अखिलेश धडा घेणार कधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akhilesh yadav and yogi adityanath

उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर येथील पोटनिवडणुकांचे निकाल हे अखिलेश यादव यांची अस्वस्थता वाढवणारे आहेत.

अखिलेश धडा घेणार कधी

- शंतनु गुप्ता saptrang@esakal.com

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्याकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा देत राज्याच्या राजकारणात लक्ष घातलं. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचा मुस्लिम चेहरा असलेले आझम खान यांनीदेखील खासदारकीचा राजीनामा देत विधानसभा निवडणुकांकरिता कंबर कसली. यादव यांचा आझमगड आणि खान यांचा रामपूर हा मुस्लिम आणि यादव मतं असणारा समाजवादी पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांत पक्षाच्या उमेदवाराचा सहज विजय होऊ शकतो, असं अखिलेश यादव यांचं गृहीतक होतं. मात्र मोदींच्या भाजपचं सरकार असलेल्या योगींच्या उत्तर प्रदेशात कोणत्याही नेत्याने आपल्या पारंपरिक मतदारसंघातील निवडणुकीत गाफील राहण्याचा धोका पत्करू नये, हे या पोटनिवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिलं.

उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर येथील पोटनिवडणुकांचे निकाल हे अखिलेश यादव यांची अस्वस्थता वाढवणारे आहेत. समाजवादी पक्षाचे पारंपरिक लोकसभा मतदारसंघ असलेल्या या दोन्ही ठिकाणी पक्षाला भाजपकडून पराभव पत्करावा लागला.

रामपूर येथून ४२ हजार १९२ आणि आझमगड येथून ८ हजार ६७९ इतक्या मताधिक्याने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. या निकालातून समाजवादी पक्ष, राजकीय विश्लेषक आणि भाजपलादेखील दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक म्हणजे - मोदी-योगींचं डबल इंजिन असल्यास बहुपक्षीय निवडणुकीच्या मैदानात, उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व, म्हणजे ८० लोकसभा सीट जिंकणं हे भाजपसाठी कल्पनेपलिकडची बाब नाही. दुसरी म्हणजे - मुलायम सिंह यांचा राजकीय वारसा चालवायचा असल्यास अखिलेश यादव यांना ट्विटर आणि पत्रकार परिषदा यांतून बाहेर पडत पूर्णवेळ राजकारणात उतरावं लागेल.

अखिलेश यादव यांनी वडिलांकडून आणि काकांकडून पक्षाची सूत्रं आपल्या हाती घेतल्यापासून पक्षाला उतरती कळा लागली आहे. समाजवादी पक्षाला २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला; २०१७च्या निवडणुकीत पक्षाचा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील पराभव झाला; २०१९च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागलं; २०२१मध्ये पंचायत समित्यांच्या निवडणुकांत पक्षाचा पुन्हा पराभव झाला. २०२२च्या विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा पराभव आणि आता पोटनिवडणुकांतदेखील समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं. अखिलेश यादव यांच्यासाठी निवडणुकांतील विजयाचं सूत्र म्हणजे केवळ व्होट बँकेची गोळाबेरीज आहे.

समाजवादी पक्षाने २०१४ पासून विविध समीकरणं जुळवून पहिली आहेत. कधी काँग्रेसबरोबर युती, तर कधी ‘बसप’बरोबर आघाडी; अखिलेश यांनी कधी छोट्या राजकीय पक्षांबरोबर जाऊन, तर कधी एकटं लढून पहिलं आहे. परंतु मोदी आणि योगींच्या प्रत्येक निवडणुकीतील अथक परिश्रम आणि प्रशासन कौशल्यासमोर अखिलेश यांचे हे सर्व वरवरचे प्रयत्न निष्फळ ठरले.

