'....तरच शरद पवार नावाच्या नेतृत्वाचं मोठंपण समजेल'

sharad pawar shrimant mane vinayakdada patil exclusive interview nashik news
sharad pawar shrimant mane vinayakdada patil exclusive interview nashik news

प्रश्‍न : इतरांसाठी आहेत तसे शरद पवार तुमच्यासाठीही "अनप्रेडिक्‍टेबल' आहेत का?
विनायकदादा पाटील : शरद पवार असंच का वागतात, वेळोवेळी भूमिका का बदलतात, आपल्या आकलनापलीकडचे निर्णय का घेतात, "मोस्ट अनप्रेडिक्‍टेबल' अशी त्यांची प्रतिमा का आहे, असे अनेक प्रश्‍न राजकारण्यांच्या मनात येतात. त्यांची उत्तरं पवारांच्या पन्नास वर्षांच्या संसदीय कारकीर्दीत सापडतील. यांपैकी किमान तीस वर्षं केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात राजकीय अस्थिरतेची, कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळालेली स्थिती राहिली, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या राजकारणाचा कालखंड, "स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेली थोर माणसं आणि राजकारण हा शुद्ध व्यवहार-व्यापार मानणारी नवी पिढी' या दोहोंमधला, थोडा संधिकाळाचा आहे. त्यातही चार-सहा खासदार व पन्नास-साठ आमदार निवडून आणणाऱ्या नेत्याचं राजकारण म्हणजे कुडाच्या झोपडीत अडचणीतला फाटकातुटका संसार चालवणाऱ्या दक्ष सुगरणीसारखं. मोठे पाहुणे घरी येणार असल्यावर ती सुगरण जशी तेल-तिखट-पिठाची जुळवाजुळव करते, तशी राजकीय जुळवाजुळव पवारांना सतत करावी लागली. परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावे लागले. हे लक्षात घेतलं तरच शरद पवार नावाच्या नेतृत्वाचं मोठंपण समजेल.

प्रश्‍न : पण तरीही इतकं धक्‍कातंत्र कसं जमतं त्यांना?
विनायकदादा : आपल्याला सवय असलेलं अवतीभवतीचं पठडीतलं राजकारण अन्‌ शरद पवार हे थोडं वेगळं समीकरण आहे. पवारांचा सामाजिक, राजकीय पिंडच मुळी पठडीबाहेरचा आहे. एखाद्या आव्हानात्मक स्थितीतून बाहेर पडताना, आपलं आकलन, पर्याय, क्षमता अन्‌ पवारांचा विचार वेगळा असतो. सामान्य माणसं जेव्हा दोन पर्यायांचा विचार करतात, तेव्हा पवार दहापट पुढं असतात. अर्थातच त्यांचा निर्णय मग आपल्या आकलनापलीकडचा, कल्पनातीत ठरतो. आपली जेवढी नजर तेवढंच दिसतं. जे त्याबाहेरचं ते आपल्यासाठी धक्‍कादायक असतं. परिणामी, हेतूबद्दल शंका घेतली जाते.

अशाच शंकांमुळं राजकारणापलीकडचं कला, क्रीडा वगैरे क्षेत्रांतलं पवारांचं कर्तृत्व बऱ्याच वेळा केवळ असूयेपोटी दृष्टिआड केलं गेलं, असं वाटतं. रविवारी ते नाशिकमध्ये राष्ट्रीय कुमार खो-खो स्पर्धेची बक्षिसं वितरित करणार आहेत. हे ऐकून अनेकांना, "इथंही पवारच का,' असं वाटू शकतं. कारण, तब्बल 37 वर्षं ते खो-खो संघटनेचे अध्यक्ष होते, हे त्यांना माहिती नसतं. त्यांच्याकडील आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचं अध्यक्षपद बहुतेकांना खेळाच्या क्षेत्रातला पैसा पाहून राजकारण्यांनी केलेली घुसखोरी वाटते. पण, तो पैसा कुणामुळं आला अन्‌ पुढं क्रिकेटमधला पैसा अन्य खेळांकडंही कसा वळला, याचा विचार होत नाही. पवारांचे सासरे सदू शिंदे किंवा माधव आपटे, बापू नाडकर्णी मंडळींना एका सामन्याचे आठ रुपये मिळायचे, हे कुणाला आठवत नाही. क्रिकेटशिवाय कबड्डी, कुस्तीमध्ये त्यांनी केलेलं काम लोकांना माहीत नसणं, हादेखील आधी उल्लेख केलेल्या संधिकाळाचा महिमा म्हणावा लागेल.

