स्त्रीजन्मा म्हणुनी न व्हावे उदास

एका याचक भक्तापासून ते ‘देव तोची भक्त’ ह्या भूमिकेपर्यंतचा संत जनाबाईंचा प्रवास खरोखरच स्तिमित करणारा आहे.
स्त्रीजन्मा म्हणुनी न व्हावे उदास
Summary

एका याचक भक्तापासून ते ‘देव तोची भक्त’ ह्या भूमिकेपर्यंतचा संत जनाबाईंचा प्रवास खरोखरच स्तिमित करणारा आहे.

एका याचक भक्तापासून ते ‘देव तोची भक्त’ ह्या भूमिकेपर्यंतचा संत जनाबाईंचा प्रवास खरोखरच स्तिमित करणारा आहे. भक्तीपथाच्या सोप्या राजरस्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता निर्गुणसाधनेच्या एकाकी, अंधाऱ्या पायवाटेपर्यंत आलेला आहे. जनाबाईंना समजून घेतल्याशिवाय आपल्या परंपरेतील स्त्रीशक्तीचे वेगवेगळे आयाम आपल्याला समजून घेणे अशक्य आहे...

संत जनाबाई पहिल्यांदा भेटल्या त्या शाळेच्या मराठी पाठ्यपुस्तकांतून, ‘पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणी चारा’ म्हणणाऱ्या. पुढं याच अभंगातली दुसरी ओळ, ‘घार हिंडते आकाशी’ मी माझ्या पहिल्या पुस्तकाच्या शीर्षकासाठी वापरली, कारण तोवर जनी माझीच झाली होती. त्याआधी एकदा गोनीदांच्या ‘मृण्मयी’मध्ये जनी भेटली होती, ‘हरी रे, मज कोण्ही नाही, माझी खातसे डोई’ म्हणणारी. त्यातल्या त्या ’हरी रे’ ह्या आर्त हाकेतली अगतिक विकलता तेव्हा मनाला चटका देऊन गेली होती, पण तरीही जनी दूरस्थ होती. ‘स्त्रीजन्मा म्हणुनी न व्हावे उदास’ हे वाचलं आणि तेव्हा मात्र तेराव्या शतकातली जनी जणू शतकांच्या दगडांवरून उड्या घेत थेट एकविसाव्या शतकातल्या माझ्यापर्यंत आलीच नाही तर, थेट माझ्यात भिनली. पुढे मुलं लहान असताना एका पावसाळ्यात मी जनाबाईंचे सगळे साडेतीनशे अभंग वाचून काढले. पहिल्या वाचनात काही अभंग समजले, काही नाही, पण साध्या सरळ अशा तिच्या शब्दांमागं दडलेलं सात्त्विकपण लखलखीत तेज मात्र चांगलंच जाणवलं.

कोण होती जनी? परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड ह्या गावातल्या कष्टकरी घरातली ही मुलगी. त्यांचे वडील दमा आणि आईचे नाव करुंड. जनाबाई लहान असतानाच आई-वडिलांनी लेकीला पंढरपूरला संत नामदेव यांचे वडील दामाशेटी यांच्याकडं कामासाठी आणून सोडलं आणि त्यानंतर लगेचच दोघांचाही मृत्यू झाला. जनाबाई वाढल्या त्या नामदेवांच्या कुटुंबात, घरकाम करणारी बाई म्हणून. नामदेवांचं संपूर्ण घराणं भागवतांचं, विठ्ठलभक्तांचं. थोडी त्यांच्या प्रभावानं आणि थोडी स्वतःमधल्या उपजत सात्त्विकतेनं जनाबाई देखील निस्सीम विठ्ठलभक्त बनली. शाळेत कधी त्या गेल्या नाहीत, पण नामदेवांनी त्यांना शिकविलं असेल, कारण त्या अभंग प्रसवू लागल्या. तेही साध्या सोप्या भाषेत, त्या रोज जे काम करायच्या त्या कामाच्याच लयीत. त्यांचा परमार्थ निवृत्ती मार्गाचा नव्हता तर प्रवृत्ती मार्गाचा होता. ‘दळीता कांडिता तुज गाईन अनंता’ हे त्यांचं साधं सरळ तत्वज्ञान! कदाचित त्यामुळंच ते मराठी समाजातल्या कष्टकरी माणसांना आजही आपलेच वाटते. कदाचित त्यांची भाषा सरळ सोपी, सामान्य लोकांच्याच तोंडची होती म्हणूनही असेल. पण त्यांची गाणी आजही महाराष्ट्रातल्या हजारो स्त्रियांच्या ओठांवर असतात, हे खरं आहे.

जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें । साद्य परिसिलें तुह्मीं संतीं

जनीचे हो बोल स्वानंदाचे डोल ।

स्वात्ममुखीं बोल दुणावती

स्वतःच्या लिखाणाबद्दल लिहिताना जनाबाई म्हणतात, ‘मी बोलते तसे लिहिते, हे माझे बोल म्हणजे स्वानंदाचे, स्वअनुभूतीचे डोल आहेत.’ पण हे तिला कळते खूप उशिरा, ज्ञानदेवांसारख्या श्रेष्ठ योग्यांच्या सहवासात आल्यानंतर. सुरवातीच्या त्यांच्या अभंगांमध्ये एक दुखावलेपण आहे, आपण अनाथ आहोत, आपलं जवळचं असं कोणी कोणी नाही, ही एकलेपणाची भावना त्यांच्या सुरवातीच्या अभंगांना व्यापून उरलेली दिसते. ह्या अभंगांमधून ’दासी जनी’, ‘नामयाची दासी जनी’ असं त्या स्वतःचं नांव गुंफतात. त्यांच्या समाजातल्या स्थानाचा त्यांना विसर पडलेला नाही.

आई मेली बाप मेला । मज सांभाळीं विठ्‌ठला ॥१॥

हरीरे मज कोणी नाहीं । माझी खात असे डोई ॥२॥

अशी विठ्ठलाची आर्त विनवणी करताना त्यांना आपल्या नीच जातीमुळं बाहेर ठेवलं जातंय ही देखील जाणीव चटका देत असते.

राजाई गोणाई । अखंडित तुझे पायीं ॥१॥

मज ठेवियेलें द्वारीं । नीच ह्मणोनी बाहेरी ॥२॥

नारा गोंदा महादा विठा । ठेवियलें अग्रवाटा ॥३॥

देवा केव्हां क्षेम देसी । आपुली ह्मणोनी जनी दासी ॥४॥

ह्या सुरवातीच्या अभंगांमध्ये त्यांना स्व-सामर्थ्याची ओळख पटलेली नाही. त्यांची साधना अजून अपुरी आहे. दिवस जातात, संत सहवासानं जनाबाईंच्या बरेच काही कानी पडते, त्यांची भक्तीही हळूहळू प्रगल्भ, समर्थ होत जाते. आता त्यांना ’हरी रे, मज कोण्ही नाही’ असं म्हणून त्या सावळ्यापुढं पदर पसरण्याची गरज नाही. त्यांच्या भावापुढं झुकून तो स्वतःच येतोय, सखा म्हणून, सुहृद म्हणून, जनाबाईंचं काम हलके करायला.

झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥

पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥

ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥

जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥

जनी झाडलोट करते तर देव केर भरू लागतो, कचऱ्यानं भरलेली पाटी स्वतःच्या शिरावर घेऊन दूर नेऊन टाकतो. तिच्या भक्तीला भुलून तो चक्रपाणी अशी हलकी कामं करतो म्हणून जनी त्यालाच म्हणते, ‘कशी रे उतराई होऊ तुझी’? आता ती फक्त जनी आहे, ‘नामयाची दासी’ जनी नाही. तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आता हळूहळू उमलू लागलेलं आहे. आता देव तिचा तारणहार नाही, तर तिच्या बरोबरीचा सखा आहे. आपल्या भावाच्या जोरावर तिनं त्याला मानवी पातळीवर आणलेले आहे.

याच्या पुढची पायरी म्हणजे अद्वैत, जिवा-शिवाचे एकात्म होणे. जनी आता ह्या आध्यात्मिक प्रवासात इतकी पुढं निघून आलेली आहे, की आता देव आणि ती एकच आहेत.

देव खाते देव पीते । देवावरी मी निजतें ॥१॥

देव देते देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥२॥

देव येथें देव तेथे । देवाविणें नाहीं रीतें ॥३॥

जनी म्हणे विठाबाई । भरुनि उरलें अंतरबाहीं ॥४॥

आता देव तिचाच आहे, किंबहुना ती देवाची आहे. ती देव खाते, देव पीते, देवासवे व्यवहारीते, देव तिला आंतरबाह्य व्यापून उरला आहे. आता ती कुणाची दासी नाही, कुणाकडं दयेची वा प्रेमाची भीक मागणारी याचक नाही. आता जनाबाईंना स्वतःचा आवाज सापडलेला आहे, त्यांचं कूळ, त्यांचं स्त्री असणं, घरातली मोलकरीण असणं ह्या सर्व असण्यांच्याही पलीकडं एक असणं आहे, एक व्यक्ती म्हणून, एक लिंगभेदविरहित आत्मा म्हणून. ही जाणीव आता जनाबाईंना झालेली आहे. म्हणून त्या आता म्हणतात;

