

Shamit Dash Artistic Journey
esakal
हर्ष भटकळ
शमीत दाश यांना चार्ल्स वॅलीस अभ्यासवृत्ती मिळाल्याने ते लंडनच्या कॅम्बरवेल कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये जाऊ शकले. तिथे त्यांचा ‘आर्टिस्ट्स बुक’ आणि दस्तऐवज जोपासण्याची अभिलेखागार पद्धत यांच्याशी अधिक गहिरा परिचय झाला. हे सर्व आवश्यकच होते. दाश आवर्जून सांगतात, की एकाच माध्यमात मला कधीही रस नव्हता. जे सुचते त्यानुसार माध्यम ठरते.
प्रत्येक वस्तू, निसर्गचित्र आणि छोटीशी आठवण या सर्वामागे एक कथा असते, जी शोधून काढली पाहिजे असे कलावंत शमीत दाश यांना वाटते. चित्रे काढण्यापेक्षा जन, स्थळ आणि वेळ यातील अदृश्य धागेदोरे शोधून काढणे हेच त्यांच्या कलेचे साध्य आहे. शमीत दाश यांच्याशी बातचीत करताना सुरुवातीला ज्या काही गप्पा होतात. त्यांत आठवण येते ती एका तुटक्या सुटकेसची, ज्यात ते जमशेदपूरला असताना बालपणात स्टॅम्प, भेटकार्ड, कॅलेंडरवरील चित्रे, वर्तमानपत्रातील कात्रणे आणि फोटो जमवून ठेवायचे. आठवडा अखेर ते सगळे काढून ते प्रौढीने त्यांच्या दोन-तीन जवळच्या मित्रांना ही जमवाजमव दाखवायचे. आज त्यांना त्यांची गंमत वाटते. ‘हे सारं माझं पहिलं संचित होतं.’ आता मात्र त्यांचे अनेक दृष्ट्या विशेष महत्त्व वाटते. त्या छोट्याशा बॅगेत त्याच्यातील कलात्मकतेचे बीज सापडते. गेल्या कित्येक वर्षात दाश यांनी पेंटिंग, छायाचित्रे, कोलाज, रचनाशिल्प, कलाकारांच्या पुस्तकांची मांडणी आणि जमवलेल्या वस्तू यांवर काम केले आहे. या सगळ्या खटाटोपामागे आहे एकच प्रेरणा जमवाजमव करणे, त्या वस्तूंची जोपासना करणे आणि त्यातूनच भोवतालच्या जगाचा अर्थ लावणे.