प्रश्‍न : सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून कलाक्षेत्रातले पवारांचे प्रागतिक विचार जवळून अनुभवले असतील तुम्ही?
विनायकदादा : हो. मी, श्रीनिवास पाटील, बी. के. अग्रवाल वगैरे मंडळींनी सतरा-अठरा वेळा "घाशीराम कोतवाल' पाहिलं असेल. कलाक्षेत्राला मदत करायची म्हणजे कलावंतांच्या, त्यांच्या निर्मितीच्या व अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या पाठीशी उभं राहायचं असतं. ते जसं "घाशीराम कोतवाल'च्या वेळेस केलं, तसंच "सिंहासन'च्या वेळेसही पवारांनी केलं. "घाशीराम...'ला पुण्याचा, तर "सिंहासन'ला साताऱ्याचा विरोध होता. "घाशीराम कोतवाल'च्या प्रयोगांना संरक्षण देणं ही ब्राह्मणविरोधी कृती आहे, असा संकुचित विचार करणाऱ्यांना अभिव्यक्‍तिस्वातंत्र्याचा, प्रागतिक विचारांचा विस्तारित परीघ समजणार नाही. असंच नामांतरावेळी झालं. तसंच महिलांना आरक्षण देण्याबाबत झालं. आपल्या राजकारणाचं नुकसान होतंय हे स्पष्ट दिसत असताना विद्यापीठ नामांतराचा निर्णय घेण्यातलं धाडस समाजानं समजून घेतलं नाही. सचिवालयाच्या पाचव्या मजल्यावर लोकांचा मार खाणाऱ्यांपैकी आम्ही होतो. महिलांच्या रूपानं निम्म्या लोकसंख्येला आपण अडगळीत टाकणं, संधी नाकारणं योग्य नाही, हा विचार पंचवीस वर्षांपूर्वी करण्यातलं द्रष्टेपण समजून घ्यायला हवं.

प्रश्‍न : आमदारकीच्या निवडणुकीत शंभर टक्‍के यश असो, की कांदा आंदोलन, शरद पवार व नाशिक जिल्हा हे एक अतूट नातं बनलंय, त्याबद्दल...
विनायकदादा : शरद पवार 67 मध्ये आमदार बनले. काही दिवसांत त्यांच्याकडं कॉंग्रेसचं पदही आलं. त्या वेळी मी निफाड पंचायत समितीचा सभापती होतो. पुणे, नाशिक व सातारा हे त्यांचा संपर्क आलेले सुरवातीचे जिल्हे. तसं पाहता पुणे जिल्ह्यात ते नवखे व एकटेही होते. तिथलं राजकारण अण्णासाहेब मोहोळ, शंकरराव बाजीराव पाटील, अण्णासाहेब मगर यांच्याभोवती फिरत होतं. त्यातही चव्हाण-हिरे स्पर्धेत पुणे जिल्हा भाऊसाहेब हिरेंच्या अधिक पाठीशी. मूळगाव नांदवळ सातारा जिल्ह्यात असूनही पवारांचा तिकडं संपर्क नंतर वाढला. त्याआधी हिरेंच्या नाशिकमध्ये नाळ जुळली. पंडित धर्मा पाटील, मालोजीराव मोगल, निहाल अहमद, अण्णासाहेब कवडे, ए. टी. पवार, कचरूभाऊ राऊत, हरिभाऊ महाले, विलास लोणारी, मुरलीधर माने, हारून अन्सारी वगैरे त्यांचे प्रारंभीचे सहकारी. एखाद्या जिल्ह्यात विश्‍वासू सहकारी शोधायचा व त्याला बळ द्यायचं, हे यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाचं तंत्र पवारांनी पुढं नेलं. नाशिकमध्ये आम्हा मित्रांना तसंच बळ त्यांनी दिलं. केवळ राजकारणात नव्हे, तर व्यक्‍तिगत मदत करत गेले. हे केवळ नाशिकमध्येच नाही. चंद्रपुरात एकनाथ साळवे, नागपुरात भाऊसाहेब सुर्वे, भाऊसाहेब मुळक, सोलापुरात नामदेवराव जगताप अशी अनेक उदाहरणं देता येतील.

