विराट, जरा दमानं...

ज्या वेळी आपण मैदानात उतरू ते विजयासाठीच, मग तो सराव सामना का असेना ! असं बाळकडू घेत कोणत्याही खेळातला खेळाडू तयार होत असतो.
Virat Kohli
Virat KohliSakal
Summary

ज्या वेळी आपण मैदानात उतरू ते विजयासाठीच, मग तो सराव सामना का असेना ! असं बाळकडू घेत कोणत्याही खेळातला खेळाडू तयार होत असतो.

ज्या वेळी आपण मैदानात उतरू ते विजयासाठीच, मग तो सराव सामना का असेना ! असं बाळकडू घेत कोणत्याही खेळातला खेळाडू तयार होत असतो. सातत्याने खेळत राहिल्यामुळे कधी कधी मैदानावर झोकून देण्याची तीव्रता कमी-जास्त होऊ शकते; परंतु असेही काही खेळाडू असतात, जे स्वप्नातही तेवढ्याच प्रखरतेने आपली भावना व्यक्त करतात... विराट कोहली हा त्यांपैकी एक. याची लढाऊ वृत्ती यत्किंचितही कमी होत नाही, म्हणून तो विराट आहे.

‘लढण्याची जिद्द कमी होतेय असं जेव्हा वाटेल, तेव्हा निवृत्तीचा काळ जवळ आलाय असं समजेन,’ असं सचिन तेंडुलकर निवृत्तीकडे झुकताना म्हणाला होता. यात सांगायचा मुद्दा असा की, महान खेळाडूंमध्ये झपाटून खेळण्याची वृत्ती ठासून भरलेली असते... अशी वृत्ती आणि विचारधारा त्या त्या खेळाडूसाठी आणि पर्यायाने संघासाठीही कधीही चांगलीच असते. अतिरिक्त ऊर्जा असणारे विराटसारखे खेळाडू या शक्तीचा वापर करून खेळत असतात; पण कधी कधी ही अतिरिक्त ऊर्जा संयमाच्या सीमा पार करते, तेव्हा मात्र ते अडचणीत सापडतात. आक्रमकपणा हा खेळाचा अविभाज्य घटक असला तरी संयमाचं कोंदण आवश्यकच असतं. सर्व गोष्टी आक्रमक वृत्ती आणि देहबोलीतून साध्य होत नसतात...

आक्रमकपणाचं आक्रस्ताळेपणात रूपांतर होतं, तेव्हा तुम्ही अनेकांना दुखावत असता... स्वतःचंही नुकसान करत असता आणि बदनामही होत असता. विराटमध्ये असलेला नेहमीचा आक्रमकपणा हा आक्रस्ताळेपणाकडे झुकला आहे, असं यंदाच्या आयपीएलमध्ये तो आत्तापर्यंत खेळलेल्या सामन्यांतून तरी दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सामनाधिकाऱ्यांकडून त्याला करण्यात आलेला दंड. जी बाब सामान्य प्रेक्षक म्हणून आपल्या लक्षात येत आहे, तेच सामनाधिकाऱ्यांनाही दिसत आहे, म्हणजे कुछ तो गडबड है दया...

आयपीएलमध्ये एरवी षटकं निर्धारित वेळेत पूर्ण न केल्याबद्दल किंवा मैदानावर एकमेकांविरुद्ध बाचाबाची झाली, तर कारवाई होऊन दंड होत असतो; पण चेन्नईविरुद्धच्या लढतीत विराट कोणाशीही भिडला नाही, शिवाय तो कर्णधारही नाही, मग त्याला दंड कशाबद्दल करण्यात आला, असा प्रश्न सर्वांना पडला होता; परंतु एक साधा खेळाडू शिवम दुबे याचा झेल तिसऱ्याच क्षेत्ररक्षकाने पकडला, त्या वेळी विराटने चीड येऊन केलेला आविर्भाव खिलाडूवृत्तीला साजेसा नव्हता, तो सर्वांच्या नजरेत भरणारा होता, त्यामुळे त्याला दंड करण्यात आला.

विराट आणि त्याचा आक्रमकपणा हे समीकरण अख्ख्या क्रिकेटविश्वाला ज्ञात आहे; पण या वेळच्या आयपीएलमध्ये विराट वेगळा भासत आहे. बारकाईने विचार केला तर त्याची काही कारणं पुढे येतात...

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम, सर्वाधिक शतकं, सर्वोत्तम खेळाडूसाठीचे अनेक पुरस्कार एवढं मोठं कार्य करूनही विराटच्या डोक्यावर आयपीएल विजेतेपदाचा मुकुट विराजमान झालेला नाही. काही वेळा हातातोंडाशी आलेला घास हिरावला, तर कधी कधी झोळी फाटकीच राहिली. बरं दर्जेदार खेळाडूंची कमतरता होती का, तर तसंही नाही, ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल आणि ओरिजिनल ‘३६० डिग्री ’ फलंदाज एबी डिव्हिलियर्स असे योद्धे असतानाही विराट कोहलीच्या बंगळूर संघाची आयपीएलच्या रणांगणात पाठ जमिनीला लागलेली आहे.

