esakal | ओसाका, मीडिया आणि धोनी
sakal

बोलून बातमी शोधा

Mahendra Singh Dhoni

ओसाका, मीडिया आणि धोनी

sakal_logo
By
शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

अव्वल आणि दिग्गज टेनिसपटू नाओमी ओसाका आणि मीडिया ही बाब केवळ टेनिसमध्येच नव्हे, तर संपूर्ण क्रीडाविश्वात गाजत आहे. त्यामुळे ओसाका, मीडिया इतपत ठीक आहे; पण याचा धोनीशी काय संबंध...? शीर्षक वाचून अनेकांना हा प्रश्न निश्चितच पडला असेल. ओसाका आणि आपला महेंद्रसिंह धोनी यांचा तर दुरान्वयेही संबंध नाही; पण त्यांचा संबंध मीडियाशी मात्र चांगलाच आणि तोही तितकाच जवळचा आहे. सर्वसामान्य खेळाडू ते स्टार खेळाडू आणि स्टारडम ते लीजंड अर्थात् महान खेळाडू हा प्रवास होत असतो तेव्हा प्रसिद्धी, पैसा, लौकिक या बाबी त्या महान खेळाडूची आभूषणं ठरत असतात. त्याच वेळी या आभूषणांना मीडियातून मिळणारी झळाळी अधूनमधून काळवंडतही असते.

अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर ते टिकवता आलं पाहिजे, तसंच मीडियाचा त्रासही झेलता आला पाहिजे किंवा त्याला शरणही आणता आलं पाहिजे. ओसाका यात कमी पडतेय. धोनीनं मात्र प्रसंगी हा त्रास उसळत्या चेंडूसारखा डक करून सोडून दिला आणि कधी तर त्याला फुलटॉस करून षटकारही ठोकला. खेळातील गुणवत्ता पराकोटीची असेल आणि त्याच्या जोडीलाच वाक्चातुर्यही असेल तर परिपूर्ण होता येतं. ते कसं हे धोनीनं कधीच दाखवून दिलं आहे.

सन २०१३ च्या आयपीएलच्या मध्यावर तिघा खेळाडूंना स्पॉटफिक्सिंगप्रकरणी अटक झाली, पुढं चौकशी होता होता त्यात तत्कालीन बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पनही होता. तो त्या वेळी चेन्नई सुपर किंग्ज् संघाचा सीईओ होता. तो करत असलेल्या सट्टेबाजीपर्यंत हे प्रकरण गेलं होतं. धोनी त्यामुळे बदनाम होत होता. आयपीएल संपली आणि लगेचच भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होणार होता, त्यामुळे मुंबईत कर्णधार या नात्यानं त्याची पत्रकार परिषद झाली. चॅम्पियन्स स्पर्धेबाबतच प्रश्न विचारावेत, असा आदेश निघाला असला तरीही दरेक प्रश्नानंतर आयपीएलबाबतच्या प्रश्नांची सरबत्ती होत होती; पण धोनी मौनीबाबा झाला होता आणि त्याबाबत कुत्सितपणे हसत एकाही प्रश्नाचं उत्तर तो देत नव्हता. त्याचं स्मितहास्य मीडियाला मूर्खात काढणारं होतं.

दुसरा प्रसंग : २०१६ मध्ये मायदेशात झालेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताचं आव्हान मुंबईत झालेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या उपांत्य सामन्यात संपुष्टात आलं. कर्णधार धोनीची पत्रकार परिषद सुरू झाली. धोनीला निवृत्तीबाबत प्रश्न विचारला जाणं अपेक्षित होतं. हा प्रश्न विचारला तो ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारानं. त्या वेळी धोनीनं राग दर्शवला नाही, तर विनोदबुद्धी दाखवत त्यानं त्या पत्रकारालाच डायसवर बोलावलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला विचारलं....‘मी खराब खेळतोय? मी थकलेला वाटतोय? किंवा तुझ्या कुण्या मित्राची संघातली जागा मी अडवतोय?’

या प्रश्नांना त्या पत्रकारानं अर्थातच ‘नाही,’ ‘नाही, अशीच उत्तरं दिली.

त्यानंतर ‘तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच दिलं आहेस,’ असं सांगत धोनीनं त्याचीच नव्हे, तर तमाम मीडियाची फिरकी घेतली होती. पत्रकारांनी विचारलेले प्रश्न वाक्चातुर्याद्वारे खुबीनं हाताळण्याचं कौशल्य म्हणतात ते हेच.

धोनीच्या या दोन उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते. मीडियाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे यावर, म्हटलं तर मीडियाची भीती वाटते आणि म्हटलं तर मीडियाची आवश्यकताही भासते. ओसाकानं भीती बाळगली आणि तिनं स्वतःच अडचण करून घेतली. भारतीय महिला क्रिकेट कर्णधार मिताली राजनं तर ‘मीडियाची आम्हाला आवश्यकता आहे,’ असं सांगत समोर आलेल्या प्रश्नाला सन्मानानं कशी बगल द्यायची याची परिपक्वता नुकतीच दाखवली.

मीडिया हा अविभाज्य घटक

दुखापती हा खेळातील अविभाज्य भाग आहे हे सत्य आहे...तसंच खेळाडूंच्या प्रगतीत मीडिया हासुद्धा अविभाज्य भाग आहेच. मुद्रित, दृक्-श्राव्य आणि सध्याचा समाजमाध्यम (सोशल मीडिया) असे मीडियाचे तीन प्रकार आहेत.

पहिल्या दोन पारंपरिक मीडियांचा सामना करणं कठीण नाही. कधी कधी एखादा सामना, मालिका किंवा स्पर्धा सुरू असताना वर्तमानपत्रातील किंवा टीव्हीवरील बातम्यांपासून खेळाडूंना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जातं; पण कधी कधी हाच मीडिया तुम्हाला आव्हानात्मक परिस्थितीत साथही देत असतो. एखादी चांगली बातमी किंवा मुलाखत प्रोत्साहक ठरते; परंतु सध्याच्या सोशल मीडियातून एखाद्या पोस्टवर नको नको त्या प्रतिक्रिया उमटत असतात. ओसाकानं पहिल्या दोन मीडियांपासून पळ काढला; पण सोशल मीडियाचं काय करणार?

अर्थात्, तिला सध्या तरी आजी-माजी खेळाडूंकडून पाठिंबा मिळतोय; पण लगेचच विम्बल्डन आणि त्यापुढं उर्वरित दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा होणार आहेत. तिथंही सामन्यानंतर पत्रकार परिषद बंधनकारक आहे, मग प्रत्येक वेळी ओसाका माघार घेणार?

जगावेगळी ओसाका

ओसाका ही जगावेगळ्या प्रवृत्तीची खेळाडू आहे. अन्याय तिला सहन होत नाही हे तिच्या खेळातून, कृतीतून आणि वक्तव्यातून स्पष्ट होतं. वंशभेदावरून आणि वर्णभेदावरून ती उघड लढा देत आहे. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ या प्रकरणावर जॉर्ज फ्लॉईडच्या स्मृतिस्तंभाला भेट दिल्यानंतर तिनं अमेरिकन ओपन स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठल्यानंतर माघार घेतली होती. आता ‘मीडियामुळे आपलं मानसिक स्थैर्य बिघडतं,’ असं सांगत प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपनमधून तिनं मध्येच माघार घेतली. यावरून खेळाडूंच्या मानसिकतेचा प्रश्न पुन्हा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ऐरणीवर येत आहे हे स्पष्ट होतं...या सगळ्यावर ‘धोनीचं वाक्चातुर्य’ हाच जालीम उपाय दिसून येतो.