ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ क्या है भाई...

बदल घडणं ही काळाची गरज. ज्याने असे बदल केले, तो चर्चेत तर राहिलाच; पण त्याने अस्तित्वही टिकवून ठेवलं. मात्र असे बदल कधीकधी मारकही ठरतात हा भाग वेगळा.
hrithik shokeen
hrithik shokeensakal
Summary

बदल घडणं ही काळाची गरज. ज्याने असे बदल केले, तो चर्चेत तर राहिलाच; पण त्याने अस्तित्वही टिकवून ठेवलं. मात्र असे बदल कधीकधी मारकही ठरतात हा भाग वेगळा.

बदल घडणं ही काळाची गरज. ज्याने असे बदल केले, तो चर्चेत तर राहिलाच; पण त्याने अस्तित्वही टिकवून ठेवलं. मात्र असे बदल कधीकधी मारकही ठरतात हा भाग वेगळा. या बदलांच्या चौकटी मोडल्या की, आश्चर्याचे धक्केही बसतात. असाच एक नवा प्रयोग बीसीसीआयने केलाय. मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि त्यात ‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा नवा प्रयोग केला जात आहे. या स्पर्धेतल्या सामन्यांचं दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपण होत नसल्यामुळे अजूनपर्यंत सर्वच सामान्य क्रिकेटप्रेमींपर्यंत हा बदल पोहोचलेला नाही. पण, एप्रिल-मे महिन्यापर्यंत नक्की सर्वांपर्यंत पोहोचेल....

मुळात कोणत्याही खेळाचा विचार केला तर असं लक्षात येईल, की नियमांच्या चौकटी दशकांअगोदर निश्चित केलेल्या असतात; पण काळ बदलतो तशी सुधारणा करावीच लागते. प्रेक्षकांना अधिक खिळवून ठेवण्यासाठी काही बदल हे गरजेचेच असतात; पण मूळ गाभ्याला जेव्हा हात लावला जातो, तेव्हा मात्र ते आश्चर्यकारक वाटू लागतात. क्रिकेटमधला सध्या केलेला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा बदल त्यापैकीच आहे. मुळात क्रिकेटचा खेळ असा आहे की, इथला संघ ११ खेळाडूंचा. हा नियम हा खेळ शतकापूर्वी सुरू झाला तेव्हापासून कायम आहे. संघातील या ११ खेळाडूंनाच खेळायची म्हणजे फलंदाजी आणि गोलंदाजी करायची संधी मिळणार. राखीव खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण करू शकेल असा हा सोपा नियम होता. त्यानंतर ‘राखीव खेळाडू’ ही संकल्पना आली. म्हणजे एखाद्या खेळाडूच्या डोक्याला मार लागला, तर त्याच्याऐवजी येणारा बदली खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजीही करू शकतो.

आता ११ ऐवजी १२ खेळाडू खेळू शकतील हा ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा बदल आहे. या अगोदर बदली खेळाडू असा प्रयोग झाला होता; पण त्यात आता १२ व्या खेळाडूला अधिकचे अधिकार मिळणार आणि म्हणूच तो ‘इम्पॅक्ट प्लेअर’ या नावाने ठसा उमटवणार आहे.

काय आहे हा बदल

  • सर्वप्रथम नाणेफेकीच्या वेळी ११ खेळाडूंसह चार राखीव खेळाडूंची नावं द्यायची आणि यातूनच ‘इम्पॅक्ट प्लेअर’ निवडता येतो.

  • डावाच्या १४ व्या षटकापर्यंतच हा बदल करता येईल.

  • १० षटकांचा सामना झाल्यास हा बदल करता येणार नाही.

  • बाद झालेल्या किंवा गोलंदाजीची षटकं पूर्ण केलेल्या खेळाडूच्या ठिकाणी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ मैदानात येऊ शकतो आणि फलंदाजी आणि त्याच्या कोट्याची चार षटकं टाकू शकतो; पण ११ पेक्षा अधिक जण फलंदाजी करणार नाहीत.

  • पूर्ण षटक झाल्यावरच ‘इम्पॅक्ट प्लेअर’ मैदानात येऊ शकतो.

  • एखाद्या गोलंदाजाने दोन बिमर टाकले तर तो पुढे गोलंदाजी करू शकत नसतो, अशा गोलंदाजाच्या जागेवरही ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा वापर केला जाऊ शकतो.

‘इम्पॅक्ट प्लेअर’मुळे काय होणार

  • कधी कधी एका जागेसाठी दोन पर्याय संघात असतात; परंतु एकालाच खेळायची संधी मिळते, अशा वेळी राखीव खेळाडूंकडे केवळ मैदानात जाऊन पाणी देण्याचंच काम राहणार नाही.

  • सामन्यासाठी रणनीती तयार करताना पूर्ण ११ खेळाडूंनुसार व्यूहरचना केली जाते; पण आता कोणता खेळाडू ‘इम्पॅक्ट प्लेअर’ असणार हे माहीत नसल्यामुळे व्यूहरचनेसाठी प्लॅन बीसुद्धा तयार ठेवावा लागणार.

काय घडलं

या नियमाचा पहिला वापर मुश्ताक अली स्पर्धेत दिल्लीने मणिपूरविरुद्धच्या सामन्यात केला. हृतिक शोकेन हा तो इम्पॅक्ट प्लेअर! अतिशय चाणाक्षपणे दिल्ली संघाने हा बदल केला. हितेन दलाल या फलंदाजाने २७ चेंडूंत ४७ धावा करून आपलं काम फत्ते केलं होतं. त्याच्या ठिकाणी गोलंदाज असलेल्या शोकेनला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळवण्यात आलं आणि त्याने गोलंदाजीत १३ धावांत दोन विकेट मिळवून देऊन दिल्लीच्या विजयात मोलाची कामगिरी केली. याचाच अर्थ असा की, फलंदाजाच्या ठिकाणी गोलंदाज आणि गोलंदाजाच्या ठिकाणी फलंदाज ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळवला जाणार.

‘आयपीएल’साठी वेट आणि वॉच

बीसीसीआयने अतिशय हुशारीने हा बदल करताना मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत प्रयोग केला आहे. ही नांदी आहे आयपीएलची! खरं तर आयपीएलमध्येच हा बदल करायचा होता; परंतु रंगीत तालीम म्हणून मुश्ताक अली स्पर्धेचा वापर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये असे ‘इम्पॅक्ट प्लेअर’ प्रत्येक सामन्यात दिसतील. प्रत्येक संघाच्या व्यवस्थापनाने आत्तापासून यावर विचार करायला सुरुवातही केली आहे. एकूणच काय, तर आयपीएलकडून मिळणाऱ्या मनोरंजनात आणखी एक भर पडणार आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर हे बदल कितपत स्वीकारले जातील हे आत्ताच सांगणं कठीण आहे. व्यावसायिक लीगमध्ये असे अनेक बदल होत असतात. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश आणि इंग्लंडमधील हंड्रेड या स्पर्धा प्रयोगशील असतात आणि तेथूनच उगम होत असतो. पण शेवटी मूळ गाभा बदलू न देता परिस्थितीनुसार बदल करण्याची जबाबदारी पालक संघटनांवर असते आणि त्यांनीही जनभावनेचा विचार चौकटीतच राहून केलेला बरा. पांढऱ्या कपड्यातील कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा आत्मा; परंतु रंगीत कपड्यांनुसार पांढऱ्या टी शर्टवर खेळाडूचं नाव आणि क्रमांकही आला; परंतु जर्सीचा पांढरा रंग कायम राहिला हे महत्त्वाचं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com