सुशांतसिंह प्रकरणाच्या आड नेमके काय शिजतेय?

रवि आमले
Wednesday, 12 August 2020

राजकीय स्वार्थासाठी अशा प्रकरणांचा कसा वापर केला जातो यावर टाकलेला हा प्रकाशझोत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. थेट मुख्यमंत्र्यांनाच अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याची हत्या झाल्याचे आरोप केले जात आहेत. मग सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केली आणि त्यास हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझम कारणीभूत होते या आरोपाचे काय? की त्यामागे काही वेगळेच कारस्थान होते?… हिंदी चित्रपटसृष्टीतील सेक्युलर, लिबरल विचारधारेला चेचण्याचे?…. 

राजकीय स्वार्थासाठी अशा प्रकरणांचा कसा वापर केला जातो यावर टाकलेला हा प्रकाशझोत.

 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले असून, आता त्यांना राजकीय रंगही प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला या घटनेवरून कोंडीत पकडता आले तर पकडावे असा महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा पवित्रा दिसतो, तर तिकडे बिहारमध्ये सर्वच पक्षांच्या नजरेसमोर आगामी निवडणुका आणि सुशांतसिंहच्या जातीची मते आहेत. काही जणांच्या मते हे सारे टाळूवरचे लोणी खाणे झाले. ही अर्थातच नेहमीचीच टीका. तेव्हा त्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही. मुळात विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडू पाहात असतील, तर ते निरोगी लोकशाहीस लाभदायकच. त्यास ‘राजकारण' म्हणून हिणविण्याचे काहीही कारण नाही. उलट अशा वेळी कोणत्याही सुजाण नागरिकाचे हेच कर्तव्य ठरते, की ते राजकारण नेमके काय आहे, त्यामागे कोणती भूमिका, विचार, हेतू आणि हितसंबंध कार्यरत आहेत हे समजून घेतले पाहिजे. त्याकरीता सुशांतसिंह याच्या मृत्यूनंतरच्या चर्चांकडे डोळसपणे - म्हणजे वृत्तवाहिन्यांनी दिलेले किंवा व्हाट्सअॅपी संदेशांतून मिळालेले आयते चष्मे बाजूला ठेवून - पाहावयास हवे. 

सलग आठव्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अमेरिका, ब्राझीलपेक्षाही अधिक

सुशांत गेल्यानंतर लगेचच माध्यमांतून, त्यातही खास करून वृत्तवाहिन्यांवरून चर्चा सुरू झाली होती ती त्याच्या नैराश्याची आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाही आणि वशिलेबाजीची. तेथपासून सुरू झालेला तो कारणांचा प्रवास आता सुशांतची आत्महत्या नसून हत्याच आहे या आरोपाच्या वळणावर येऊन थांबलेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही फोकनाड नट-नट्या आणि भाजपचे काही नेते गेल्या काही दिवसांपासून हे असेच काहीबाही बोलत होते. त्यात आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यन् स्वामी यांनीही सूर मिसळला आहे. सुशांतची हत्याच असल्याचे आपल्याला वाटत असल्याचे ते म्हणाले. ट्विटरवरून काही कारणांची यादीही त्यांनी त्या समर्थनार्थ सादर केली. त्यावरून कोणासही असे वाटावे की झाले, सगळे पुरावे तर आता स्वामीजींनी दिलेच आहेत. तेव्हा आता पोलिसांचे काम एकच, की गुन्हेगाराला हातकड्या घालणे. भाजप आणि हिंदुत्ववाद्यांमध्ये या स्वामीजींचा चाहता असलेला एक मोठा वर्ग असून, त्याने आता समाजमाध्यमातून स्वामीजींचा हा षड्‌यंत्र सिद्धांत उचलून धरलेला आहे. त्यांच्या हे लक्षातच येत नाही, की मुळात या स्वामीजींना नेहमीच असे काहीबाही वाटत असते. उदाहरणार्थ, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले की २०१७ मध्ये एका रुपयाला एक अमेरिकी डॉलर मिळेल असेही त्यांना वाटत होते. तेव्हा त्यांच्या वाटण्याला तसा फारसा काही अर्थ नसतो. अर्थात याचा अर्थ असा नव्हे, की सुशांतसिंह प्रकरणातील हा कोन दुर्लक्षित केला जावा. उलट आता तर या प्रकरणात कोणतीही शंका उरू नये, याकरीता मुंबई पोलिसांनी सगळ्याच बाजूंनी आणि अधिक पारदर्शकपणे त्याचा तपास करावा. सुशांतच्या तथाकथित चाहत्यांना आणि भाजपच्या नेत्यांचाही तोच आग्रह आहे. मात्र यातून एक वेगळाच गुंता निर्माण होत आहे, हे अद्याप या मंडळींच्या लक्षात आल्याचे दिसत नाही.