आयपीएलमध्ये बंगळूर संघालाच नव्हे, तर भारतीय संघालाही तिन्ही प्रकारांत कर्णधार म्हणून विराटने अनेक सामन्यांत आणि द्विराष्ट्रीय मालिकांतही देशात-परदेशांत विजय मिळवून दिले आहेत, अनेक स्पर्धाही जिंकल्या आहेत; परंतु विश्वविजेतेपद काही मिळालेलं नाही. कोणत्या परिस्थितीत त्याला टीम इंडियाचं नेतृत्व सोडावं लागलं हेसुद्धा सर्वश्रुत आहे. त्याच रागात त्याने बंगळूर संघाचं कर्णधारपदही स्वतःहून दूर केलं. आता कदाचित बंगळूरचा संघ आयपीएल जिंकेल; पण कर्णधार म्हणून विराटच्या नावाववर हे विजेतेपद लागणार नाही, ही खंतही त्याला लागू शकते, त्याचाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम आयपीएलमध्ये खेळताना देहबोलीतून होत असावा.

आत्ता नाही तर कधीच नाही... आयपीएल विजेतेपद मिळविण्याची ही कदाचित अखेरची संधी असेल, त्यामुळे आर या पार अशा भावनेतून विराटचा मैदानावरचा वावर दिसून येतो, कारण प्रदीर्घ कालावधीनंतर कोहलीच्या बॅटने पुन्हा विराट रूप धारण केलं आहे. विश्वकरंडक टी-२० स्पर्धेत पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची केलेली धुलाई असो, वा आयपीएलमध्ये ज्या मार्क वूडने आपल्या भेदक माऱ्याने दिल्ली फलंदाजांची दाणादाण उडवली होती, त्याच मार्क वूडचे उसळते आणि भेदक चेंडू लिलया सीमापार धाडण्याचा बेधडकपणा असो... या स्पर्धेत विराट एका वेगळ्याच आक्रमकतेने खेळतोय. साहजिकच पुढचं काही माहीत नाही; पण यंदा मोठी भरारी घ्यायचीच अशी खूणगाठ त्याने बांधली असावी.

विराट आणि गंभीर हे दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचे खेळाडू, भारतीय संघातही एकत्र खेळलेले; परंतु का कोण जाणे, या दोघांमध्ये दुश्मनीच अधिक दिसून आलेली आहे. एका आयपीएलमध्ये तर हे दोघे भरमैदानावर समोरासमोर भिडले होते. आता तर बंगळूरमधील सामन्यात गंभीर लखनौ संघाचा प्रशिक्षक म्हणून मैदानात असताना तेथील प्रेक्षक हल्लागुल्ला करत होते आणि अखेरच्या क्षणी बंगळूरचा पराभव झाल्यावर गंभीरने तोंडावर बोट ठेवत बंगळूर प्रेक्षकांना शांत बसा असा संदेश दिला. त्याचवेळी विराटकडे पाहतानाही त्याचा चेहरा गंभीर होता; परंतु काही काळानंतर विराट आणि गंभीर यांचं एकत्रित छायाचित्र प्रसिद्ध झालं हा भाग वेगळा.

भारतीय संघाला विराटने कणखर बनवलं असं असलं तरी, अरेला का रे करण्याची हिम्मत सौरभ गांगुली यांनी संघात जागवली होती, त्यामुळे आक्रमकतेच्या तराजूत गांगुली आणि विराट काहीसे समसमानच. परदेशात विजयाचा झेंडा या दोघांनीही आपापल्या नेतृत्वाखाली लावला. भारताचे हे दोन महान आणि यशस्वी कर्णधार मात्र नेहमीच दोन टोकांवर राहिले. आपलं कर्णधारपद गमावण्यास गांगुलीच जबाबदार आहेत, अशी भावना विराटची आहे. एका पत्रकार परिषदेत उघड उघड त्याने गांगुलींच्या निर्णयावर टीकाही केलेली आहे. हे जुने हिशेब चुकते करायचे असतील कदाचित; परंतु दिल्ली संघाविरुद्धच्या सामन्यानंतर या दोघांनी हस्तांदोलन करणं टाळलं. इतकंच काय, तर पुढे जाऊन विराटने गांगुली यांना ‘अनफॉलो’ही केलं.

या आयपीएलमध्ये या ना त्या कारणामुळे विराट त्याच्या खेळापेक्षा वर्तनामुळे चर्चेत रहात आहे. आयपीएल ही एक व्यावसायिक स्पर्धा आहे, हार-जित व्हायचीच; पण पराभव आणि अपयश मनाला लावून घेताना विराटने आपल्याच देशाच्या खेळाडूंना दुखावू नये. विकेट मिळवल्यावरचा आविर्भाव किंवा सामना जिंकल्याच्या जल्लोषाची सीमा पार होऊ नये. आयपीएल होत राहतील; पण लगेचच होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना आणि काही महिन्यांत आपल्याच देशात होणारी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा महत्त्वाची आहे, तिथे ऊर्जा आणि देहबोलीतील आक्रमकता निर्णायक ठरणार आहे... म्हणून सध्या तरी दमानंच घ्यावं एवढंच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com