
युगान्त मेस्सीचा!
खेळांच्या दुनियेत दोन महत्त्वाच्या श्रेणी असतात; एक असते विक्रमवीरांची, तर दुसरी प्रभावशाली (इम्पॅक्ट) खेळाडूंची. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात असं म्हणतात, त्यामुळे विक्रमाच्या सिंहासनावर कधी तरी दुसरा कोणी येतो आणि हक्क सिद्ध करतो; परंतु प्रभावशाली खेळाडू म्हणजे मुकुटातील शिरोमणी, तो कधीच बदलला जात नाही, त्याचं तेज अनंतकाळापर्यंत कायम रहातं. म्हणूनच विक्रमवीरापेक्षा प्रभावशाली कधीही महानच. अर्थात, अशा खेळाडूंनाही विक्रमांचं कोंदण लागलेलं असतं, कारण प्रगतीची उत्तुंग झेप घेत असताना विक्रम पायांशी लोळण घेत असतात, त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नसते. हीच तर खरी खेळांची दुनिया आहे.
अख्ख्या फुटबॉलविश्वालाच नव्हे, तर भूतलावरील आपल्या अनंत चाहत्यांना आपल्याभोवती फेर धरायला लावणाऱ्या लिओनेल मेस्सीचा आज युगान्त होत आहे. कतारमध्ये होत असलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना हा मेस्सीचाही वर्ल्डकपमधील शेवटचा सामना असणार आहे, तसं त्यानं पुन्हा जाहीरच करून टाकलं आहे. टीव्हीच्या माध्यमातून का होईना, याची देही याची डोळा मेस्सीला विश्वकरंडक स्पर्धेत अखेरचं खेळताना पहाणं, ही या वर्ल्डकपची सर्वांत मोठी पर्वणी असेल. त्यात त्याचा अर्जेंटिना संघ अजिंक्य ठरला आणि मेस्सीने वर्ल्डकप उंचावला, तर तो सुवर्णक्षण केवळ अजरामर होईल.
झाले बहू होतील बहू... ही उक्ती अनेकदा कानी पडलेली; पण... यासम हाच मेस्सी केवळ अलौकिक. जगात सर्वाधिक देशांत खेळला जाणारा आणि सर्वाधिक लोकप्रिय असा हा फुटबॉल खेळ; त्यात असंख्य खेळाडू खेळले आहेत, खेळत आहेत आणि खेळत राहतील, आपापली मोहिनी घालतील; पण मेस्सी नावाच्या जादूगाराने गेल्या दोन दशकांत सादर केलेली जादू संमोहित करणारी. मेस्सी गोल करो वा न करो; पण त्याचा ९० मिनिटांचा वावर एखादा जादूगार लयबद्धपणे आपली काठी नाचवत डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच जादू दाखवतो, तसं मेस्सीला फुटबॉल खेळवताना पहाणं अत्यंत आनंददायी. विश्वकरंडक स्पर्धा असो वा इतर आंतरराष्ट्रीय सामने, किंवा जगभरातील लीगचे होणारे अनेक सामने, यांत होणारे तेवढेच असंख्य गोल; पण मेस्सीच्या एका गोलने मनावर टाकलेला प्रभाव जणू काही नशा आणणारा... परत परत पहावा असाच!
जगद्विख्यात पेले, त्यानंतर मॅराडोना, ब्राझीलचा रोनाल्डो यांचा खेळ. ब्राझीलच्याच रॉबर्टो कार्लोस याने २५ वर्षांपूर्वी वर्तुळाकार मारलेली एक अद्वितीय फ्रीकिक अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही, त्याचप्रमाणे मेस्सीच्या लयबद्ध आणि तालबद्ध खेळाचा विसर पडणे नाहीच. वयाच्या १८ व्या वर्षी विश्वकरंडक स्पर्धेत पदार्पण आणि ३६ व्या वर्षी निरोप, जवळपास १८ वर्षं सातत्याने खेळणं हे सोपं नाहीच. कारण फुटबॉल हा खेळ धसमुसळा आणि त्यात तुम्ही सुपरस्टार असला तर पायात पाय घालून तुम्हाला पाडण्याची शर्यतच लागते जणू. चारही बाजूने घेरलेलं असताना चक्रव्यूहात गेलेला वीर अभिमन्यू निसटू शकला नव्हता, मात्र मेस्सी प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चक्रव्यूहातून अनेकदा निसटला आहे. चेंडू कुठं गेला हे समजायच्या आत मेस्सीने तो पास केलेला असतो. उपांत्य सामन्यात क्रोएशियाच्या दोन ताडमाड उंच खेळाडूंनी पाच-सव्वापाच फूट उंची असलेल्या मेस्सीला घेरलं होतं; परंतु त्यांतील एकाच्या पायातून चेंडू ढकलून मेस्सीने दिलेला पास केवळ अवर्णनीय होता. तो गोल मेस्सीच्या नावावर नव्हता; पण ९९.९९ टक्के श्रेय मेस्सीचं होतं. म्हणूनच मेस्सीची ओळख त्याने किती गोल केले यापेक्षा किती गोलना साहाय्य (असिस्ट) केलं याची आकडेवारी सर्वांहून अधिक.
