हरमनप्रीतच्या संतापाचे पडसाद

बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीतनं केलेल्या प्रकाराचं कोणीही समर्थन केलं नाही, उलट माजी खेळाडूंनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
harmanpreet kaur
harmanpreet kaursakal

मनुष्याच्या स्वभावात असलेले लोभ, मत्सर, राग हे दुर्गुण कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकात सापडतात; परंतु जो यांची तीव्रता कमी करतो, तो सज्जन या श्रेणीत मोडतो. दैनंदिन जीवनात किंवा व्यवहारात प्रत्येक दिवस आणि दिवसागणिक बदलणारी आव्हानं वेगवेगळी असतात, त्यामुळे आज केलेलं सत्कर्म उद्या होईलच असं नाही. हा दैनंदिन जीवनाचा रहाटगाडा प्रत्येक जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अनुभवत असतो. यातील राग हा दुर्गुण समोरच्याचं आणि त्यापेक्षा स्वतःचंच, मग ते मानसिक असो वा शारीरिक, नुकसान करत असतो.

रस्त्यावर, नाक्यावर वाहतुकीचा नियम मोडला, किंवा बहुतांश वेळा पार्किंगवरून राग अनावर होतो आणि प्रसंग हातघाईवर येतो याची अनेक उदाहरणं सहजतेने जाणवतात; पण खेळाच्या मैदानावर घडलेली अशी उदाहरणं बराच काळ लक्षात राहतात. अगदी याच महिन्यात एका रविवारी झालेल्या विम्बल्डन अंतिम सामन्यातील क्षण आठवतोय ना, महान टेनिसपटू नोवाक जोकोविचला राग अनावर झाला आणि त्याने हातातील रॅकेट नेटच्या बारला मारली, त्यामुळे त्याला भारतीय रकमेत सहा लाखांचा दंड झाला होता.

जोकोविचने असे प्रकार अनेकदा केले आहेत, कारण त्याच्यामध्ये टेनिसची जेवढी महान गुणवत्ता आहे, तेवढाच शीघ्रकोपीपणाचा दुर्गुणही आहे. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ या. कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी आणि तापट विराट कोहली ही भारताच्या पुरुष संघातील कर्णधारांची दोन टोकं होती. त्यात आता हरमनप्रीतच्या रूपानं महिला संघाचीही भर पडली.

बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीतनं केलेल्या प्रकाराचं कोणीही समर्थन केलं नाही, उलट माजी खेळाडूंनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. हरमनप्रीतच्या बाजूने विचार केला तर कर्णधार म्हणून चुकीचा निर्णय दिल्यावर राग येणं स्वाभाविक होतं. मुळात तिथं तिने आपली बॅट रागाने यष्टींवर मारायला नको होती. पण, तेवढ्यावरच ती थांबली नाही. बक्षीस समारंभाच्या वेळी बांगलादेश कर्णधारासह करंडक स्वीकारत असताना हरमनप्रीतने ‘पंचांनाही फोटोसाठी बोलवा, तेसुद्धा याचे मानकरी आहेत’ असा मारलेला जहाल टोला फारच आक्षेपार्ह होता.

शेवटी व्हायचं तेच झालं, सामना मानधनातील ७५ टक्के रक्कम कापून तर घेण्यात आलीच; पण दोन सामन्यांची बंदीही घालण्यात आली. ही बंदी तिच्यासह भारतीय संघावरही परिणामकारक ठरू शकेल. कारण यापुढे भारतीय संघ बहुराष्ट्रीय आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे आणि भारत सुवर्णपदकाचा प्रमुख मानकरी ठरण्याच्या क्षमतेचा आहे.

हरमनप्रीतने केलेली कृती चुकीचीच होती. राग येणं स्वाभाविक असलं तरी आपण कर्णधार आहोत, यामुळे अधिक संयमाने वागावं लागेल, कारण आपली एखादी कृती संघाचंही नुकसान करू शकते, हे भारतीय महिला संघातील सध्याच्या सर्वांत अनुभवी खेळाडूला न समजावं इतकं पटणारं नाही.

मुळात भारतीय संघ मुख्य प्रशिक्षकांविना बांगलादेश दौऱ्यावर होता. त्यामुळे हरमनप्रीतला अधिकाराने कोणी सांगावं हा प्रश्नच आहे. आयसीसीने नियमाचा आधार घेत जेवढी शिक्षा शक्य आहे तेवढी हरमनप्रीतला केली; पण प्रश्न तिथं संपत नाही. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, त्यावर आयसीसी काय करणार हासुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे.

