
पुस्तक परिचय
प्रशासकीय अधिकाऱ्याचं पुस्तक म्हणजे अधिकारी होण्याचं बाळकडूच असावं, हा सरधोपट सिद्धांत मोडीत काढत मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्या ``कर हर मैदान फतेह'' या पुस्तकाचं स्वागत करायला हवं. हे पुस्तक फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी नाही
प्रशासकीय अधिकाऱ्याचं पुस्तक म्हणजे अधिकारी होण्याचं बाळकडूच असावं, हा सरधोपट सिद्धांत मोडीत काढत मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्या ``कर हर मैदान फतेह'' या पुस्तकाचं स्वागत करायला हवं. हे पुस्तक फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी नाही. समस्त तरुण वर्ग वाचक म्हणून लेखकानं डोळ्यासमोर ठेवलाय. त्यामुळं अभ्यास कसा करावा, अशा विषयांऐवजी जीवनकौशल्यांवर भर देत माणूस घडविण्याची प्रक्रिया लेखकाने पुस्तकात वर्णन केली आहे. हे मांडताना पाटील यांनी व्यक्तिगत आयुष्य ते प्रशासकीय अधिकाऱ्याची कर्तव्य पूर्ण करतांना त्यांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांचा समावेश पुस्तकात केलाय.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात पोलीस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीत मिळणाऱ्या सर्व प्रशिक्षणांचा सविस्तर आढावा आहे. या अनुभवांची रंजक मांडणी वाचकाला खिळवून ठेवते. शिवाय व्यक्ती म्हणून जडणघडण होताना आत्मभान ते समाजभान जागरूक ठेवण्याचे शिक्षण यातून मिळते. कोणतीही नोकरी असो किंवा व्यवसाय, बदलतं तंत्रज्ञान स्वीकारून अद्ययावत राहणं ही काळाची गरज आहे. हे सर्व करत व्यक्तिगत विकासा इतकीच महत्त्वाची असते आपल्या टीमची जडणघडण. पोलीस अधिकाऱ्यांनाही बदलत्या काळात अशा आव्हानांचा सामना करावा लागतो. अशावेळी त्या विभागात सर्वोच्च पदावर असतांना लेखकानं आपलं कर्तव्य पार पाडतानाच आपल्या सहकाऱ्यांचं पालकत्व कसं स्वीकारलं, हे शेवटच्या दोन भागात वाचायला मिळते. त्यातही पुस्तकातला उल्लेखनीय किस्सा म्हणजे ''कोरोना से डरोना''. कोरोनाच्या साथीनं जगाला वेठीस धरले. अशावेळी सगळ्यात आधी आणि सर्वात जास्त काळ रस्त्यांवर कार्यरत असणाऱ्या आपल्या पोलीस दलाची शारीरिक आणि मानसिक काळजी कशी घेतली याबद्दलचे वर्णन वाचनीय आणि प्रेरणादायी आहे.
सप्तरंगमधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
पोलिसांच्या एकूणच कामकाजात नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून केलेल्या नवनवीन प्रयोगांची माहिती पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. यात स्मार्ट पोलिसिंगला तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक रिस्पॉन्सिव्ह आणि अकाऊंटेबल बनविण्यासाठी केलेल्या उपक्रमाची माहिती मिळते. यात सिक्स सिग्मा, कायझेन अशा प्रणालीचा वापर, झिरो पेन्डन्सी, निर्भया पथक अशा उपक्रमांचा समावेश आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुस्तकाचा शेवट अर्थातच ज्या उद्देशाने पुस्तक लिहिलंय त्यावर होतो - आयुष्याची जडणघडण! यात लेखकाने वर्णन केलेला प्रत्येक प्रसंग अंगावर रोमांच उभे करतो. आयुष्य खडतर असतंच पण प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरं जाणं महत्वाचं असं अधोरेखित करणारे हे प्रसंग पुस्तक वाचण्याचा अनुभव समृद्ध करतात.
'विश्वास, आपण लढवय्ये आहोत....'' हाच ''विश्वास'' विश्वास नांगरे पाटील यांच्या पुस्तकाच्या प्रत्येक पानांतून मिळतो. संपूर्ण पुस्तकांत वेगवेगळ्या संतांची, लेखकांची प्रेरणादायी वचने गुंफली आहेत. प्रत्येकाने आपल्या ठेवणीत ठेवावे आणि नक्की वाचावे असे जगण्याचा धडा देणारे हे पुस्तक आहे.
पुस्तकात काय आहे?
- प्रशासकीय कारकिर्दीतील वेगवेगळ्या प्रशिक्षणांचा अनुभव
- लबास्ना, इनडोअर - आउटडोअर ट्रेनिंग, एनपीए ट्रेनिंग इथले अनुभव
- प्रशिक्षणातून जीवनशैली, जीवन व्यवस्थापन आणि जीवन कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रवास
- जीवनकौशल्ये अमलात आणताना चाकण दंगल, डॉल्बीशिवाय गणेशोत्सव अशा प्रसंगांना अधिकारी म्हणून हाताळण्याचे अनुभव
- कोरोनाशी पोलीस दलाचा मुकाबला
- पोलीस विभागाचा अद्ययावत चेहरा - आव्हाने आणि प्रयोग
Edited By - Prashant Patil