बॅडमिंटनमधील ‘जय-वीरू’

श्वासा श्वासात.. नसा नसात एकमेकांचा खेळ आणि विचार एकरूप व्हायला हवा तरच प्रगतीचा आलेख सतत उंचावतो जसा सात्त्विक आणि चिराग यांनी शिखरावर नेला.
satvik and chirag badminton
satvik and chirag badmintonsakal

‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’’ ही काव्यपंक्ती सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्यासाठी एकदम समर्पक आहे. वैयक्तिक खेळात दुहेरी हा असा प्रकार जेथे समन्वय असणे अत्यंत गरजेचे एवढेच नवे तर एकमेकांची देहबोली आणि मनही ओळखण्याची-जाणण्याची कला अवगत असायलाच हवी त्याशिवाय रथाची चाके एकावेळी कार्यन्वित होणार कशी.

श्वासा श्वासात.. नसा नसात एकमेकांचा खेळ आणि विचार एकरूप व्हायला हवा तरच प्रगतीचा आलेख सतत उंचावतो जसा सात्त्विक आणि चिराग यांनी शिखरावर नेला. जागतिक विजेत्या अॅरॉन चिया आणि वूई यिक यांचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून त्यांनी इंडोनेशिया ओपन सुपर वन थाउजंट या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.

बॅडमिंटनमध्ये `सुपर वन १०००’ ही श्रेणी सर्वांत उच्च समजली जाते. अजूनपर्यंत एकाही भारतीयांना अशा सुपर स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नव्हते, म्हणून केवळ सात्त्विक आणि चिराग यांच्या यशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे नाही. अॅरॉन चिया आणि वूई यिक यांच्याविरुद्ध ते सलग आठ सामन्यांत पराभूत झाले होते. नवव्या प्रयत्नांत ते यशस्वी ठरले...हार के जितने वाले को बाजीगर कहते है...ते उगाचच नाही.

बॅडमिंटन खेळात भारताचा मोठा इतिहास आहे. नंदू नाटेकर यांच्यापासून सुरू झालेली परंपरा पुढे प्रकाश पदुकोन, विनय कुमार, पुल्लेला गोपीचंद आणि नव्या पिढीत साईना नेहवाल, पी.व्ही. सिंधू किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणोय, लक्ष्य सेन यांनी एकेरीत तिरंगा मानाने फडकावला.

महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा तिच्यासह अगोदर व्हि.दिजू नंतर अश्विनी पोनाप्पा यांनी काही काळ गाजवला पण गेल्या दोन-तीन वर्षांचा विचार करता सात्त्विक आणि चिराग यांनी भारताचा दीप निश्चितच तेजोमय केलाय यात शंकाच नाही.

साईना आता निवृत्तीच्या जवळ आहे. सिंधूला विजयापेक्षा अपयशाचाच अधिक सामना अधिक करावा लागत आहे अशा परिस्थितीत भारतीय बॅडमिंटनच्या पताका जगात सन्मानाने फडकावण्याचे काम सात्त्विक-चिराग करत आहे.

केवळ इंडोनेशियन सुपर वन थाउजंट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले म्हणून एवढी स्तुतिसुमने आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्याचा हा प्रकार नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक, थॉमस करंडक स्पर्धेत सुवर्ण, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझ अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धांत छाप पाडणाऱ्या सात्त्विक -चिराग यांनी राखलेले सातत्य हेच त्यांच्या प्रगतीचे मोठे वैशिष्ठ आहे.

दुहेरीची जोडी भले एकत्र खेळत असली तरी जसा खेळाडू मोठा होत जातो तसा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अहंकारही येत असतो आता तर सोशल मीडियाच्या जमान्यात कान फुंकणारे अनेक जण असतात म्हणे.

टेनिसमध्ये लिअँडर पेस आणि महेश भूपती यांचा दुहेरीत दरारा तर केवढा अफलातून होता. दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ पण त्यांच्या दोस्तीत दरार पडलीच मोठी प्रतिभा असताना त्यांनी ग्रँडस्लॅम जिंकल्या पण देशासाठी ऑलिंपिक पदक मात्र जिंकून देऊ शकले नाहीत.

बॅडमिंटनमध्ये महिलांच्यात ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू त्यानंतर ज्वाला- अश्विनी या महिला जोडीनेही चांगले यश मिळवले, परंतु कोठे तरी या जोडींमध्येही भंग झाला.

सात्त्विक आणि चिराग हे दोघेही भिन्न स्वभावाचे पण खेळ मात्र एकमेकांच्या साथीत बहरणारा आता दोघेही आपापल्या पद्धतीने मोठे होत आहेत त्यांना कोणाची दृष्ट लागू नये एवढेच.

त्यांचा एकमेकांबद्दल असलेला आदर आणि एकमेकांना समजून घेण्याचा स्वभाव आणि एकाकडून चूक झाली तर ती त्याची वैयक्तिक नसून आपल्या दोघांची आहे असा समज हाच त्यांना `जय-वीरू` पर्यंत नेणारा आहे.

प्रगतीचा आणि सुधारणेचा ध्यास

आदल्या दिवशी सर्वांत मोठे यश मिळवलेले असले तरी त्याच वेळी जो उद्याचा विचार करतो तोच महान खेळाडू होत असतो म्हणजेच सतत शिकत राहण्याची वृत्ती खेळाडूंमध्ये असायलाच हवी म्हणूनच सलग आठ पराभव झालेल्या विश्वविजेत्या जोडीला सहज पराभूत करण्याची जिगर सात्त्विक-चिराग दाखवू शकले त्यासाठी त्यांना केवळ खेळातच नाही तर विचारातही बदल केला. गेल्या काही महिन्यात त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते.

