पॉलीकाका... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kieron pollard

पोलार्ड आयपीएलमधून निवृत्त झाला आणि पॉलीकाका हे शब्द भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा गुंजले.

पॉलीकाका...

खरंतर पॉलीकाका हे नाव भारतीय क्रिकेटला सुपरिचित आहे ते पॉली उम्रीगर यांच्यामुळे. मुंबईकर आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार असलेल्या उम्रीगर यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे जुन्या काळात चांगला ठसा उमटवला होता. निवृत्तीनंतर बीसीसीआय प्रशासनात कार्य केल्यानंतर ते मुंबई क्रिकेटसाठी योगदान देत होते. वांद्रे-कुर्ला संकुलात उभ्या असलेल्या शरद पवार अकादमीच्या खेळपट्टीसह अनेक मैदानांच्या खेळपट्ट्या त्या वेळी उम्रीगर यांनी तयार केल्या होत्या. भारतीय क्रिकेटमध्ये त्यांना आदराने पॉलीकाका म्हणून संबोधलं जायचं. याच भारतीय क्रिकेटच्या आयपीएलमध्ये हेच नाव हळूहळू पोलार्डला कधी मिळालं, हे त्यालाही माहीत नसेल.

पोलार्ड आयपीएलमधून निवृत्त झाला आणि पॉलीकाका हे शब्द भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा गुंजले. (तशी निवृत्त होण्याची वेळ गेल्याच वर्षी आली होती, मुंबई इंडियन्सच्या अखेरच्या अनेक सामन्यांत त्याला खेळवलं नव्हतं.) पोलार्ड हा वेस्ट इंडीजचा माजी कर्णधारही होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केला; पण तेव्हा त्याची चर्चा झाली नव्हती, तेवढी आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यावर झाली, त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलचं महत्त्व अधोरेखित झालं.

काय गंमत आहे पहा... ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला पुन्हा एकदा अपयश आल्यानंतर सर्वत्र टीका झाली. काहींनी थेटपणे आयपीएलला दोषी धरलं, त्यापेक्षा आयपीएलमधून भारतीय क्रिकेटचं किती भलं झालं यावर भाष्य केलं. ऑस्ट्रेलियातून आपले सर्व खेळाडू परतले नसतील तेवढ्यात आयपीएलच्या लिलावाची घडामोड सुरू झाली. पोलार्डची निवृत्ती हा त्यातीलच भाग. कोणीही निंदा कोणीही वंदा... आयपीएल हाच मोठा धंदा, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील अपयश कधी विस्मृतीत जाईल हे समजणारही नाही. असो, आयपीएलमध्ये देश-विदेशांतील असंख्य खेळाडू खेळले. आयपीएलमधून मिळणाऱ्या गलेलठ्ठ राशींनी श्रीमंत झाले. काही राव झाले तर काही रंक! त्याच वेळी आपला ठसा अनंतकाळ कोरणारे खेळाडू झाले; पण ‘लॉर्ड’ होणारे मोजकेच पोलार्ड झाले.

सलग १३ वर्षं आयपीएल खेळणं म्हणजे सर्वांत मोठी कारकीर्द ! काहींची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही एवढी मोठी नसते. अशा व्यावसायिक लीगमध्ये कधी या संघात तर कधी दुसऱ्या संघात. जिथे पैसे चांगले मिळतील तिथे आपली निष्ठा. पण पोलार्ड आयपीएलमध्ये खेळला तो केवळ मुंबई इंडियन्सकडूनच. सचिन तेंडुलकर - मुंबई इंडियन्स, महेंद्रसिंह धोनी - चेन्नई सुपर किंग्ज, विराट कोहली - रॉयल चॅलेंजर्स बंगळूर अशी समीकरणं कोरली गेली आहेत. यांच्या पंक्तीत पोलार्ड आहे. अगदी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही सुरुवातीला डेक्कन चार्जस संघातून खेळला होता, नंतर तो मुंबई संघात आला. म्हणून नावाजलेल्या खेळाडूंमध्ये नाव घ्यायचं असेल, तर ते पोलार्डचंच असेल.

कसा सुरू झाला प्रवास...

