मीराबाई ते हर्षदा... जगज्जेतींचा नवा अध्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harshada Garud
मीराबाई ते हर्षदा... जगज्जेतींचा नवा अध्याय

मीराबाई ते हर्षदा... जगज्जेतींचा नवा अध्याय

देशभरात सध्या आयपीएलचा भोंगा वाजत आहे. यंदा भले टीआरपीचा डेसिबल थोडा कमी झाला असेल; पण भोंग्याच्या गोंगाटात मधूनच बासरीचा मधुर सूर ऐकू यावा आणि मन तृप्त व्हावं, तसंच काहीसं गेल्या आठवड्यात घडलं. ‘क्रिकेट एके क्रिकेट’ सुरू असताना मावळ तालुक्यातील वडगाव गावातील हर्षदा गरुड हिनं सुखद धक्का दिला. ग्रीसमधील जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय मुलगी ठरली. काही महिन्यांपूर्वी टोकिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूच्या यशाची आठवण लगेचच सर्वांना झाली. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असलेल्या आपल्या देशात सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट असलं तरी नेमबाजीत अभिनव बिंद्रा ते आत्ताची मनू भाकर...टेनिसमध्ये प्रकाश अमृतराज ते पेस-भूपती, सानिया मिर्झा...बॅटमिंटनमध्ये प्रकाश पदुकोन ते साईना-सिंधू आणि आत्ता लक्ष्य सेन...कुस्तीत खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिकपदकाचा श्रीगणेशा केल्यानंतर सुशीलकुमार, बजरंग...बॉक्सिंगमध्ये मेरी कोम ते लोवलिना...

अशा अनेक खेळाडूंंनी क्रिकेटेतर खेळ भारतीयांमध्ये रुजवले. अर्थात्, ॲथलेटिक्समधील ‘फ्लाईंग सीख’ मिल्खासिंग, पी. टी. उषा यांची परंपरा हिमा दाससारख्या खेळाडू कायम ठेवत आहेतच. या सर्वांवर नीरज चोप्रानं उमटवलेली सुवर्णमोहोर आणि त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला भालाफेक हा खेळ भारताची नवी क्रीडाप्रगती दर्शवत आहे. मात्र, या आणि इतर खेळांत वेटलिफ्टिंग हा खेळ तसा दुर्लक्षितच. कर्नाम मल्लेश्वरीनं सिडनी ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकूनही म्हणावा तेवढा हा खेळ चर्चेत राहिला नाही; पण मीराबाईच्या यशानंतर काही महिन्यांतच, १८ वर्षांची हर्षदा जगज्जेती होते, म्हणजेच वेटलिफ्टिंग या खेळाची पाळंमुळं आता भक्कम होत आहेत हे सिद्ध होतं.

आजकाल शहरी भागांत तरी लहान मुलाच्या हातात क्रिकेटची बॅट किंवा टेनिस, बॅटमिंटनची रॅकेट सहज दिली जाते, त्यामुळे अशा खेळांकडे ओढा असणं स्वाभाविकच; परंतु वेटलिफ्टिंगसारखा खेळ हा ताकदीचा. ही ताकद मुळात असावी लागते, नंतर ती कमावावी लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या खेळाची गोडीही असावी लागते. हर्षदामध्ये या गोष्टी होत्या.

वडील शरद गरुड आणि हर्षदाचे मामा यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग खेळात प्रगती करायची होती; पण आपल्याला हे यश मिळालं नाही म्हणून त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत, तर छोट्या हर्षदाच्या माध्यमातून आपलं स्वप्न साकारलं आहे...अर्थात्, ज्युनिअर जगज्जेतेपद ही तर सुरुवात आहे.

मुलीचे हात वजन उचलणारे...