‘आमच्यामध्ये नाही म्हटला तरी काहीसा आळस आला होता. सामन्यावर आपली पकड आहे असा विचार येताच आम्ही गृहीत धरायला लागायचो आणि तेथूनच सामने गमवायचो, गेल्या दोन स्पर्धांमध्ये असे झाल्यावर आम्ही खडबडून जागे झालो आणि स्पर्धा जिंकत नाही तोपर्यंत शांत बसायचे नाही,’ असा निर्धारच केल्याचे सात्त्विक म्हणतो.

म्हणजेच प्रशिक्षक तुम्हाला खेळातले कितीही बारकावे दाखवून देवो, जो पर्यंत स्वतःला चुका कळत नाही आणि पेटून उठत नाही तोपर्यंत मोठे यश साध्य होत नाही. हेच सात्त्विक-चिरागच्या या यशातून दिसून येते.

मथाईस बो यांचे मार्गदर्शन

सात्त्विक आणि चिराग यांच्या या प्रगतीला दुहेरीतील सुप्रसिद्ध प्रशिक्षक आणि माजी खेळाडू मथाईस बो यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे. त्या अगोदर २०१५ मध्ये भारतीय बॅडमिंटन संघटनेने मलेशियाचे दुहेरीतील प्रशिक्षक टॅन किम हेर यांची भारतीय संघासाठी नियुक्ती केली.

त्यांनी प्रथम सात्त्विक आणि चिराग यांची दुहेरीत जोडी तयार केली आणि तेथून हा सुरू झालेला प्रवास आता मथाईस बो यांनी वेगळ्या उंचीवर नेला आहे. प्रिमिअर बॅडमिंटन लीगच्या निमित्ताने देशभरातील नामवंत खेळाडू भारतात खेळतात दुहेरीतही त्यांचा सहभाग असतो अशा खेळाडूंशी साधण्यात येणाऱ्या संवादातूनही आपले ज्ञान वाढवता येत असते.

‘मथाईस बो आमच्याशी इतके रुळले आहेत की त्यांनी काही हिंदी शब्दही आत्मसात केले आहेत, पिछे खेलो...पिछे खेलो... (म्हणजे पाठीमागे बेस लाईनवर खेळा) असे सल्ला ते अधून मधून देतात त्यामुळे कोणी तरी आपलाच सहकारी कोर्टच्या बाहेर असल्याचे जाणीव होत रहाते,’’ असे चिरागन सांगितले.

एक मोठा कानमंत्र त्यांनी आम्हाला दिला, ‘कधीही कोणताही सामना तुम्ही सहजा सहजी हरू नका, शंभर टक्यांपेक्षा अधिक लढा द्या तरीही तुमचा प्रतिस्पर्धी जिंकला तर त्याने तुम्ही पराभूत होऊनही तुमचा गौरव त्याने केला पाहिजे,’ हा मंत्र आम्ही कायमचा डोक्यात घट्ट केला आहे, असे चिरागने एका मुलाखतीत उघड केले. यावरून प्रशिक्षकाचे विचारही कसे स्फूर्तिदायी असतात किंवा मोठा बदल घडवू शकतात हे सिद्ध होते.

अशी जमली जोडी

खरं तर आपण एकत्र खेळू असे सात्त्विक आणि चिराग यांना कधीच वाटले नव्हते. ज्युनिअर गटात चिराग आणि कृष्णा प्रसाद दुहेरीत एकत्र खेळत होते. असे असताना तो आपल्याबरोबर खेळायला लागला याचे सुरवातीला मला आश्चर्यच वाटले, परंतु सिनियर गटात देशासाठी खेळताना आपल्याकडे निवडीचे पर्याय नसतात पण आपण जर चांगला खेळ करत राहिलो तर आपल्याला साथीदारही तसाच मिळतो असे आपल्याला वाटत असल्याचे सात्त्विकने स्पष्ट केले.

चिराग हा मुंबईतील उच्चभ्रू श्रेणीतला आणि मी पारंपरिक दक्षिण भारतीय. सुरुवातीला आमच्यात भाषेचाही अडथळा येत होता, परंतु देशासाठी खेळायचे हे समान ध्येय आम्हाला एकत्र धाग्यात बांधत गेलं परिणामी आमची जोडी जमली, असे सात्त्विकने म्हणतो.

आशियाई आणि ऑलिंपिकचे ध्येय

मथाईस बो यांच्यासह राष्ट्रीय प्रशिक्षक गोपीचंद यांचेही मार्गदर्शन आणि सल्ला मोलाचा ठरत असल्याचे सात्त्विक-चिराग आवर्जून सांगतात. ऑलिंपिक पात्रता वर्षात असे मोठे यश मिळणे ही चाहूल समजायला हवी. आता काही महिन्यात आशियाई स्पर्धा आहेत तेथे इंडोनेशिया, मलेशिया आणि चिनी प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार आहे त्यानंतर पुढील वर्षी पॅरिस ऑलिंपिक हे सर्वांत मोठे ध्येय आहे. आता येथून पुढेच जायला हवे त्यासाठी भारतीय बॅडमिंटनमधील जय-वीरूला शुभेच्छा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com