समाजवादी पक्षाकडून होत असलेली घोडचूक म्हणजे, हा पक्ष आत्मचिंतन करायला तयारच नाही. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांधल्या पराभवानंतर पक्ष प्रवक्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘बसप’वर मतांचं विभाजन केल्याचं खापर फोडलं. माध्यमं वस्तुस्थिती दाखवत नाहीयेत, उत्तर प्रदेश प्रशासनाने निष्पक्ष निवडणुका होऊ दिल्या नाहीत अशीही भूमिका पक्षाने घेतली. सर्वात विचित्र आरोप म्हणजे, ‘उत्तर प्रदेशची जनता भोळसट आणि पटकन फसणारी असून, तिला सत्य समजत नाही, त्यामुळेच तिने चुकीच्या पक्षाला मतदान केलं.’ एखाद्या पक्ष प्रवक्त्याने लोकांसमोर पक्षाची बाजू सावरून घेणं हे स्वाभाविक असलं तरी, खासगीत अखिलेश यांना जाब विचारणारी एखादी तरी समजदार व्यक्ती पक्षात असेल अशी आशा करू या. अखिलेश यांची १७ व्या लोकसभेतील उपस्थिती केवळ ३६ टक्के इतकी कमी का आहे? आझमगडचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिलेश यांनी २०१९ पासून लोकसभेत एकही प्रश्न का विचारला नाही? रामपूर आणि आझमगडच्या पोट-निवडणुकीच्या प्रचारात अखिलेश यांनी एकही दिवस सहभाग का घेतला नाही? असे अनेक प्रश्न आहेत. मात्र दुर्दैवाने, या परिवारवादी पक्षात एकही कार्यकर्ता हे प्रश्न आपल्या वरिष्ठांना विचारू शकत नाही. पक्षातील या परिस्थितीचं ताजं उदाहरण म्हणजे, अखिलेश आणि आझम खान यांच्यामध्ये झालेल्या किरकोळ वादामुळे अखिलेश यांनी रामपूर मतदारसंघात प्रचाराला दांडी मारली, तर आझमगड विधानसभा मतदारसंघात यादव कुटुंबातील ‘यादवी’मुळे डिंपल यादव यांच्याऐवजी धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी मिळाल्यामुळे अखिलेश यादवांनी या पोटनिवडणुकीपासून दूर राहणं पसंत केलं.

उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षदेखील काही संघटनात्मक समस्यांना तोंड देत आहे. संक्रमण अवस्थेत असलेले राज्यातील पक्ष संघटन नव्या प्रदेशाध्यक्षांच्या प्रतीक्षेत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे पक्ष कार्यकर्तेदेखील थकले आहेत. असं असूनदेखील पोटनिवडणुकीची धुरा सांभाळणाऱ्या स्वतंत्रदेव सिंह यांनी आपल्या सर्व क्षमतेनिशी उत्तम रणनीती आखत पोटनिवडणुकीत विजयश्री खेचून आणली. योगी आदित्यनाथ हे सध्या नव्याने प्रशासनाची घडी बसवण्यात व्यग्र असले तरी त्यांनी या पोटनिवडणुकांत गांभीर्याने लक्ष घातलं, या दोन्ही जागांवर स्वतःची सर्व ताकद लावली, प्रत्यक्ष प्रचारात सहभाग घेतला. या वेळी भाजपने मोदींना या निवडणुकीत लक्ष घालण्याची आवश्यकता भासू दिली नाही. मोदींच्या लोककल्याणकारी योजना आणि योगींनी त्या योजनांची केलेली प्रभावी अंमलबजावणी यामुळे विरोधी पक्षाच्या कोणत्याही पारंपरिक आणि हक्काच्या मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आणण्याचं सामर्थ्य पक्षाने आत्मसात केलं आहे, असाच या निकालाचा मथितार्थ काढावा लागेल. त्यामुळे आझमगड आणि रामपूर येथील पोटनिवडणुकांत योगींनी आपलं सामर्थ्य पुन्हा सिद्ध केलं असंच म्हणावं लागेल.

Web Title: Shantanu Gupta Writes Uttar Pradesh Akhilesh Yadav Yogi Adityanath Politics Vidhansabha Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top