आयपीएल २००८ मध्ये सुरू झाली आणि पोलार्ड दोन वर्षांनंतर मुंबई इंडियन्स संघाचा शिलेदार झाला. हा खेळाडू आपल्या संघात हवाच यासाठी मुंबई इंडियन्सने चंगच बांधला होता आणि त्याला कारणही तसंच होतं. २००९ मध्ये चॅम्पियन्स लीग झाली होती. म्हणजे विविध देशांत होणाऱ्या लीग- ‘ ट्वेन्टी -२०’ स्पर्धांतील संघांची ही स्पर्धा. त्यात वेस्ट इंडीजकडून त्रिनिनाद-टोबॅगो हा संघ खेळत होता, त्यातून पोलार्ड आपली गुणवत्ता दाखवत होता. मुंबई इंडियन्सच्या मालकांनी हा हिरा ओळखला आणि २०१० मध्ये लिलाव झाला तेव्हा आपली सर्व ताकद पणास लावली होती. पोलार्डसाठी चेन्नई आणि बंगळूर संघांनीही तेवढ्याच ताकदीची बोली लावली. अखेर जास्तीत जास्त रकमेवर टाय झाली. त्यानंतर ‘सायलेंट टायब्रेकर’ या प्रकारात मुंबई इंडियन्स बाजी मारणार हे स्वाभाविक होतं. या टायब्रेकरमध्ये कितीही मोठी रक्कम दिली जाऊ शकते, ती उघड होत नाही.

आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी पोलार्डला काही काळ द्यावा लागला; पण टोलेजंग षटकार मारणारी त्याची बॅट तळपल्यानंतर भल्या भल्या गोलंदाजांचे त्याने हाल केले. २०१० च्या स्पर्धेत बंगळूरविरुद्ध १३ चेंडूंत ४५ धावांचा पाऊस पाडल्यानंतर आपल्यासाठी मोजलेली किंमत वाजवी होती हे सिद्ध केलं. पण याच स्पर्धेतील चेन्नईविरुद्धच्या अंतिम सामन्यात आव्हान कठीण होत असताना पोलार्डला फलंदाजीस का उशिरा पाठवलं, हे कोणालाच समजलं नाही. योग्य वेळी त्याला फलंदाजीस पाठवले असतं तर मुंबईच्या गळ्यात पहिल्यांदा विजेतेपदाची माळ पडली असती.... असो, अशा गोष्टी आयपीएलमध्ये घडत असतात. पुढे जाऊन पोलार्डने अनेक सामन्यांत मुंबईला एकहाती विजय मिळवून दिले; परंतु गेल्या काही वर्षांत ही सरासरी कमी होत गेली. मोसमातील एक ते दोन सामनेच जिंकून द्यायचा, तरीही तो संघाला हवाहवासाच वाटायचा.

वादग्रस्त तरीही...

पोलार्ड हा अवलियाच होता. स्टेडियमच्या बाहेर षटकार मारण्याची जेवढी ताकद आणि आक्रमकता त्याच्याकडे होती तेवढीच ती स्वभावातही होती. कधी डोक्याची तार सणकेल याचा नेम नसायचा. अधिक बडबड केल्यामुळे पंचांनी तंबी दिली, त्यामुळे ही स्वारी क्षेत्ररक्षणासाठी तोंडावर मोठी पट्टीच लावून आली होती. असा प्रकार क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला असावा. हे कमी की काय, तर एकदा बंगळूर संघातून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कच्या दिशेने रागारागाने बॅट फेकली; पण नेम जमिनीच्या दिशेने ठेवल्यामुळे अनर्थ टळला होता. पोलार्डचं हे वागणं मुंबईला भारीच पडायचं, त्यामुळे फेअर प्ले पुरस्कारात ते वरच्या क्रमांकावरून कधी तळात यायचे हे कळायचंही नाही. तरीही मुंबई इंडियन्सचे मालक आणि संघ व्यवस्थापन पोलार्डला सांभाळून घ्यायचे. निष्ठा असावी तर अशी आणि प्रेम असावं तर असं, म्हणूनच खेळाडू म्हणून निवृत्त झाला तरी फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून पोलार्ड मुंबई इंडियन्स संघासोबत राहणार आहे. ही इनिंगही मोठी असणार आणि पॉलीकाका हे नाव यापुढेही कायम राहणार यात शंका नाही.