ध्वज विजयाचा उंच धरा रे...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thomas Karandak
ध्वज विजयाचा उंच धरा रे...!

ध्वज विजयाचा उंच धरा रे...!

वर्गात पहिला क्रमांक मिळवणं एक वेळ सोपं असेल; पण तो टिकवणं सर्वात कठीण असतं. कारण, या वेळी तुमची स्पर्धा प्रतिस्पर्ध्यांसह तुमच्या स्वतःशीच असते, तसंच दुसरा कमी पडला म्हणून तुम्ही पहिला क्रमांक मिळवलेला नसतो, तर हे स्थान तुम्ही स्वतःमधील हुशारीनं मिळवलेलं असतं आणि जो यात सातत्य राखतो तो खरा हुशार विद्यार्थी असतो. खेळाचीही दुनिया यापेक्षा वेगळी नसते. बॅडमिंटनविश्वाला थक्क करून सोडणारं यश गेल्या आठवड्यात भारताच्या पुरुष-संघानं मिळवलं. सांघिक विजेतेपदाचा थॉमस करंडक भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावून जिंकला. बॅडमिंटनविश्वात महासत्ता असलेल्या मलेशिया, डेन्मार्क, इंडोनेशिया यांची मक्तेदारीला शह देऊन भारतीयांनी हे भव्य-दिव्य यश मिळवलं.

प्रकाश पदुकोन, पुल्लेला गोपीचंद या पुरुष-बॅडमिंटनपटूंनी वैयक्तिक स्पर्धांत कधीकाळी मोजकंच का होईना; दिमाखदार यश मिळवलं होतं; पण सांघिक प्रकारात विजेतेपदाचा करंडक उंचावण्याची ही पहिलीच वेळ. आख्ख्या देशात लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, सात्त्विकसाईज-चिराग शेट्टी, एच. एस. प्रणोय या शूरवीरांसह, पडद्यामागं असलेल्या प्रशिक्षक-टीमचं कौतुक होत आहे. सुवर्णपदकाचा स्वीकार केल्यानंतर ‘ते पदक आम्ही रात्रभर गळ्यात घालूनच झोपलो होतो,’ अशी श्रीकांतनं व्यक्त केलेली भावना, या यशाचं मोल किती महान आहे, हे सिद्ध करते. या स्वप्नवत् यशानंतर जीवन पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे. थॉमस कप दोन वर्षांनी होत असतो; त्यामुळे वर्गात पुन्हा पहिला क्रमांक टिकवण्यासाठी बराच वेळ आहे. मात्र, थॉमस करंडकाच्या या यशातील हे योद्धे वैयक्तिक स्पर्धांत किती चमक दाखवतात हेही महत्त्वाचं आहे.

एखादा खेळाडू घडतो तो त्याच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेमुळे आणि त्यानं घेतलेल्या मेहनतीमुळे; परंतु जागतिक पातळीवर जिथं ‘उन्नीस-बीस’चा फरक असतो तिथं अजिंक्य होण्यासाठी केवळ या दोन गोष्टीच पुरेशा नसतात. तंदुरुस्ती, आहार, देशात-परदेशात सरावाच्या स्पर्धा, योग्य मार्गदर्शक आणि मानसिक संतुलन उच्च कोटीचं राखण्यासाठी मानसोपचार आणि मार्गदर्शक यांचं साह्य मोलाचं असतं. ज्युनिअर पातळीवरील खेळाडूंसाठी तर हे सर्व घटक तेवढ्याच काटेकोरपणे मिळणं आवश्यक असतं. ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला पुढच्या तयारीसाठी परदेशात जाण्याकरिता केंद्र सरकारनं पुन्हा अर्थसाह्य केलं, यावरून सर्व काही स्पष्ट होतं.

ही पार्श्वभूमी सांगायचा हेतू एवढाच की, तुम्ही कितीही विद्वान असाल; पण प्रत्येक दिवस, प्रत्येक स्पर्धा, ही नवी परीक्षा असते आणि तिची तयारी प्रत्येक दिवसागणिक करावी लागते. आपला पुरुषांचा बॅडमिंटन संघ यशाच्या शिखरावर पोहोचला असला तरी त्यांनाही हे बॅकिंग मिळणं गरजेचं आहे.