कधी कधी एखाद्याला अनपेक्षितपणे यश मिळालं आहे असं आपल्याला वाटतं; पण काही घटना पाहिल्या तर दैवानंच तशी योजना केली असावी याची प्रचीती येते. हर्षदा ही १२ वर्षांची असताना ५० किलो तांदळाची गोणी सहजपणे पाठीवर घेऊन घरात यायची. ही गोणी खाली ठेवून पुन्हा दुसऱ्यांदा हेच काम करायला ती सज्ज व्हायची. तांदळाची गोणी असो की वेटलिफ्टिंगचं अधिक वजन उचलण्याची क्षमता असो, हर्षदामध्ये लहानपणापासूनच ते कौशल्य होतं. तेव्हा, ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीमध्ये आता ‘मुलीचे हात वजन उचलणारे दिसतात,’ असा बदल करायला हरकत नाही!

बडबड करणारी हर्षदा

‘शालेय शिक्षणात हर्षदा हुशार नाही,’ असं तिला शिकवणाऱ्या शिक्षकाचं मत होतं; परंतु प्रथम श्रेणीत पास झाल्यावर तिनं पेढे आणल्यावर शिक्षकही अवाक् झाले. उपजत गुणवत्ता असली की काहीही साध्य करता येतं याचं हे आणखी एक उदाहरण. सतत बडबड करणं ही तिची आणखी एक सवय, म्हणून तिला ‘रेडिओ’ असं म्हटलं जायचं; परंतु सरावात असताना तिच्या तोंडून एक अक्षरही येत नाही, पूर्णपणे लक्ष सरावावर दिलं जातं. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर, तुमचा मूळ स्वभाव आणि सवयी कशाही असू द्या, त्यात जो बदल करतो, तोच खरा चॅम्पियन होत असतो.

हर्षदाचं वडगाव हे गाव काही फार मोठं नाही. तिथं नुकतीच नगर पंचायत झाली आहे; पण हे गाव मनमाड, सांगली, कोल्हापूरप्रमाणे ‘वेटलिफ्टिंगचं माहेरघर’ आहे असं म्हणायला हरकत नाही आणि असा लौकिक मिळण्यामागं आहेत त्र्याहत्तरवर्षीय बिहारीलाल दुबे. सन १९७२ मध्ये त्यांनी इथं प्राथमिक व्यायामशाळा सुरू केली.

हर्षदाचे वडील शरद या व्यायामशाळेत सराव करायचे. दुबे यांची सूनही खेळाडू होती आणि तिचंही नाव हर्षदा होतं. तिनं क्रॉसकंट्री शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं, या यशाचा शरद यांच्यावर एवढा प्रभाव पडला की, आपल्याला मुलगी झाली तर तिचंही नाव हर्षदा ठेवायचं, असं त्यांनी ठरवलं. शरद यांना पहिलं अपत्य मुलगीच झाली आणि ठरवल्यानुसार त्यांनी तिचं नामकरण हर्षदा असं केलं.

आपल्या मुलीनं वेटलिफ्टिंग करावं आणि देशाचं नाव उंचावावं अशीही शरद यांची इच्छा होती. ज्युनिअर गटात तर हर्षदा जगज्जेती झालीच आहे, आता सीनिअर गटातही असं घडावं अशी इच्छा केवळ शरद यांचीच नव्हे तर, भारतीयांचीही आहे.

आता आहारावरही लक्ष

आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवायचं असेल तर आधुनिक सरावाबरोबरच आहारही तेवढंच महत्त्वाचा असतो. हर्षदाला चिकन, खेकडे आणि पावभाजी फार आवडते. मात्र, ती आता आहाराबाबत काटेकोर झाली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी संतुलित आहार कसा घ्यायचा आणि त्याचं वेळापत्रक कसं आखायचं हे हर्षदाला क्रीडा प्राधिकरणाच्या अकादमीतून समजलं आहे.

आता लक्ष्य ऑलिंपिक

वेटलिफ्टिंगच्या क्षितिजावर हर्षदा नावाची तारका लुकलुकली आहे. भव्य यश मिळवण्याची क्षमता तिनं दाखवून दिली आहे. आता एकच लक्ष्य आहे व ते म्हणजे, ऑलिंपिकपदक. ते साध्य झालं तर मीराबाई ते हर्षदा...असा तो जगज्जेतींचा नवा अध्याय असेल याच शंकाच नाही.

Web Title: Shailesh Nagvekar Writes Mirabai To Harshada Weightlifting Competiton

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top