वेगाशी स्पर्धा... पण, जरा दमानंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Umran Malik
वेगाशी स्पर्धा... पण, जरा दमानंच

वेगाशी स्पर्धा... पण, जरा दमानंच

‘आयपीएल’मध्ये सध्या एका भारतीय गोलंदाजाची - जो अजून रणजी क्रिकेट स्पर्धेतही खेळलेला नाही - जोरदार चर्चा आहे. ‘भारतीय वेगवान गोलंदाजीतील भारताचं भवितव्य’ म्हणून काश्मीरच्या या गोलंदाजाचं कौतुक होत आहे. उमरान मलिक हे त्याचं नाव.

एकापेक्षा एक वेगवान चेंडू...चेंडू कसले, जणू क्षेपणास्त्रच, टाकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि तो ती सिद्धही करत आहे. साधारणतः ताशी १४५ किलोमीटरपेक्षा वेगवान चेंडू टाकण्याचा वेग हा ‘एक्स्प्रेस वेग’ समजला जातो.

उमराननं तर १५७ चा टप्पा गाठला आणि सर्व भारतीयांना थक्क करून टाकलं. भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात इतका वेगवान चेंडू अजूनपर्यंत कुणीही टाकलेला नाही. कोणताही खास अनुभव नसताना आणि कुणी नावाजलेला प्रशिक्षक नसताना, तसंच क्रिकेटची कोणतीही पार्श्वभूमी नसताना काश्मीरच्या खोऱ्यातून हा तुफानी वेगाचा गोलंदाज तयार होणं हे आश्चर्यच. यावरून भारतीय क्रिकेट हे केवळ महानगरांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं.

क्रिकेटविश्वातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा शोएब अख्तर तसा भरदार शरीरयष्टीचा; पण उमरानची शरीरयष्टी सामान्य. मुळात, काही अतिजलद वेगवान गोलंदाजांची शैली वादग्रस्त असते; पण उमरानची शैली अतिशय निर्दोष. असं असतानाही सातत्यानं ताशी १५० किलोमीटरपेक्षा वेगानं चेंडू टाकण्याची ताकद आणि क्षमता केवळ अफलातूनच.

असा हा योगायोग...

‘आयपीएल’चा महालिलाव होण्यापूर्वी काही खेळाडूंना संघांनी आपापल्या संघात कायम राखलं. विराट कोहली (बंगळूर), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा (मुंबई) तसं ‘हैदराबाद’नं उमरान मलिकला संघात कायम ठेवलं. म्हणजेच ‘बंगळूर’साठी विराट किंवा ‘मुंबई’साठी रोहित-बुमरा जसे मौल्यवान, तसा उमरान ‘हैदराबाद’साठी हिरा होता. मुळात या हिऱ्याची किंमत त्यांना कळलीच नव्हती.

हैदराबाद संघातील खेळाडू - जो उमरानचा मित्र होता - अब्दुल समद यानं संघव्यवस्थापनकडे एक मागणी केली. ‘एक चांगला, वेगवान गोलंदाज माझ्या ओळखीचा आहे, त्याला आपल्याकडे नेट बॉलर (केवळ सरावासाठी) म्हणून आणू या’ अशी ती मागणी होती. ती मान्यही झाली. सराव करताना ‘इस बंदे में दम है’ अशी संघव्यवस्थापनला जाणीव झाली; परंतु त्याची मुख्य संघात निवड करता येत नव्हती.

गतवर्षी टी. नटराजन जखमी असल्यामुळे अखेर उमरानची निवड झाली, तरीही त्याला प्राधान्यानं स्थान देण्यात आलं नव्हतं. ‘हैदराबाद’चं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं असताना उर्वरित तीन-चार सामन्यांसाठी उमरानला अंतिम संघात खेळवण्यात आलं आणि त्याचा भन्नाट वेग सर्वांसमोर आला. केवळ या तीन-चार सामन्यांच्या जोरावर त्याला महालिलावात कायम ठेवण्यात आलं.

