डिजिटल उतरंड

Digital-slope
Digital-slope

संवाद ही माणसाची मूलभूत गरज लक्षात घेऊन या क्षेत्रात प्रयोग होत राहिले. त्यापैकीच समाजमाध्यमांनी व्यक्त होण्याचं किफायतशीर आणि स्वतंत्र अवकाश दिलं. माध्यमक्षेत्रातली ही क्रांतीच. परिणामी, आपली व्यक्त होण्याची पद्धत आणि सवयी बदलत गेल्या; पण हे सर्व फक्त इथंच थांबतं का? वरकरणी व्यक्त होण्याचं माध्यम असणारे हे प्लॅटफॉर्म मुळात काय साध्य करत आहेत याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. 

अल्गोरिदम आणि आपल्या सवयी 
कोणतंही प्रॉडक्ट वापरताना त्याच्या वेगवेगळ्या सुविधांचा (फीचर्स) आपण लाभ घेत असतो. अगदी तसंच समाजमाध्यमांच्या बाबतीतही घडतं. फीचर वापरताना संवादाच्या पद्धतींना दिशा देण्याचं काम या कंपन्यांकडून करण्यात आलं. उदाहरणार्थ : व्हाट्सअॅप स्टेटस. हे फीचर आल्यामुळे अगदी खेडेगावातल्या बायकाही आवर्जून नटून फोटो काढून ते शेअर करतात. फक्त स्टेटस अपडेट करण्यासाठी म्हणून कित्येक जण फोटो काढतात. पाहता पाहता डीपी, स्टेटस ही सवयच होऊन गेली आहे. हे खूप छोटं, दैनंदिन जगण्यातलं उदाहरण. तंत्रज्ञानाचा हा आविष्कार आपल्या व्यक्त होण्याच्या सवयी ठरवून बसला.

व्यक्त होण्यासाठी, मित्र जोडण्यासाठी म्हणून आलेलं फेसबुक-ग्रुप हे फीचर लाँच केल्यावर बदललं. आपल्या प्रोफाइलमधून सरसकट मिळणारा ‘रीच’ काही प्रमाणात मर्यादित करण्यात आला. 

अल्गोरिदमनं ग्रुपला प्राधान्य दिल्यानं लोकांचा कल ग्रुप-पद्धतीत व्यक्त होण्याकडे वळला. परिणामी, व्यक्त होणं ठराविक लोकांमध्ये मर्यादित झालं. कुणाजवळ आणि किती व्यक्त व्हावं हेही तंत्रज्ञानच नकळत नियंत्रित करू शकतंय. या फीचरनंतर एका विचाराच्या किंवा एका विषयाच्या लोकांना एकत्र करणारे फेसबुक-ग्रुप निर्माण झाले. फेसबुकनं काही कम्युनिटी आणि व्यावसायिक गटांना प्रोत्साहनही दिलं. 

त्यासोबतच फेसबुकनं ‘मार्केट प्लेस’ हे फीचरही सुरू केलं. ग्रुपमधून जोडल्या जाणाऱ्या व्यावसायिकांना थेट विक्रीसेवा देणारं हे फीचर. घरगुती व्यावसायिकांना आपल्या वस्तू थेट ग्राहकाला विकता येण्यासाठी यातून प्लॅटफॉर्म मिळतो ही जमेची बाजू; पण त्यातूनही विशिष्ट गटांची आणि लोकांची वाढती मक्तेदारी समोर येतेय. शिवाय स्मार्टफोन, इंटरनेट वापरू न शकणाऱ्या अनेकांना यापासून वंचित राहावं लागतंय हेही नाकारून चालणार नाही. 

आपण ‘डेटासेट’ 
गेल्या काही वर्षांत वारंवार ऐकण्यात येणार शब्द म्हणजे ‘डेटा’. डेटा म्हणजे आपला फोननंबर किंवा ई-मेल आयडी इतकाच मर्यादित अर्थ आता नाहीये. म्हणूनच ‘डेटा’ या शब्दाची व्याप्ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. 