हा गुंता आहे तो कारणांचा. सुशांतने आत्महत्या केली व ती नैराश्यातून केली असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे होते. हे नैराश्य कशामुळे आले, तर त्याला ‘चांगल्या' चित्रपटांत काम मिळत नव्हते त्यामुळे. त्याच्या चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, सुशांत हा एक थोर अभिनेता होता. बिहारमधील छोट्या शहरातून मुंबईत येऊन आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्याने दूरचित्रवाणी मालिकांचा पडदा गाजविला. तेथून पुढे तो चित्रपटसृष्टीत गेला. तेथेही त्याने मोठीच चमक दाखविली. परंतु या हिंदी चित्रपटसृष्टीला गुणवत्तेची कदर नाही. तेथे ‘नेपोटिझम’ फार. सुशांत हा ‘बाहेरचा’. शिवाय त्याने प्रस्थापितांचे पाय चाटणे नाकारले. परिणामी त्याला भूमिका दिल्या जात नव्हत्या. यातून त्यास निराशा आली. ही अशी चर्चा सुरू झाल्यानंतर संपूर्ण देशात हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘नेपोटिझम’ विरोधात एकच रान पेटले वा पेटविण्यात आले. मुंबई पोलिसांनीही त्या कोनातून तपास सुरू केला. हे सुरू असतानाच सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या एका माजी प्रेयसीविरोधात तक्रार केली, की तिने त्याची आर्थिक लुबाडणूक केली, त्यास आत्महत्येस प्रवृत्त केले. आता हे खरे असेल, तर मग त्या नैराश्याच्या आणि हत्येच्या आरोपात काहीच दम राहत नाही. आणि त्याची हत्या झाली वा काम मिळत नसल्याने आलेल्या निराशेतून त्याने आत्महत्या केली हे खरे असेल, तर त्याच्या प्रेयसीवरील आरोपांतील हवा निघून जाते. अर्थात हे सारे तर्कच असून, या प्रकरणातील सत्य आणखी काही वेगळेही असू शकते. येथे मुद्दा आहे तो या आरोपांमागील आणि त्यातही खास करून ‘नैराश्येतून आत्महत्या’ व त्यासंबंधीच्या चर्चेमागील हेतूंचा, त्यातील ‘पॉलिटिक्स’चा. हे ‘पॉलिटिक्स’ आहे हिंदी चित्रपटसृष्टीवरील वर्चस्वाचे. तेथील ‘नेपोटिझम’चा मुद्दा गाजविला जात आहे तो त्यातूनच. आणि म्हणूनच हे ‘नेपोटिझम' म्हणजे नेमके काय हे नीट समजून घेतले पाहिजे.

नेपोटिझमचा ऑक्सफर्ड शब्दकोशातील अर्थ आहे - तुमच्या सत्तापदाच्या योगे तुमच्या कुटुंबाला अनुचित फायदा, खासकरून नोकरीची संधी देणे. मराठीत याला आपण वशिलेबाजी म्हणतो. हिंदी चित्रपटसृष्टीच्या संदर्भात नेपोटिझमच्या अर्थाला गटबाजी, घराणेशाही असेही काही कंगोरे आहेत. हे सारे किती आणि कसे खरे आहे हे सांगणाऱ्या अनेक प्रतिक्रिया, अनेक ट्विट्स गेल्या काही महिन्यांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यात कंगना रनौतसारखी वाचाळवनिता आघाडीवर आहेच. पण त्याशिवाय शेखर कपूर, आर. बल्की, ए. आर. रहमान यांच्यासारख्या मातब्बरांचाही समावेश आहे. आणि ते कटू पण वास्तवच आहे. पण हेच वास्तव तर अन्य क्षेत्रांतही आहे. साध्या आपल्या एपीएमसी बाजारातही हेच चालते अशा आमच्या शेतकरी-व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. किंबहुना तो भारतीय समाजव्यवस्थेचा अंगभूत घटक आहे. अर्थात सार्वत्रिक आहे म्हणून ते समर्थनीय ठरू शकत नाही. तरीही प्रश्न येतोच, की चित्रपटक्षेत्राला आताच असे धारेवर धरण्याचे कारण काय? आणि मुळात ज्याला आपण मनोरंजन क्षेत्रातील वास्तव म्हणतो ते खरोखरच दिसते तसेच आहे का?

