अशा दोन वर्गवारी असतात. अर्थात् संघाच्या लेखी ‘उपयुक्त खेळाडू’ हे ‘टॉप खेळाडूं’पेक्षा सर्वस्व असतात; कारण, ते संकटनिवारक असतात. बेअरस्टॉ तिन्ही प्रकारांत खेळतो म्हणून त्याचं महत्त्व ‘टॉप खेळाडूं’पेक्षा अधिक आहे.
मुळात प्रतिकूल परिस्थितीला संधी समजण्याची वृत्ती नसानसात भिनलेली असेल तर, कोणतेही अडथळे येऊ द्या, ते पार करण्याची खात्रीच संबंधित खेळाडूला असते. हुकमी खेळाडू जॉस बटलर पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज असल्यामुळे बेअरस्टॉचा विचार बटलर नसताना व्हायचा. अशात त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संधी मिळाली आणि त्यानं दोन शतकं केली. त्यातील ९२ चेंडूंतील १३६ धावांची खेळी ट्वेन्टी-२० प्रकारास साजेशी होती.
कोहलीचं स्लेजिंग पथ्यावर
आता दुसरा प्रसंग पाहू या...बर्मिंगहॅम इथल्या कसोटीत इंग्लंडनं भारताचा पराजय केला. विजय-पराजय यांच्या दोन टोकांमध्ये बेअरस्टॉ उभा राहिला. इंग्लंडचा निम्मा संघ शंभरीच्या आतच गारद झालेला असताना बेअरस्टॉनं १०६ धावांची तुफानी खेळी केली; तीमुळे भारताला १३२ धावांच्या आघाडीवर समाधान मानावं लागलं इत्यादी...पण बेअरस्टॉच्या १४० चेंडूंत १०६ धावा ही एक बाजू झाली; पण दुसरी बाजू अधिक लक्षात घेण्यासारखी आहे. याच इनिंगमध्ये बेअरस्टॉ महंमद शमीच्या गोलंदाजीवर सुरुवातीला फारच चाचपडत होता. त्याचं नशीब बलवत्तर; नाही तर, पाच ते सहा वेळा तो बाद झाला असता, इतक्या वेळ चेंडू बॅटच्या अगदी बाजूनं जात होता. ही स्थिती पाहून स्लिपमध्ये उभा असलेल्या विराट कोहलीला स्वस्थ उभं राहवत नव्हतं. त्यानं बेअरस्टॉला खिजवण्यास सुरुवात केली. खिजवण्याचं प्रमाण अती झालं तेव्हा समोरचा फलंदाज बेन स्टोक्स आणि पंच अलीम दार यांना हस्तक्षेप करावा लागला; पण हीच प्रतिकूल परिस्थिती बेअरस्टॉनं आपल्या बाजूनं वळवली आणि अशी काही ‘तोडफोड’ फलंदाजी केली की, त्याचा स्ट्राईक रेट १५० च्या आसपास गेला. समोर आलेला चेंडू तो तडकावतच राहिला. थोडक्यात काय तर, कोहलीचं स्लेजिंग त्याच्या पथ्यावर पडलं आणि पुढं इंग्लंडच्या विजयाचा इतिहास घडला.
येणारी नवी पिढी अगोदरच्या दिग्गज खेळाडूंकडून प्रेरणा घेत असते. मात्र, काही खेळाडू असेही असतात, ज्यांच्या नावावर कदाचित् मोठे विक्रम नसतील किंवा अधिक सामने खेळण्याची संधीही त्यांना मिळालेली नसेल; मात्र, त्यांनी उमटवलेला ठसा आणि दाखवलेली जिद्दच प्रेरणेचा स्रोत ठरते.
क्रीडा मानसशास्त्र दुसरंं काय असतं? बेअरस्टॉसारखी उदाहरणं मनावर बिंबवून ठेवली की, ती अपयशातूनही मार्ग काढण्याची स्फूर्ती देत असतात.
वडिलांचंही दुःख पचवलं...
बेअरस्टॉला घरातूनच क्रिकेटचा वारसा मिळालेला आहे. त्याचे वडील डेव्हिड बेअरस्टॉ हे यष्टिरक्षक-फलंदाज होते आणि तेसुद्धा इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळले होते. वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न या मुलानं पूर्ण केलं; पण या प्रवासातही त्याला दुःखांचा डोंगर पार करावा लागला. वयाच्या सेहेचाळिसाव्या वर्षी वडीस डेव्हिड यांनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. पत्नीचं आजारपण, आर्थिक अडचणी, मद्य पिऊन गाडी चालवल्याचे आरोप आणि दुखापती अशा संकटांमुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडून गेलं होतं आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केली. जॉनी त्या वेळी दहा वर्षांचा होता; पण वडिलांच्या अशा प्रकारे जाण्याचं दुःख त्यानं पचवलं. कदाचित् हा प्रसंगच त्याला कणखर बनवणारा ठरला असावा.
सन २००७ मध्ये ‘विस्डेन स्कूल सर्वोत्तम क्रिकेटपटू’चा पुरस्कार मिळवल्यानंतर २०११ मध्ये त्याला इंग्लंडच्या एकदिवसीय संघात स्थान मिळालं. ज्या कसोटीसाठी त्याला वार्षिक करार नाकारण्यात आला, त्याचे ८७ सामने तो खेळला आहे. शिवाय, ८९ एकदिवसीय आणि ६३ ट्वेन्टी-२० सामने, म्हणजे बेअरस्टॉची वाटचाल दिग्गज खेळाडू होण्याच्या दिशेनं सुरू आहे.
कोहलीनं प्रेरणा घ्यावी!
खेळात खरं तर कधी तुलना करायची नसते; कारण, प्रत्येकाची स्टाईल वेगळी आणि आव्हानं वेगळी. मात्र, ज्या बेअरस्टॉला कोहलीनं खिजवलं त्याच्याचकडून एक खेळाडू म्हणून कोहलीनं प्रेरणा घ्यायला हरकत नाही. कोहली हा कितीही महान खेळाडू असला तरी त्याचं सध्याचं अपयश भारतीय संघासाठी चिंतेचं ठरत आहे. सर्व बंधनांपेक्षा दडपण झुगारून नवा बेअरस्टॉ पुढं आला, तसा कोहलीचा ‘विराट’ अवतारही भारतीय संघासाठी भल्याचाच ठरू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.