माही, हे क्रिकेट आहे; युद्ध नव्हे! (शेखर गुप्ता)

शेखर गुप्ता
रविवार, 9 जून 2019

हार, जीत हा खेळाचा भाग 
भारत - पाकिस्तान यांच्यात 1971 मध्ये युद्ध सुरू असतानाही, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या शेष विश्व संघातून सुनील गावस्कर आणि झहीर अब्बास खांद्याला खांदा लावून खेळत होते. त्या काळात तर भारतीय हवाई दलाची विमाने कराचीवर नियमितपणे बॉंबहल्ले करत होती. 

महेंद्रसिंह धोनीने आपली लष्करी पलटण घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरू नये. खेळाडू मैदानातल्या कर्तबगारीने आपल्या देशाची मान उंचावतात, लष्कराचे प्रतिनिधी म्हणून खचितच नव्हे! 

"राजकारण तोडते आणि खेळ जोडतो' या जुन्या उक्तीबाबत आपण शंका घेऊ शकत नाही. भारताने यापूर्वी दोनदा जिंकलेल्या आयसीसी विश्वकरंडकाचा हंगाम सुरू असताना तर ती अधिक सार्थ ठरते. यात एक गोम आहे. खेळ एकजूट घडवतो, पण ती कट्टर समर्थकांचीच. भारतीय म्हणून जसे आपण आपल्या संघाच्या मागे उभे राहतो, तसेच अन्य त्यांच्या संघांची पाठराखण करतात. हाच मुद्दा आपल्याला महेंद्रसिंह धोनी याने भारतीय लष्कराच्या विशेषदलाच्या "बलिदान' कट्यारीचे चिन्ह यष्टिरक्षणासाठीच्या हातमोज्यांवर लावल्यामुळे उद्‌भवलेल्या वादाकडे घेऊन जातो. 
विश्वकरंडक स्पर्धेचे नियमन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यालाच आक्षेप घेतला. अन्य कोणत्याही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनेप्रमाणेच आयसीसीच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूने आपल्या शरीरावर अथवा गणवेशावर धार्मिक, राष्ट्रीय अथवा व्यापारी चिन्हे आणि बोधचिन्हे लावण्यावर मर्यादा आहेत. आयसीसी आणि संबंधित देशांच्या क्रीडा संघटनांनी मान्यता दिलेल्या पुरस्कर्त्यांची चिन्हे प्रदर्शित करण्याची मुभा खेळाडूंना असते. परवानगी असलेली राष्ट्रीय प्रतीकेही परिधान करता येतात. खास बनवून घेतलेल्या चिन्हांना मज्जाव असतो आणि लष्कराशी संबंधित चिन्हे तर कटाक्षाने दूर ठेवली जातात. हे खेळाचे मैदान आहे, रणमैदान नाही. 

धोनीला कट्यार चिन्हांकित हातमोजे वापरण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती आयसीसीला केल्याचे बीसीसीआयचे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) म्हणणे आहे. जनमतही धोनीच्या हातमोज्यांना बळ देते. सध्याच्या राष्ट्रवादाचा प्रभाव असलेल्या परिस्थितीत दुसरी बाजू मांडण्याचे धैर्य कोणता भारतीय दाखवेल? 

परंतु, कोणीतरी पुढे येऊन आयसीसीचा आक्षेप योग्य असल्याचे सांगितलेच पाहिजे. धोनीने हातमोज्यांवरून लष्करी चिन्ह काढून टाकायला हवे. अत्यंत स्पर्धात्मक खेळाच्या मैदानात या चिन्हाला स्थान नसावे. म्हणूनच आपल्यापैकी काही जणांनी, विशेषतः या खेळावर प्रेम करणाऱ्या आणि भारताच्या विजयाची आस असणाऱ्यांनी प्रवाहाविरोधात पोहण्याची हिम्मत दाखवली पाहिजे. त्यामुळे आपल्या क्रीडाविषयक राष्ट्रप्रेमावर प्रश्‍न उपस्थित झाले, तरी बेहत्तर. 

प्रथम "उन्मादी राष्ट्रभक्त' आणि "----- धोनी कीप द ग्लोव्ह्‌ज' असे वेडगळ हॅशटॅग सुरू करणाऱ्या कमांडो- विनोदी वृत्तवाहिन्यांमधील शंखफुंक्‍या मंडळींचे युक्तिवाद पाहू. 
पहिला युक्तिवाद ः आपण सशस्त्र दलांचा आदर केलाच पाहिजे. दुसरा युक्तिवाद ः भारताला रक्तबंबाळ करणाऱ्या पाकिस्तानाला जिथे शक्‍य असेल, तिथे धडा शिकवलाच पाहिजे. तिसरा युक्तिवाद ः कोणत्याही व्यक्तीचा निवड करण्याचा अधिकार नाकारता येत नाही. विशेष दलातील मानद लेफ्टनंट कर्नल असलेल्या आणि पात्रता सिद्ध करून कट्यार व पंखचिन्ह मिळवलेल्या धोनीबाबत हे अधिक खरे ठरते म्हणून रेजिमेंटचे मानचिन्ह वापरण्यास त्याला मनाई करू नये. तिसऱ्या युक्तिवादाला उत्तर देणे सोपे आहे. धोनीची रेजिमेंट भारतासाठी क्रिकेटच्या मैदानात उतरत नाही. ही तुकडी भारताच्या शत्रूंचा मुकाबला करताना बीसीसीआयचे अथवा हॉकी इंडियाचे अथवा इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचे चिन्ह परिधान करत नाही. या सर्व संघटना क्रीडाक्षेत्रात भारताचा अभिमान आणि गौरव वृद्धिंगत करतात. 
सशस्त्र दल आणि त्यांच्या बलिदानाचा आदर केलाच पाहिजे, हा युक्तिवाद पूर्णतः मान्यच. लष्कराचे "ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर' बनून नाही, तर खेळाचा गणवेश परिधान करून आणि जिंकण्यासाठी मैदानात प्रयत्नांची शर्थ करून क्रीडापटू आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करतात. 

"आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ म्हणजे जणू काही युद्धाची नक्कल असते,'' असे जॉर्ज ऑर्वेल यांनी 1945 मध्ये "द स्पोर्टिंग स्पिरिट' या भविष्यवेधी निबंधात म्हटले होते. आपल्या पुरुष आणि महिला खेळाडूंनी अनेकदा पाकिस्तानचा मुकाबला केला आहे, भूतकाळाच्या तुलनेत अलीकडच्या काही वर्षांत त्यांनी अधिक यशही मिळवले आहे. एकमेकांचा संपूर्ण पाडाव करण्याच्या कडव्या निर्धाराने ते झुंजतात, पण फक्त खेळातच. सामना सुरू असताना आणि त्यानंतरही दोन्ही संघांत मैत्रीपूर्ण आणि खेळीमेळीचेच वातावरण आढळते, ते एकमेकांची कुटुंबे आणि मुलांचा अगत्याने पाहुणचारही करतात. 

हार, जीत हा खेळाचा भाग 
भारत - पाकिस्तान यांच्यात 1971 मध्ये युद्ध सुरू असतानाही, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या शेष विश्व संघातून सुनील गावस्कर आणि झहीर अब्बास खांद्याला खांदा लावून खेळत होते. त्या काळात तर भारतीय हवाई दलाची विमाने कराचीवर नियमितपणे बॉंबहल्ले करत होती. 

इंग्लंडमध्ये 1999 मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत हे दोन्ही संघ पुन्हा समोरासमोर उभे ठाकले, त्या दिवशी (तेव्हा भारतात रात्र होती) कारगिलमध्ये निकराची लढाई सुरू होती. कोणत्याही बाजूने क्रिकेटच्या मैदानात "टायगर हिल' आणणे कुणालाही नकोच होते. कोणत्याही खेळातील एखाद्या सामन्यात एक बाजू जिंकणार आणि दुसरी बाजू हरणार. त्याचा अर्थ युद्धात तुमच्या सैन्यदलाचा पराभव झाला, असा होईल का? दोन्ही बाजू खेळाच्या गणवेशावर लष्करी चिन्हे लावून ओल्ड ट्रॅफर्डवर उतरल्यास काय होईल? गर्दीवर नियंत्रण ठेवताना ब्रिटिश पोलिसांच्या नाकी नऊ येईल. 

महायुद्धे आणि शीतयुद्धानंतर मानवी संस्कृतीने बरीच मोठी मजल गाठली आहे. क्रीडाक्षेत्रातील सततचा संपर्क जुन्या विखारी शत्रुत्वावर प्रभावी उपचार सिद्ध होत आहे. त्यामुळे क्रीडापटू, त्यांचे चाहते, कुटूंबे आणि मित्रांना एकमेकांसोबत अधिक जाणून घेणे, वेगवेगळ्या जनसमुदायात बंध निर्माण होणे शक्‍य झाले आहे. हा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात अथवा राजकीयदृष्ट्या फारसा योग्य नसल्याचेही मी जाणतो. 

एखाद्या व्यक्तीच्या सैन्यदलावरील विशेष निष्ठेचा आपण आदर करतो, संबंधित व्यक्ती मानद पद्धतीने सैन्यदलाची सेवा करत असल्यास ते आणखी प्रशंसनीय ठरते. पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी गडद किरमिजी रंगाच्या सैनिकी टोपीसह विशेष दलाच्या संपूर्ण गणवेशात समारंभाला उपस्थित राहिला होता. ही अत्यंत चांगली सांकेतिक कृती होती. सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती असलेल्या राष्ट्रपतींनी त्याला पद्म पुरस्कार प्रदान केला होता. 

धोनीला आपली लष्करी पलटण पिचवर घेऊन जाण्याची गरज नाही. यष्टिरक्षण करत असताना त्याच्यात पुरेपूर "किलर इन्स्टिंक्‍ट'' असते. क्रीज बाहेर गेलेल्या फलंदाजाला यष्टिचीत करताना प्रत्येक वेळी त्याला आपल्या पंजातील "कट्यार' प्रेरणा देत असेलच. तो काही उगीचच जगातील सर्वांत खतरनाक "स्टम्पर' झालेला नाही! 

शेखर गुप्तांचे ट्विटर हँडल - https://twitter.com/ShekharGupta
फेसबुक पेज - https://www.facebook.com/shekharguptaofficial/


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Gupta writes about Mahendra Singh Dhoni gloves controversy