
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
आपण दैनंदिन आयुष्यात सतत शब्दांचा वापर करतच असतो; पण त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन, त्याचं सतत चिंतन करणं आणि त्यातून काही छान गवसणं यासाठी शांताबाईंची दृष्टी हवी. शब्दांकडे बघण्याची त्यांची दृष्टी खरोखरीच विलक्षण आहे.
शांताबाई शेळके हे नाव आठवलं, की त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीचे विविध पैलू दिसू लागतात. कविता, गीत, ललित, अनुवाद, बालसाहित्य, व्यक्तिचित्र, कथा असे सर्व साहित्यप्रकार शांताबाईंनी हाताळले; पण हे सगळं प्रकट करण्याचं माध्यम एकच - शब्द! शांताबाईंचा व्यासंग अफाट होताच; पण ‘शब्द’ हा विषयच त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा होता. म्हणजे शब्दावर त्यांच्या अनेक कविता आहेत. शिवाय, त्यांना एकेका शब्दाविषयीही कुतुहल वाटायचं. कधी शब्दांमधील साधर्म्य, नेमका अर्थ शोधताना त्यांना विलक्षण आनंद वाटायचा. त्यांची ललित लेखांची पुस्तकं वाचली, की ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.