
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
गेल्या काही वर्षांमध्ये शॉन बेकर हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वाधिक चर्चिले गेलेल्या चित्रपटकर्त्यांच्या यादीचा अविभाज्य भाग बनले आहे. गेल्या दशकभरातील त्याच्या चित्रपटांची नावं पाहिली, तर ‘टँजरिन’ (२०१५), ‘द फ्लोरिडा प्रोजेक्ट’ (२०१७), ‘रेड रॉकेट’ (२०२१) असे एकाहून एक सरस चित्रपट या दिग्दर्शकाने बनवल्याचे दिसते. कमी खर्चात बनवलेले त्याचे हे चित्रपट निर्मितीच्या स्तरावर तसूभरही कमी पडत नाहीत. शिवाय, चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमध्येही यशस्वी ठरतात. त्यामुळेच मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीहून प्रचंड वेगळ्या धाटणीचे काम सातत्याने आणि धीटाईने करणारा हा चित्रपटकर्ता समकालीन ‘इंडी सिनेमा’मधील सर्वांत महत्त्वाचा आवाज ठरला आहे. ‘अनोरा’ (२०२४) या ताज्या चित्रपटाने या साऱ्यावर (पुन्हा एकदा) शिक्कामोर्तब केले आहे.