स्त्री जन्म ह्मणवुनी न व्हावें उदास ।

साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥

संतांचे घरची दासी मी अंकिली ।

विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥

विदुर सात्त्विक माझिये कुळीचा ।

अंगिकार त्याचा केला देवें ॥३॥

न विचारितां कुळ गणिका उद्धरिली ।

नामें सरती केली तिहीं लोकीं ॥४॥

स्त्री जन्म मिळाला म्हणून उदास होण्यासारखं काहीच नाही, संतांच्या घरच्या या दासीला जर तो श्रीहरी आपली प्रेमकळा देऊ शकतो, सात्त्विक अशा दासीपुत्र विदुराला जवळ घेऊ शकतो, गणिकांचा उद्धार करू शकतो, अशाच्या नामस्मरणाचं बळ जनीजवळ असता कशाचा लिंगभाव, आणि कशाचा लिंगभेद? ही जनाबाई वेगळी आहे, तेजाची पुतळी आहे, अद्वैताची साक्ष पटलेली ब्रह्मवादिनी आहे. तिला आता भेदाभेद दिसतच नाही.

पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी ।

काय या दोन्हीपणीं वेगळीक ॥१॥

माती तेचि धूळ धूळ तेचि माती ।

भेंडा आणि भिंती काय दोन ॥२॥

साखरीं गोडी गोडी साखरेसी ।

थिजलें तुपासी काय दोन्ही ॥३॥

डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा ।

शांति ज्ञानकळा काय भिन्न ॥४॥

संत तेचि देव देव तेचि संत ।

म्हणे जनी मात गोष्‍टी भिन्न ॥७॥

परब्रह्म एकच आहे आणि संतही तेच आहेत हे सांगण्यासाठी किती सरळ, सोपे गोड दृष्टांत देते पाहा जनी.

ह्याच्या पुढची पायरी म्हणजे सर्व बंधनं सोडून निसुगी होण्याची. जिला जिवा-शिवामधलं अद्वैत पुरतेच उमगलेलं आहे, ती जीवनमुक्ताच आहे खरं तर. मग समाजाच्या बंधनांची, भल्या-बुऱ्या लोकापवादाची चिंता जनीनं का करावी? ही बघा ती चालली पंढरपूरच्या बाजारी, तीही कशी, तर तिच्या डोईवरचा पदर खांद्यावर सरकलाय, एका हातात वीणा आणि एका हातात टाळ घेऊन ती ताठ मानेनं चालतेय. तुम्ही खुशाल घाला तिच्या मनगटावरती तेल, ती तर आता वेसवाच झाली आहे.

डोईचा पदर आला खांद्यावरी ।

भरल्या बाजारीं जाईन मी ॥१॥

हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा ।

आतां मज मना कोण करी ॥२॥

पंढरीच्या पेठे मांडियेले पाल ।

मनगटावर तेल घाला तुह्मी ॥३॥

जनी म्हणे देवा मी झालें येसवा ।

रिघाले केशवा घर तुझें ॥४॥

लिंगभाव तिनं पूर्ण भिरकावला आहे, त्याबरोबरच लोकलज्जा, भीड सगळं सगळं जनीनं आता आत्मा जुनं शरीर त्यागतो तसं त्यागलेलं आहे, आता तिच्या जवळ आहे ते तिचं निखळ स्वत्व आणि तिची लखलखती बावनकशी भक्ती. या अभंगाचा अर्थ लावताना प्रख्यात भारतीय कवी आणि विचारवंत किंचित थबकतात, म्हणतात, ‘पदर खांद्यावर येणे म्हणजे लिंगभावाला भिरकावून देणे आहे. लिंग, जात, वय, रूप ह्या सर्वांची पुटं खरवडून काढली की जो गाभा दिसतो ते व्यक्तीचं खरं रूप, ते आता जनीला गवसलं आहे.’

एका याचक भक्तापासून ते ‘देव तोची भक्त’ ह्या भूमिकेपर्यंतचा हा जनाबाईंचा प्रवास खरोखरच स्तिमित करणारा आहे. भक्तीपथाच्या सोप्या राजरस्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता निर्गुणसाधनेच्या एकाकी, अंधाऱ्या पायवाटेपर्यंत आलेला आहे.

ऐसी विश्रांति लाधली । आनंद कळा संचरली ॥३॥

तेथें सर्वांग सुखी झालें । लिंगदेह विसरलें ॥४॥

त्या एकी एक होता । दासी जनी नाहीं आतां ॥५॥

नामयाची दासी आता साधनेच्या अवघड मार्गावर इतकी पुढं निघून गेलेली आहे, की ती लिंगदेह विसरलेली साक्षात आनंदकळाच आहे. अशी ही जगावेगळी जनी, तिला समजून घेतल्याशिवाय आपल्या परंपरेतील स्त्रीशक्तीचे वेगवेगळे आयाम कसे बरं समजून घेता येतील?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com