यंदाच्या स्पर्धेत ‘हैदराबाद’चा सामना असतो तेव्हा, हा संघ जिंकतोय की हरतोय, यापेक्षा किती वेगवान चेंडू टाकतोय, याचीच चर्चा अधिक असते. नेट बॉलर म्हणून संघासोबत असलेला हा खेळाडू संघाचं ‘स्टार ॲट्रॅक्शन’ होतो यातच सर्व काही स्पष्ट होतं. त्याच्या वेगवान चेंडूंची भुरळ दिग्गज क्रिकेटपटूंनाही पडली आहे, म्हणूनच सुनील गावसकर असोत की हरभजनसिंग असो, ‘उमरान ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात हवा,’ अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. गावसकरांसारख्या महान खेळाडूकडून कौतुकाची थाप पडल्यानंतर उमरान प्रत्येक सामन्यात अतिजलद चेंडूंसाठी स्वतःशीच स्पर्धा करतोय...

एकीकडे ही शाबासकी मिळत असताना, अतिजलद वेगवान चेंडू म्हणजेच मॅचविनर गोलंदाज, असा अर्थ होत नाही...आता या वास्तवाचं विश्लेषण करू या...

उमराननं ‘गुजरात’विरुद्धच्या सामन्यात पाच विकेट मिळवल्या आणि एकदमच प्रकाशझोत त्याच्यावर आला; पण त्याचा हैदराबाद संघ तो सामना हरला होता. पराभूत होऊनही सामन्यात सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाल्यानंतर अधिक उत्साह वाढलेल्या उमराननं पुढच्या म्हणजे ‘दिल्ली’विरुद्धच्या सामन्यात त्याच्या चार षटकांत ५२ धावा दिल्या. संघातील इतर गोलंदाजांच्या तुलनेत सर्वाधिक धावा त्यानंच दिल्या. याच सामन्यात त्यानं ताशी १५७ किलोमीटर वेगाचा चेंडू टाकला; पण या चेंडूवर रोमवाल पॉवेलनं चौकार मारला. १५० पेक्षा अधिक वेगानं टाकलेल्या चेंडूवर त्यानं अशाच धावा दिल्या. उमरान टाकत असलेल्या सामन्यातील पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरनं १५ धावा चोपल्या. वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात त्यानं पहिला चेंडू वाईड टाकला आणि चौकार गेला. अशा प्रकारे एकूण पाच धावा त्यानं दिल्या. यात महत्त्वाचा मुद्दा असा की, वेगवान चेंडूपेक्षा तो चेंडू निर्धाव टाकणं किंवा विकेट मिळवणं हे संघासाठी मोलाचं असतं. तुम्ही कितीही वेगात चेंडू टाकला तरी समोर कसलेला फलंदाज असेल तर तो चेंडूला केवळ दिशा दाखवून चौकार, षटकार मारतो.

क्रिकेटविश्वात सर्वाधिक वेगवान ताशी १६० किलोमीटर वेगाचा चेंडू शोएब अख्तरनं ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनवर टाकला होता; परंतु तो त्याच्या आणि यष्टिरक्षक मोईन खानच्या डोक्यावरून सीमापार गेला होता, म्हणजेच ‘अतिवेग संकटात नेई’ अशीही परिस्थिती होत असेल तर उपयोग काय?

उमराननं काय करायला हवं...

  • चेंडूंच्या वेगात विविधता आणायला हवी.

  • हळूवार चेंडू (स्लोअर वन) तेवढ्याच कल्पकतेनं टाकायला हवेत. त्यावरच अधिक विकेट मिळत असतात.

  • टप्पा आणि दिशा मिळाल्यानंतर वेगवान चेंडू टाकावेत.

  • अतिवेगवान चेंडू टाकण्याच्या शर्यतीत दुखापती होणार नाहीत याकडे लक्ष द्यावं.

  • काही वेळा खेळपट्ट्या कोरड्या असतात, अशा वेळी कितीही वेगात चेंडू टाकले तरी फरक पडत नसतो. अशा वेळी वेग कमी करून अचूकतेवर भर द्यावा.

  • यॉर्कर अधिक प्रभावी करायला हवा.

डेल स्टेनचं मार्गदर्शन महत्त्वाचं

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज - ज्याला ‘स्टेन गन’ म्हणून संबोधलं जायचं - तो डेल स्टेन ‘हैदराबाद’चा गोलंदाजीचा प्रशिक्षक आहे. उमरान त्याच्याच तालमीत तयार होत आहे. गुजरातविरुद्ध पाच विकेट मिळवल्यावर ही स्वारी खूश होती; पण अतिवेगवान चेंडू म्हणजे सर्वस्व नव्हे. ‘परिस्थितीनुसार गोलंदाजी’ हे सूत्र स्टेननं उमरानच्या मनात ठसवलं पाहिजे.

Web Title: Shailesh Nagvekar Writes Ipl Cricket Umran Malik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top