एरिक्सनच्या निमित्तानं...

एरिक्सनवरच्या या प्रसंगामुळे केवळ फुटबॉलचाच मुद्दा नव्हे तर, इतरही अनेक मुद्दे पुढं येतात. त्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला आरोग्याचा घटक हा महत्त्वाचा मुद्दा!
Christian Eriksen
Christian EriksenSakal

डेन्मार्क आणि फिनलंड यांच्यातील तो सामना जोमात सुरू होता...आक्रमणाचा आणि बचावाचा रोमहर्षक खेळ होत असताना अचानक जे घडलं ते काळजाचा ठोका चुकवणारं होतं. फुटबॉल न समजणारेसुद्धा हळहळू लागले होते....डेन्मार्कचा प्रथितयश फुटबॉलपटू ख्रिस्तियन एरिक्सनच्या जीवन-मरणाचा तो प्रसंग, प्रत्यक्ष स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्यांना असो वा टीव्हीवरून सामना पाहाणाऱ्यांना असो, सगळ्यांनाच धक्कादायक होता. फुटबॉलच्या मैदानावर अशा दोन-तीन घटना घडल्या आहेत; पण मिनी विश्वकरंडक समजल्या जाणाऱ्या युरो स्पर्धेत असं पहिल्यांदाच ‘लाईव्ह’ घडत होतं. काही मिनिटांनंतर एरिक्सनला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आलं. सगळे चिंतेत पडले.

तो जिवंत असल्याची माहिती काही वेळानं छायाचित्रासह समाजमाध्यमांमध्ये आली आणि थोड्या वेळातच सामना सुरू झाला, त्यामुळे सगळ्यांनीच निःश्वास सोडला...त्या सामन्यात कोण जिंकलं, कोण हरलं याला महत्त्व नव्हतं. एरिक्सन जीवनाची लढाई जिंकला होता एवढं मात्र खरं होतं!

एरिक्सनवरच्या या प्रसंगामुळे केवळ फुटबॉलचाच मुद्दा नव्हे तर, इतरही अनेक मुद्दे पुढं येतात. त्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला आरोग्याचा घटक हा महत्त्वाचा मुद्दा! हृदयविकार असो, स्नायूची दुखापत असो, हाता-पायाला फ्रॅक्चर होण्याची वेळ असो वा कोरोनाचा संसर्ग असो...आणीबाणीची परिस्थिती कशी आणि कधी निर्माण होईल हे सांगता येत नाही; पण अतिशय चोख आणि शंभर टक्के खात्रीची तयारी आपण करू शकतो आणि त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. हे तर आपल्या हाती असते.

एरिक्सनच्या बाबतीत जसं घडलं तसं वारंवार घडत नसतं. मैदानावर हृदयविकाराचा झटका येण्याचा प्रसंग अपवादानं घडत असतो; पण वैद्यकीय तयारी कायमस्वरूपी असणं अनिवार्य असतं.

एरिक्सनच्या बाबतीत काय घडलं ते पाहू या...खेळता खेळता त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला. फुटबॉलमध्ये कधी कधी खेळाडू जाणीवपूर्वक खाली पडत असतात, दुखापत झाल्याचं नाटकही करत असतात; पण रेफ्रींना हे खरं-खोटं समजत असतंच; पण एरिक्सन ज्या वेळी पडला त्या वेळी काही तरी विचित्र घडलं आहे याची जाणीव रेफ्रींनाही झाली आणि त्यांनी सामना तिथंच थांबवून वैद्यकीय मदत बोलावली. एरिक्सनचं हृदय बंद पडलं आहे याची जाणीव डॉक्टरांना लगेचच झाली. हृदयाला पंपिंग करण्यापासूनचे सर्व उपचार त्यांनी सुरू केले. अशा वेळी रुग्णाचं तोंड मिटू द्यायचं नसतं. डेन्मार्कच्या कर्णधारानं एरिक्सनची जीभ धरून ठेवली. खरं तर एरिक्सनचा गेलेला जीव परत आला होता. लगेचच तिथं इतरही उपचार सुरू झाले. ऑक्सिजन लावण्यात आला आणि एरिक्सन श्वासोच्छ्वास घेऊ लागला. थोडक्यात काय तर, आयसीयूमधील उपचार एरिक्सनवर मैदानातच करण्यात आले म्हणून त्याचा जीव वाचला होता. त्याबद्दल सामन्याचे आयोजन करणाऱ्या डेन्मार्क फुटबॉल संघटनेला आणि काटेकोर नियमावली असणाऱ्या ‘फिफा’ला - अर्थात् जागतिक फुटबॉल महासंघाला - श्रेय द्यावं लागेल. डेन्मार्क संघटनेनं स्टेडियममध्ये तैनात केलेले डॉक्टर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडूही होते, त्या विशेष बाबीचाही उपयोग उपचार करताना झाला. असा व्यापक विचार किती महत्त्वाचा असतो हे या प्रसंगातून स्पष्ट होतं.