खऱ्या भारताचे दर्शन! मंदिराच्या रक्षणासाठी मुस्लिम तरुणांनी तयार केली साखळी

चित्रपटसृष्टीला उद्योग म्हणून गणले जात असले, १९९८ साली त्यास उद्योगास दर्जा देण्यात आला असला, तरी अजूनही रुढार्थाने तो उद्योग नाही. त्याचे एकंदर स्वरूप हे जुगारासारखेच आहे. अशा परिस्थितीत कोणी तरी आपल्याकडचे काळे-गोरे पैसे लावून चित्रपट काढतो. तेव्हा तो त्याच्या आडाख्यांनुसार, ज्यांच्यामुळे त्या बारा हजाराचे लाख होतील अशा मंडळींनाच त्यात घेतो. स्टारपुत्र वा कन्या यांना प्राधान्याने संधी मिळते ती त्यामुळेच. एकतर त्यांच्या मागे त्यांच्या पिता वा मात्याच्या ग्लॅमरची प्रभा असते. सामान्यांत त्यांच्याबद्दलची उत्सुकता असते. एखाद्या उत्पादनामागे ब्रँडनेम असेल तर बाजारात ते फायद्याचे ठरते. एकतर हा नियम त्यांच्याबाबत लावला जातो किंवा मग स्टारपुत्रांच्या पालकांकडचा पैसा बोलतो. शिवाय अन्य व्यवसाय-धंद्याप्रमाणे येथे ‘कॉन्टॅक्ट’ हा भागही महत्त्वाचा ठरतोच. अशा परिस्थितीत कोणाही नवख्याला तेथे प्रवेश मिळविणे कठीणच असते. हे सारे प्रत्यक्ष अमिताभ बच्चन यांनाही सोसावे लागले होते. त्यांच्या पुत्राचा प्रवेश मात्र त्यांच्यामुळे सुकर झाला. हे असे असले, तरी पुढे जाऊन या स्टारपुत्रांना स्वतःला सिद्ध करून दाखवावेच लागते. तेथे मग कोणी हा महानायकाचा सपूत आहे वा स्वप्नसुंदरीची सुकन्या आहे म्हणून गय करीत नाही. हीच गत गटबाजीची. ज्यांच्याबरोबर आपले जमते वा जुळते त्यांनाच कोणीही काम देणार. अशावेळी अनेकदा लायकीचा प्रश्न गौण ठरतो. तो मानवी स्वभाव झाला. या सगळ्याला कोणी नेपोटिझम म्हणत असेल, तर त्याला या खेळाचे नियमच समजले नाहीत असे म्हणावे लागणार. चित्रपटसृष्टी म्हणजे काही सरकारी नोकरी नव्हे. तो एक खासगी धंदा आहे. तेथे खासगी धंद्यांचेच नियम लागणार. या धंद्यात जसे बडे बॅनर आहेत, तसेच आपापल्या कुवतीनुसार चित्रपट काढणारेही आहेत. येथे जशी स्टारपुत्रांची चलती आहे, तशीच ‘बाहेरून’ आलेल्यांनीही येथे नाव कमाविलेले आहे. किंबहुना आज ‘आतले’ असणारे अनेक जण पूर्वी ‘बाहेर’चेच होते. खुद्द सुशांतसिंह राजपूत यालाही काही बड्या बॅनरचे चित्रपट मिळालेले आहेत. करण जोहर - ज्याला कंगना रनौतसारखी वाचाळवनिता 'नेपोटिझमचा ध्वजवाहक’ म्हणते - त्याच्या धर्मा प्रॉडक्शनने गतसाली सुशांतला त्यांच्या ‘ड्राईव्ह’ या चित्रपटात भूमिका दिली होती. यावर वाचाळवनिता कंगनाने पत्रकार अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत तोडलेले तारे तर अफलातून होते. तिचे म्हणणे असे, की सुशांतला फ्लॉप स्टार बनविण्यासाठी करण जोहरने मुद्दामच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला नाही. हे तर्कट तर खासच ‘एंटायर लॉजिक’च्या अभ्यासक्रमात शिकवावे असे आहे. खरे तर सुशांतवर काहींची खपा मर्जी असेलही. त्यांनी त्याला काम नाकारले असेलही. पण जेव्हा भांडवलशाही, बाजारप्रणीत अर्थव्यवस्था, कंत्राटीकरण, खासगीकरण यांचे गुणगाण गाणारी मंडळीच यावर अन्याय वगैरे बोंबा ठोकू लागतात, तेव्हा ते सारेच हास्यास्पद ठरते. किंबहुना त्यांच्या त्या समाजमाध्यमी आरडाओरडीस वेगळाच दुर्गंध येतो.