कोणत्याही प्लॅटफॉर्मचं ॲप डाऊनलोड केल्याक्षणापासून तुमचा ‘डेटासेट’ तयार व्हायला सुरुवात होते. तुम्ही साधं सर्च केलं तरी ती माहिती कुणासाठी तरी ‘डेटा’ म्हणून उपयोगाची असते. अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपण प्रोफाइल किंवा अकाउंट तयार करतो. काही लोक म्हणतात की, त्यांचं फक्त प्रोफाइल आहे आणि ते काही माहिती शेअर करत नाहीत वगैरे. गंमत इथंच आहे. तुमचं अकाउंट ज्या क्षणी तयार होतं त्या क्षणी पहिला डेटा निर्माण होतो. 

उदाहरणार्थ : तुमचा ई-मेल आयडी. त्याला जोडून असलेली तुमची इतर सर्व माहिती आपोआपच अप्रत्यक्षपणे मिळते. याशिवाय मिळतं ते तुमचं लोकेशन. मग तुमचा नेहमीचा प्रवास ‘मॅप’ होतो. त्यातून तुमचं फिक्स डेस्टिनेशन सहज समजू शकतं. तुम्ही न सांगताही तुम्ही कोणत्या पद्धतीनं प्रवास करता हेही समजू शकतं. तुम्हाला त्या प्रवासाला लागणारा वेळ समजतो. प्रवासादरम्यान तुम्ही गाणी ऐकता की फेसबुक बघता हेही समजतं. तुम्ही गाव, नोकरीचं गाव अपडेट करता तेव्हा ‘ही व्यक्ती मूळ गावापासून लांब राहते’ असा ‘डेटा’ आपण दिलेल्या माहितीतून तयार होतो. मग ‘गावापासून लांब राहणाऱ्या’ व्यक्तीला तिचं वय, जेंडर, रिलेशनशिप स्टेटस यांनुसार ग्राहक म्हणून वागवलं जातं. 

डेटा आणि व्यवहार 
डिजिटल-माध्यमांवर व्यक्तीच्या (User) प्रोफाइलनुसार तिला जाहिराती किंवा उत्पादनं किंवा त्यांची माहिती असलेली पेजेस किंवा ग्रुप्स दाखवले जातात. अशाप्रकारे थेट ‘डेटा’ आणि मिळालेल्या डेटाचं आकलन (Interpretation) करून Collective Intelligence शेअर करण्याचा व्यवसाय हे प्लॅटफॉर्म करतात. या Collective Intelligence वर जागतिक बाजारपेठेची सर्व गणितं आखली जातात. अशा प्रकारे या साखळीच्या मुळाशी असलेले आपण ‘ग्राहक’ मात्र यापासून अनभिज्ञ आहोत. 

डिजिटल उतरंड 
आपलं आयुष्य डिजिटल होताना डेटा सगळीकडेच गोळा होतोय; पण Interactive Data, Emotion Mapping हे अधिक धोकादायक. महत्त्वाचं हे, की समाजमाध्यमं हा व्यवसाय आहे. तो टिकवायचाय, त्यातून नफा कमवायचाय. त्यामुळे या माहितीचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी होणारच. हा वापर होताना त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार? उदाहरणार्थ : मी रोज कॅबनं जाणारी व्यक्ती असेन तर मला विशिष्ट सेवाच वापरायला भाग पाडता येऊ शकतं. त्या क्षेत्रातल्या इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांपासून मला लांब ठेवलं जाऊ शकतं. अशा प्रकारे भांडवलशाहीच्या डिजिटल स्वरूपाला आपण सामोरे जातोय. त्यामुळे वरकरणी ही स्वतंत्र माध्यमं वाटत असली तरी व्यापक दृष्टीनं ही सामाजिक आणि व्यावहारिक उतरंड वाढवणारी नवीन व्यवस्थाच आहे!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com