मैदानावरील सर्वच पंचांकडून चुका होतात. निर्णयांत जास्तीत जास्त अचूकता यावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. बहुराष्ट्रीय स्पर्धांत हा खर्च आयसीसीचा असतो; परंतु द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये हा खर्च यजमानांनी करायचा असतो.

बांगलादेशमधील या मालिकेत डीआरएस हे आवश्यक असलेलं तंत्रज्ञान नव्हतं. ही बांगलादेश संघटनेची आणि प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीची चूक आहे. ही आंतरराष्ट्रीय मालिका होती, त्यासाठी हे आवश्यक असलेलं तंत्रज्ञान असायलाच हवं होतं. हरमनप्रीतला पंचांनी बाद दिलं ते चुकीचं होतं की बरोबर, हे डीआरएस तंत्रज्ञान असतं तर प्रश्न तिथंच निकाली ठरला असता.

पक्षपाती निर्णय असू नयेत आणि डीआरएससारखं तंत्रज्ञान नसेल तर आपल्याच देशाच्या पंचांवर सामन्यांची जबाबदारी देणं हेसुद्धा तेवढंच चुकीचं आहे. आपल्या देशातील पंचांना संधी कशी मिळणार, हा प्रश्न असला तरी निकालात अचूकता असणं आणि मालिका निर्दोष पार पडणं हे यजमान संघटनेचं कर्तव्य असायलाच हवं.

त्रयस्त पंचांचा हा मुद्दा उपकर्णधार स्मृती मानधना हिने उपस्थित केला आणि आयसीसीलाही हरमनप्रीत प्रकरणानंतर पुन्हा असे प्रकार होऊ नयेत यासाठी मार्ग सुचवला आहे, कारण काही मालिका या संवेदनशील असतात, तिथं पंचांचा प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो. भारत-बांगलादेश मालिकेतील तिसऱ्या सामन्यात हे नाट्य घडल्यानंतर मानधनाला सहाजिकच या घटनेबाबत विचारलं; पण तिने समंजसपणा दाखवत दिलेली उत्तरं ही भारतीय महिला संघाची दुसरी बाजू आहे.

संघाच्या कामगिरीचं काय?

महिलांच्या जागतिक क्रिकेटचा व्यापक विचार केला जातो तेव्हा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड हे बलाढ्य संघ त्यांना टक्कर देऊ शकणारा संघ म्हणून भारताकडे पाहतात, त्यामुळे आशिया खंडात तर भारतीय संघाची मक्तेदारी. श्रीलंका, पाक आणि बांगलादेशवर गेल्या अनेक स्पर्धा मालिकांमध्ये विजय मिळवलेला आहे, त्यामुळे या बांगलादेश दौऱ्यात भारतीयांचं वर्चस्व अपेक्षित होतं. मात्र इथं प्रामुख्याने फलंदाजीतील कामगिरी खालावली.

जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्वतः हरमनप्रीत यांचा अपवाद वगळता स्मृती मानधनासह सर्वांनी निराशा केली, परिणामी बांगलादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमावण्याची स्थिती निर्माण झाली. पहिला सामना गमावल्यावर पायाखालची वाळू सरकली, त्यानंतर अस्तित्व पणास लागल्यावर अशी चिडचिड होणं स्वाभाविक; पण याचा अर्थ मर्यादा ओलांडणं असा होत नाही.

मुळात भारतीय महिला संघ चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळत होता. मध्ये महिनाभराची महिला आयपीएल झाली. एकीकडे पुरुष संघाला विश्रांतीसाठी वेळ मिळत नाही, तर दुसरीकडे महिला संघ चार महिने आंतरराष्ट्रीय सामने खेळत नाही, हा विरोधाभास आहे.

या बांगलादेश दौऱ्यातून एक गोष्ट नक्की झाली, की भारतीय महिला संघाला गाफील राहून चालणार नाही. कारण याच बांगलादेशविरुद्ध पुढील महिन्यात आशिया क्रीडा स्पर्धेत लढावं लागणार आहे. त्या वेळी या जखमा पुन्हा बाहेर येणार आहेत. त्यावर उंचावलेली कामगिरी हेच जालीम औषध असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com