हिंदी चित्रपटसृष्टी ही काही धुतल्या तांदळासारखी नाही. काळा पैसा, अधोविश्वाशी संबंध, शोषण असे अनेक दुर्गुण तेथे आहेत, हे मान्य करावेच लागेल. मात्र ही सृष्टी येवढ्यापुरतीच मर्यादीत नाही. समाजाचा एक आरसा म्हणून तिच्याकडे जसे पाहिले जाते, तसेच सामाजिक दृष्टिकोनांना वळण लावण्याच्या महत्त्वपूर्ण कामातही तिचे मोठे योगदान असते. अगदी तद्दन मसालापटांतूनही येथील चित्रपटांनी वैचारिक भूमिका मांडलेल्या आहेत. त्या प्रायः छुप्या असतात आणि म्हणूनच परिणामकारक ठरतात. चित्रपटांचा हा प्रभाव जनसमान्यांना समजत नसला, तरी राजकीय आणि सामाजिक शक्तींना त्याची ताकद चांगलीच माहित आहे. चित्रपटांना सेन्सॉर करण्याचे काम सत्ताधारी करीत असतात ते काही उगाच नव्हे. पण केवळ सेन्सॉर करण्यातच सत्ताधाऱ्यांना रस नसतो. ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांना त्यावर नियंत्रण हवे असते. हिंदी चित्रपटसृष्टीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी केलेले आहेत. ते फारस यशस्वी ठरले नाहीत, याचे कारण या सृष्टीची रचना. ती प्रचंड विस्कळित आहे. 

दुसरी गोष्ट म्हणजे कलेचे कोणतेही क्षेत्र हे प्रामुख्याने जातीयवाद, धार्मिकता, अतिरेकी राष्ट्रवाद यांपासून मुक्त असते, असावे. हिंदी चित्रपट हे फालतू असतील, मसालापट असतील, अगदी परंपरावादी, पुरुषसत्ताकवादी असतील, परंतु त्यांनी सातत्याने एक वैशिष्ट्य जपलेले आहे. त्यांनी नेहमीच अतिरेकी धर्मवादाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. अनेकदा ते उदारमतवादी राहिलेले आहेत. हा उद्योगही धर्म वा जात या पलीकडे पाहणारा आहे. आणि हेच नेमके येथील अतिरेकी विचारधारांना - मग त्या कोणत्याही जातीच्या असोत वा धर्माच्या - सहन होणारे नाही. आज चित्रपटांतील वशिलेबाजी हा जणू राष्ट्राच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने मांडला जात आहे तो त्यामुळेच. वशिलेबाजीच्या नावाखाली ज्या व्यक्तींवर चिखलफेक केली जात आहे त्या व्यक्ती आणि ही चिखलफेक करणारी मंडळी हे सारे पाहिले, तर हे नीटच स्पष्ट होते. अतिरेकी धर्मवादाच्या विरोधात नेहमीच भूमिका घेणारी जावेद अख्तर वा महेश भट यांसारखी ज्येष्ठ मंडळी, ‘खान-दान’ म्हणून हिणवले जाणारे काही मुस्लिम नट, ‘माय नेम इज खान’सारखा चित्रपट काढणारे लोक हेच जेव्हा प्रामुख्याने टिकेचे लक्ष्य केले जातात आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या अग्रस्थानी जेव्हा थोर अभिनेत्री, पद्मश्री कंगना रनौत वा पायल रोहतगी वा थोर चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासारखे लोक असतात, तेव्हा हा वाद केवळ वशिलेबाजीचा नसतो, सुशांतसिंह याच्या मृत्यूच्या कारणांविषयीचा नसतो. किंबहुना त्यात यांना काडीमात्र रस नसतो. तो वाद हिंदी चित्रपटसृष्टीतील उदारमतवादी, धर्मनिरपेक्षतावादी भूमिकांना, माणसांना चेचण्याचा, दाबण्याचा असतो. भारतीय समाजमानसावर खोल परिणाम करणारी, प्रोपगंडाची प्रचंड ताकद असलेली चित्रपटकला आपल्या टाचेखाली ठेवण्याचे हे कारस्थान असते. सुशांतसिंहचा मृत्यू हे तर त्यासाठी या मंडळींना गावलेले आयते निमित्त.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiushan singh rajput case ravi aamle