निःस्वार्थी मेस्सी
अंगी असलेली अफाट आणि अलौकिक गुणवत्ता हीच महान खेळाडूंची ओळख दर्शवत नसते, तर पडद्यामागे राहून संघाच्या भल्यासाठी तुम्ही किती योगदान देता हा निकषही तेवढाच मोलाचा असतो. मुळात फुटबॉल हा इतर सांघिक खेळांच्या यादीत कदाचित अव्वल स्थानावर असेल. चेंडू पायात मिळाल्यानंतर गोल होण्याची शक्यता कमी असली, तरी स्वतः गोल करण्याची लालसा निर्माण होतेच. पण १०० टक्के खात्री असताना दुसऱ्या सहकाऱ्याला चेंडू पास करणाऱ्या मेस्सीचा निःस्वार्थीपणा इतरांच्या तुलनेत किती तरी महान आहे. म्हणून मेस्सीने किती गोल केले, यापेक्षा त्याने किती ‘असिस्ट’ केले, ही यादी फार मोठी आहे.
तुलना इतरांशी
या युगात नेहमीच मेस्सी आणि रोनाल्डो यांची तुलना केली जाते. अर्थात, मेस्सीने स्वतःला कधीही सर्वश्रेष्ठ म्हटलेलं नाही; पण रोनाल्डो मात्र अहंकारी, आपणच श्रेष्ठ, आपणच सर्वाधिक गोल केले असं सांगत असतो. सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या संख्येत रोनाल्डो पुढेही असेल; पण आज अख्खं फुटबॉलविश्व मेस्सीभोवती गुंफलंय... भावनिक झालंय. पुढचा विश्वकरंडक आपण खेळणार नाही असं तो ठामपणे सांगतोय; मात्र या स्पर्धेत जास्त वेळ राखीव खेळाडू रहावं लागलेला रोनाल्डो निवृत्तीबाबत साशंकता व्यक्त करतोय. ‘कशाला निवृत्त होतोस, अजून खेळायचं होतं’ अशा प्रतिक्रिया उमटतात, तेव्हा त्या खेळाडूची निवृत्ती काळजाला भिडलेली असते... जसं आज मेस्सीबाबत होत आहे.
घेतली होती तडकाफडकी निवृत्ती
२०१८ मध्ये मेस्सीने अतिशय निराश मनाने अचानक निवृत्ती घेतली होती, सर्वांसाठीच तो धक्का. त्याला कारणही तसंच होतं, कोपा अमेरिका स्पर्धेत चिलीकडून पराभव झाला. मेस्सी कमालीचा उद्विग्न झाला आणि तडकाफडकी त्याने निवृत्ती जाहीर करून टाकली. काही क्षणांसाठी फुटबॉल थांबल्यासारखं घडलं होतं; परंतु अर्जेंटिनाचे प्रशिक्षक स्कोलोनी आणि इतरांनीही मेस्सीची समजूत काढली. तो तयार नव्हता; परंतु तो तयार झाला आणि पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरला. पण, आता तसं होणार नाही... शेवटी कधी थांबायचं, हेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. यशाच्या शिखरावर जाऊन थांबण्याचा निर्णय घेणं सोपं नसतं. एक मात्र खरं की, कतारमधील ही स्पर्धा ‘मेस्सीची स्पर्धा’ म्हणून कायमचीच ओळखली जाईल यात शंका नाही.