फुटबॉलचं मैदान की राजकीय रणांगण

खेळाला शांततेचं प्रतीक म्हणूनही संबोधलं जातं. इथं गुणवत्ता, क्षमता, परिश्रम आणि धैर्याची कसोटी लागतेच. प्रत्येक जण आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा हिरिरीने प्रयत्न करत असतो.
Fifa Football Competition
Fifa Football CompetitionSakal
Summary

खेळाला शांततेचं प्रतीक म्हणूनही संबोधलं जातं. इथं गुणवत्ता, क्षमता, परिश्रम आणि धैर्याची कसोटी लागतेच. प्रत्येक जण आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा हिरिरीने प्रयत्न करत असतो.

खेळाला शांततेचं प्रतीक म्हणूनही संबोधलं जातं. इथं गुणवत्ता, क्षमता, परिश्रम आणि धैर्याची कसोटी लागतेच. प्रत्येक जण आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा हिरिरीने प्रयत्न करत असतो. जो जिंकतो तो सिकंदर होतो... हरणारा हिरमुसला होत असला तरी खेळ जिंकत असतो. शेवटी या खेळातून स्पर्धात्मक क्षमतेचा इतिहास लिहिला जात असला तरी, मित्रत्वाचे धागेही गुंफले जात असतात. मग ते वैयक्तिक असो वा देशपातळीवरचे सांघिक असोत. कधी कधी राजकीय वैराचेही हिशेब चुकते केले जात असतात; पण ते अपवादानेच असतात. शेवटी खिलाडूवृत्ती हाच मुख्य गाभा. हा खिलाडूपणा विजयाने सन्मान वाढवतो; पण पराभवाने खचून जायचं नाही, नव्या उमेदीने नवी सुरुवात करायची, याचंही स्फुल्लिंग फुलत जातं.

..पण काळ बदलतो तसा विचारही बदलतो, यापेक्षा काही वेळा करण्यात येणारी कृती सौजन्याची ऐशीतैशीही करणारी ठरते. या भूतलावर असंख्य देशांत असंख्य स्पर्धा-शर्यती होत असतात; पण अख्ख्या जगाला एकत्र आणते आणि मैत्रीच्या धाग्यात गुंफते ती पाच खंड एकात एक गुंतलेलं बोधचिन्ह असलेली ऑलिंपिक आणि विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा! फुटबॉलची महतीच एवढी महान आहे की, तिच्या या विश्वकरंडक स्पर्धेला भूतलावरचा एक मोठ्ठा महामेळा म्हणूनही पाहिलं जातं.

जी-७ या सर्व शक्तिमान देशांच्या परिषदांमध्ये पॉवरफुल नेते एकत्र येऊन जगासाठी नवे विचार, नवी दिशा ठरवतात, म्हणून राजकीय दृष्टिकोनातून जी-७ परिषदेला फार महत्त्व असेल; पण दर चार वर्षांनी होणारी ऑलिंपिक आणि विश्वकरंडक फुटबॉल सृजनशीलता आणि मैत्रीचा नवा संदेशही करत असते. प्रत्यक्ष मैदानावर खेळणारे पाचपंचवीस खेळाडू असतील; पण त्यांच्यासोबत अख्खा देश खेळत असतो... आणि मग अशा संधीचा एका वेगळ्या कृतीसाठी फायदा घेतला जातो तेव्हा मात्र याच मैदानाचं रणांगणात रूपांतर होतं.

अशा अनन्यसाधारण लोकप्रियता, उत्सुकता आणि चुरस असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतून राजकीय आणि सामाजाचं लक्ष वेधून घेण्याची कृत्यं जाणते आणि अजाणतेपणी केली जातात, तेव्हा मात्र मिठाचा खडा पडतो. तसा तो कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पडला आहे. समलैंगिक समाजाला दर्शविण्यात येणारा पाठिंबा असो वा चक्क दुसऱ्या देशाची सीमा आपल्या देशात समावेश करणारा नवा राष्ट्रध्वज झळकावण्याचा असो, अशा कृत्यांमध्ये काही काळासाठी का असेना, मूळ स्पर्धा बाजूला पडते.

विश्वकरंडक स्पर्धेत ३२ देश खेळत (पात्र ठरलेले) असले तरी फिफाच्या सदस्य देशांची संख्या २०० च्या पलीकडे आहे आणि सदस्य नसलेल्या अनेक देशांतही फुटबॉलची क्रेझ तेवढीच मोठी आहे, त्यामुळे अख्खं जग स्पर्धेच्या महिनाभराच्या काळात फुटबॉलमय झालेलं असतं आणि मग अशा वेळी हीच ती संधी आणि हीच ती वेळ असा विचार काही जण करतात आणि जगाचं लक्ष वेधून घेतात. हे योग्य की अयोग्य याकडे कोणत्या चष्म्यातून पाहिलं जातं यावर महत्त्व ठरत असतं. दखल किती घेतली जाते हा त्यानंतरचा विषय; पण आपला निषेध दर्शवला यातच धन्यता असते.