हा योगायोग म्हणा की आणखी काही; पण भारतीय बॅडमिंटनक्षेत्रात एकाच वेळी दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. बँकॉकमध्ये भारतीय संघ जगज्जेता झाल्यावर भारतीय बॅडमिंटन संघटनेची सायंकाळी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. तशी ती त्या दिवशी नियोजितच होती. एरवी, कोणत्याही खेळाच्या अशा सभांचा रोख संघटनेतील राजकारणावर चर्चा करण्यावर असतो; परंतु बॅडमिंटन संघटनेच्या सभेत दोन मोठे निर्णय घेण्यात आले. राज्यभर ३० प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याचा आणि देशात दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा. निवृत्त झालेल्या वरिष्ठ खेळाडूंना प्रशिक्षणात कारकीर्द करायची असल्यास त्यांनाही अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे, हा प्रयत्न सर्वात चांगला आहे.

गोपीचंद हे उत्तम उदाहरण

मुळात चांगले प्रशिक्षक घडले तर ते खेळाडू घडवतील. उत्तम खेळाडू आणि चांगला प्रशिक्षक काय करू शकतो यासाठी गोपीचंद यांच्यापेक्षा दुसरं उदाहरण असू शकत नाही. पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल असे ऑलिंपिक पदकविजेते आणि आत्ताच्या, जगज्जेत्या संघातील लक्ष्य सेनचा अपवाद वगळता सर्वच खेळाडू त्यांच्या तालमीत तयार झाले आहेत.

दुसरी फळी महत्त्वाची

संघिक खेळात जुने खेळाडू जात असताना नव्या खेळाडूंना संधी मिळण्याच्या प्रक्रियेला ‘ट्रान्झिशन’ असं म्हटलं जातं. हा काळ रिले शर्यतीसारखा असतो. योग्य वेळी बॅटन पास झाली तर संघाचं वर्चस्व अखंडित राहतं.

दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, दुसरी फळी योग्य वेळी तयार होणं महत्त्वाचं असतं. कधी कधी एखाद्या संघाची ताकद ही, त्यांचे राखीव खेळाडू किती क्षमतेचे आहेत, यावर ठरत असते. साईना आणि सिंधूनंतर दुसरी फळी अजून निर्माण झाली नाही. हे पुरुष-संघाबाबात होऊ नये हीच अपेक्षा.

देशात जेवढ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतील त्यांचा फायदा निश्चितच होणार. सध्या देशात दिल्लीत ‘सुपर ५०० इंडिया ओपन’, लखनौमध्ये ‘सुपर-३०० सय्यद मोदी स्पर्धा’ आणि ‘ओडिशा ओपन’ अशा स्पर्धात होत आहेत. शिवाय, पुण्यात ‘ज्युनिअर आंतरराष्ट्रीय’, तर बंगळूरमध्ये ‘आंतरराष्ट्रीय चॅलेंजर्स’ स्पर्धा होत असते. आता आणखी दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या तर आणि सोबतच बॅडमिंटन लीगही गांभीर्यानं खेळवण्यात आली तर आपल्या खेळाडूंना परदेशी खेळाडूंसह आणि विरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. तिचा फायदा निश्चितच होईल.

दरारा कायम असावा

इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, चीन या देशांतील अव्वल खेळाडू विविध स्पर्धांत आपल्या पुरुष-खेळाडूंपेक्षा सरस ठरलेले आहेत. ऑलिंपिकचं पदक किंवा जागतिक वैयक्तिक विजेतेपद आपल्याला कधी मिळालेलं नाही. प्रकाश पदुकोन, गोपीचंद यांच्यानंतर प्रतिष्ठेची ‘ऑल इंग्लंड’ कुणालाही जिंकता आलेली नाही. लक्ष्य सेननं जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक जिंकलं; पण थॉमस करंडक स्पर्धेतील जगज्जेतेपदामुळे सर्व दिग्गज खेळाडूंमध्ये भीती निश्चितच निर्माण झाली आहे. हे भारतीय काहीही करू शकतात, याची त्यांना जाणीव झाली आहे. आता हा दरारा सातत्यानं निर्माण करणं आवश्यक आहे.

Web Title: Shailesh Nagvekar Writes Thomas Karandak Badminton Competition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top