नाशिक हा तसा श्रद्धाळू राजकारणाचा जिल्हा. या जिल्ह्यानं यशवंतराव चव्हाणांवर श्रद्धा ठेवली. चीन युद्धावेळी देशप्रेमानं भारलेल्या वातावरणात चव्हाणांना लोकसभेवर बिनविरोध पाठवलं. चव्हाणांचे राजकीय वारस म्हणून तशीच श्रद्धा पवारांच्याही वाट्याला आली. जिल्ह्यातल्या आमदारकीच्या सगळ्या जागा पदरात टाकण्याइतकी ही श्रद्धा प्रबळ ठरली. शिवप्रसाद डागा, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे, फिरोज मसानी, टी. आर. पवार, श्रीराम शेटे, हेमंत टकले वगैरे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचं वर्तुळ विस्तारत गेलं.

प्रश्‍न : पण, पवारांचं असंच मित्रवर्तुळ संपूर्ण देशभर आहे...
विनायकदादा :
अगदी सुरवातीला, जेव्हा शरद पवार केवळ आमदार होते अन्‌ देशात कॉंग्रेसचं एकछत्री राज्य होतं, तेव्हाही पवारांची राजकीय समष्टी पाहायला मिळाली. चंद्रशेखर, मोहन धारिया, दिनेश गोस्वामी, ए. के. अँटनी, वायलर रवी, प्रियरंजनदास मुन्शी वगैरे मंडळींनी "कॉंग्रेस फोरम फॉर सोशालिस्ट ऍक्‍शन' स्थापन केला होता. या मंडळींचा तो पक्षांतर्गत दबावगट होता. 72 च्या निवडणुकीत त्या दबावाचा वापर करून, फोरमच्या नावानं पवारांनी जवळपास पन्नास मित्रांना निवडणुकीची तिकिटं मिळवून दिली होती. पुढं पुलोद प्रयोगादरम्यान पवारांनी कॉंग्रेसबाहेर अन्य पक्षांमधलं आपलं वर्तुळ वाढवलं. त्यानिमित्तानं संपर्कात आलेले एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, वसंतराव भागवत, राम नाईक, राम कापसे, उत्तमराव पाटील, गणपतराव देशमुख, दत्ताजी साळवी वगैरे मंडळींमुळं पवार स्वत:च अधिक व्यापक बनत गेले. सध्या सर्व पक्षांमध्ये त्यांचा जो प्रभाव दिसतो, त्याचं मूळ हे असं देश तसेच राज्य पातळीवरील कृतींमध्ये आहे.

प्रश्‍न : राजकारणातून निवृत्त म्हणता म्हणता त्यांचं नाव राष्ट्रपतिपदासाठी घेतलं जातंय?
विनायकदादा :
शरद पवार हे भन्नाट व्यक्‍तिमत्त्व आहे. समोरचा माणूस पाहिला की ते त्याचं "स्कॅनिंग' करतात. एखादा का भेटायला आलाय हे तो सांगेपर्यंत वाट पाहण्याची गरज त्यांना पडत नाही. मनकवडे आहेत ते. इतक्‍या दशकांच्या माणसं अभ्यासण्यामधून आलंय हे कौशल्य त्यांच्या अंगी. त्यांचं "पोलिटिकल ऍसेसमेंट' जबरदस्त आहे. ते खूप लवकर माणसं हेरतात. नरेंद्र मोदींचं उदाहरण सांगता येईल. देशाचे कृषिमंत्री असताना केलेल्या इस्राईलच्या दौऱ्यांमध्ये तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री मोदी प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत होते. शरद पवारांच्या आजच्या भूमिकेचं वर्णन करायचं तर, सरपंच किंवा पोलिसपाटील अख्खं गाव ज्याचं ऐकतं असे ते राज्याचे, झालंच तर देशाचे वडीलधारे आहेत. महाराष्ट्रानं हा मान यशवंतराव चव्हाणांना दिला. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील हेही काही काळ राज्याचे वडीलधारे होते. आता बरीच वर्षं शरद पवार त्या स्थानी आहेत. या भूमिकेला त्यांची राजकीय निर्णयक्षमता, भूकंपाबद्दल सगळ्यांच्याच मनात असलेली अनामिक भीती, राज्याबाहेरचा संपर्क यामुळंच अवघे चार खासदार असूनही या नेत्याचं नाव राष्ट्रपतिपदासाठी चर्चेत असतं. त्यांच्या विरोधकांच्या दृष्टीनं हा "संताजी-धनाजी पाण्यात दिसावेत' असा प्रसंग आहे. महात्मा गांधींच्या भाषेत सांगायचं तर, "तुम्ही कोण आहात, यापेक्षा तुमचं कोण ऐकतं हे महत्त्वाचं असतं.' महाराष्ट्र राज्य, देशातले अनेक लोक शरद पवारांचं ऐकतात हे महत्त्वाचं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com