कतारमध्ये होत असलेल्या या विश्वकरंडक स्पर्धेत वेगवेगळ्या बाबतीतले निषेध दर्शवण्याचे अनेक प्रकार घडले. मुळात कतारला स्पर्धेचं आयोजन देण्यावरूनच वाद सुरू झाले. मानवी हक्कांपासून ते समलिंगी संबंध मान्यता आणि मद्यविक्रीपर्यंत असे अनेक विषय मेस्सी, रोनाल्डो यांनी किती गोल केले, कोणी धक्कादायक निकाल लावले यापेक्षा चर्चेत आले. कतारला पहिल्यापासून होणारा विरोध लक्षात घेऊन फिफाने अगोदरपासूनच कंबर कसली होती. जणू काही तंबीच दिली होती म्हणायला हरकत नाही. तरीही इंग्लंडच्या खेळाडूंनी आर्मबँड घालून आम्ही जगाचं लक्ष वेधणार असा पण केला होता आणि त्यांच्यासोबत वेल्स, बेल्जियम, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स आणि स्वित्झर्लंड या देशांचेही खेळाडू होते.

प्रेक्षकांचाही बिनधास्त पुढाकार

या स्पर्धेसाठी प्रेक्षकांसाठीही मोठी आणि कडक नियमावली आहे, तरीही पोर्तुगाल-उरुग्वे यांच्यातील सामन्यात कडक सुरक्षा असतानाही इटलीच्या मारिओ फेरी नावाच्या प्रेक्षकाने घुसखोरी केली. मानवी हक्कांपासून इराणमधील स्त्रियांना स्वातंत्र्य द्या, इथपासून ते रशियाच्या आक्रमणापासून युक्रेनला वाचवा असा संदेश देणारा टीशर्ट परिधान करून तो मैदानात आला. ३० सेकंद तो मैदानात होता. नंतर त्याला सुरक्षारक्षकांनी बाहेर काढलं; पण या ३० सेकंदांत त्याने सामन्याच्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जगाचं लक्ष वेधलं. विशेष म्हणजे २०१४ मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतही तो मैदानात आला होता आणि ब्राझीलमधील गरीब मुलांकरिता अशा प्रकारचा संदेश दिला होता.

सर्बियाचा विद्वेष

संदेश देणारी काही कृत्यं ही समाजाच्या कल्याणासाठी लक्ष वेधणारी असतात, त्यामुळे फेरीसारखे लोक हिरो ठरत असतात. जगात इतरत्र सुरू असलेल्या घटनांची माहिती याद्वारे इतरांनाही कळते, त्यामुळे फेरीसारख्या व्यक्तींवर किरकोळ कारवाई करून सोडलं जात असेल; पण देशादेशांमधला विद्वेष जेव्हा दर्शवला जातो, तशी कृत्यं वेळीच ठेचली पाहिजेत. सर्बियाच्या खेळाडूंनी आपल्या ड्रेसिंगरूममध्ये कोसोवो हा देश आपल्या देशात असल्याचा राष्ट्रीय ध्वज फडकावण्याचं धाडस केलं. फिफाने चौकशी समिती नेमली आहे. यातून पुढे काय सत्य बाहेर येतं ते पाहू या. कडक निर्बंधांतूनही कडक कारवाई झाली नाही, तर असे प्रकार सातत्याने होऊ शकतील. खेळाच्या मैदानापेक्षा राजकीय संदेशांचं रणांगण होण्यास यामुळे वेळ लागणार नाही.

अँडी फ्लॉवरचं बंड

क्रिकेट हा तसा फारच मर्यादित देशांचा खेळ. त्यांची विश्वकरंडक स्पर्धा हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्या देशांची. त्यामुळे इथं असे प्रकार घडत नाहीत; मात्र २००३ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात संयुक्तपणे झालेली विश्वकरंडक स्पर्धा झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवरच्या बंडासाठी अजूनही लक्षात आहे. अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या राजवटीविरुद्ध कमालीचा रोष होता. या स्पर्धेचं निमित्त साधून अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलोंगा यांनी काळ्या पट्ट्या लावून खेळ केला होता. अँडी फ्लॉवर तर तेवढ्यावरच थांबला नाही, त्याने अतिशय चोख तयारी केली होती. अगोदरच आपल्या कुटुंबाला झिम्बाब्वेतून लंडनमध्ये स्थलांतरित केलं होतं आणि झिम्बाब्वे संघाचा अखेरचा साखळी सामना दक्षिण आफ्रिकेत होणार होता, त्याअगोदर त्याने मुगाबे राजवटीवर सडकून टीका केली. सर्व क्रिकेट मीडिया स्पर्धा कव्हर करत असल्यामुळे अँडी फ्लॉवरवर कारवाई होऊ शकत नव्हती. याचाच फायदा अँडीने घेतला आणि दक्षिण आफ्रिकेत अखेरचा सामना खेळल्यावर थेट लंडन गाठलं ते मात्र कायमचंच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com