स्पर्धेशी निगडित सगळ्यांचा विचार

फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ. दोनशेच्या जवळपास देश ‘फिफा’शी संबंधित आहेत. वर्ल्ड कप, युरो किंवा कोपा अमेरिका अशा जागतिक स्पर्धा असोत वा व्यावसायिक लीग असोत, अब्जावधी डॉलरची उलाढाल यात होत असते. त्यामुळे ‘फिफा’चीही तेवढीच जबाबदारी असते. प्रत्येक गोष्टीतील सुरक्षितता आणि तिचा विचार ‘फिफा’ कसा करते हे थक्क करणारं आहे. तीन वर्षांपूर्वी भारतात १८ वर्षांखालील विश्वककरंडक फुटबॉल स्पर्धा झाली. भारतात होणारी फुटबॉलमधली अशी ही पहिलीच स्पर्धा होती. त्यानिमित्तानं ‘फिफा’चं पथक सामने होणाऱ्या ठिकाणी भेट देऊन ‘फिफा’च्या नियमांनुसार बदल करायला लावत होतं. सामन्याबाबतच्या सूचना समजण्याजोग्या होत्या; पण त्यानिमित्तानं मैदानात येणाऱ्या प्रत्येक घटकासाठीच्या सुविधा किती पराकोटीच्या असायला हव्यात हे एका उदाहरणावरून स्पष्ट होतं.

निवडक लहान मुलं मोठ्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना सामन्यापूर्वी मैदानात घेऊन येतात. ही मुलं स्टेडियममध्ये थांबणार; त्यामुळे त्यांच्या पालकांची बसायची व्यवस्था मुलांच्या जवळच असायला पाहिजे...इतकंच नव्हे तर, मुलांसाठी स्टेडियमध्ये जवळच वेगळं स्वच्छतागृह असायला हवं आणि तेही त्यांना वापरणं सोईस्कर होईल अशा प्रकारे हवं...इतका बारीक विचार ‘फिफा’ करते, यावरून खेळाडूच नव्हे तर, प्रेक्षकांसाठीही आरोग्य आणि इतर सुविधांसाठी त्यांची नियमावली किती फुलप्रूफ असते हे निश्चित होतं.

स्थानिक स्पर्धांमध्ये काय?

एरिक्सनसारखा प्रसंग, तोही अचानकपणे, कोणत्याही खेळात घडू शकतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतीलही; पण स्थानिक स्पर्धांमध्ये काय? त्यासाठी आर्थिक पाठबळ असणं तेवढंच अत्यावश्यक आहे, तरच डॉक्टर्स आणि उपचारांसाठी आवश्यक असलेली साधनं, औषधं, तसंच रुग्णवाहिका सज्ज ठेवता येईल. मात्र, सर्वच स्थानिक स्पर्धांसंदर्भात हे शक्य आहे का? यासाठी त्या त्या खेळाचं पालकत्व असलेल्या राष्ट्रीय संघटनांनी विचार करणं हिताचं ठरणार आहे किंवा या संघटनांनी लहान-मोठ्या शक्य असतील त्या रुग्णालयांशी टाय-अप करून स्थानिक स्पर्धांसाठीसुद्धा त्यांची मदत घ्यावी. एरिक्सनवरच्या प्रसंगातून हा बोध निश्चितच घ्यायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com