राजा कालस्य कारणम्!

20२४ मध्ये लोकशाहीच्या उत्सवाने संपूर्ण भारत रंगून गेला. खरे तर हा उत्सव फक्त उत्सवमूर्ती उमेदवार आणि कार्यकर्ते यांचाच होता, असे वाटले होते.
shiv rajyabhishek 2024 after lok sabha election result 2024
shiv rajyabhishek 2024 after lok sabha election result 2024SAkal

नुकताच लोकशाहीचा उत्सव पार पडला. देशात नव्याने राज्यकारभार सुरू होत आहे. आता नवीन राजशकट हाकणाऱ्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे आजच्या काळातील महत्त्व अभ्यासायलाच हवे. नुकताच महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा झाला. राजांचे स्वप्न पूर्ण केले जावे, असे ज्यांना वाटते त्या सर्वांनी ‘शिवराज्याभिषेक दिन’ त्यांना समजून साजरा करणे आवश्यक आहे.

- प्रा. प्रशांत शिरुडे

20२४ मध्ये लोकशाहीच्या उत्सवाने संपूर्ण भारत रंगून गेला. खरे तर हा उत्सव फक्त उत्सवमूर्ती उमेदवार आणि कार्यकर्ते यांचाच होता, असे वाटले होते. कारण इतर जनता उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस, राजकारणातील हेवे-दावे, अस्मानी संकटे यांच्यासोबत निरंतर संघर्ष करीत राहिली.

उच्च मध्यमवर्ग, श्रीमंत पर्यटनाच्या धुंदीत मश्गुल होता. या सगळ्यात हा उत्सव ४ जूनला संपला. हा सगळा सोहळा पाहता राजा आणि प्रजा यांच्यातील अतूट बंध, जिव्हाळा, प्रजेबाबतची कर्तव्ये यांचा मागमूसही कुठे दिसला नाही.

उलट स्वार्थ, चिखलफेक, कृतघ्नपणा, असभ्य भाषा, घोटाळे, भ्रष्टाचार यांनी भरलेली भाषणे, सभा, रोड शो, बाईक रॅली, पदयात्रा असा हा सोहळा रंगला. म्हणूनच या सर्व भयावह परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘राजा कालस्य कारणम्’ अर्थात राजाच निःसंशयपणे काळावर प्रभाव पाडत असतो, हा श्लोक आठवतो.

ईश्वर सर्व जनांचा गुरू, सकलांचे कल्याणा कल्याणम् इंदू नृपती कल्पिला आहे. तो सगुण असला तरी बहुतांचे कल्याण, अवगुणी जाहल्यावरी बहुतांचे अकल्याण म्हणूनच ज्या राजांचा निःसंशयपणे आजही काळावर प्रभाव पडत राहिला आहे त्यांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी झाला.

आज त्याला ३५० वर्षे पूर्ण झाली. आता नवीन राजशकट हाकणाऱ्यांनी पुनःश्च एकदा शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे आजच्या काळातील महत्त्व अभ्यासायलाच हवे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक भारतभूमीत राहणाऱ्या, स्वतःला खऱ्या अर्थाने हिंदवी म्हणवणाऱ्या सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरणास्रोतच आहे.

शिवरायांनी ज्यासाठी अठरापगड जाती-जमातीच्या समाजबांधवांना स्वराज्याची आणि स्वाभिमानाची हाक दिली, परकियांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्ततेचे आवाहन केले ते स्वराज्य आता निर्माण झाले होते.

रयतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करतील, असे राजे निर्माण झाले होते. आता त्यांना एका प्रस्थापित राज्यव्यवस्थेची गरज होती. रयतेला सर्वमान्य राजे हवे होते म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतला. राज्यव्यवस्थेसाठी एका निश्चित अधिष्ठानाची आवश्यकता होती. त्यातून सर्वमान्य असे रयतेचे राज्य निर्माण होणार होते.

जुलूम, अन्याय, अत्याचार व गुलामगिरीची राजवट संपवणारे, लोककल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण करणारे, स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करणारे राजे या राज्याभिषेकाने जनतेला मिळाले. महाराजांनी दिलेले सर्वात मोठे देणे म्हणजे आत्मसन्मान, स्वाभिमान.

ती एक भावना जी शिवपूर्व कालखंडात मराठी माणसांमध्ये सुमारे शंभर वर्षांपासून संपली होती. शिवराज्याभिषेकाचे आणखी एक कारण म्हणजे मुघल, सुलतान, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी व इतर स्थानिक सत्ताधीश महाराजांना राजा मानत नव्हते. रयतेत महाराजांबद्दल प्रचंड आत्मियता, प्रेम, जिव्हाळा, आदर होताच; पण प्रशासकीय कामे करताना मुघल किंवा सुलतानांचेच शिक्के चालत. त्यामुळे रयतेची द्विधा मनःस्थिती होई.

महाराज वंशपरंपरागत राजे नव्हते. त्यांनी छत्रपती होण्यासाठी कोणताही विधी केलेला नव्हता. राज्य असूनही राजेपण नव्हते. त्यामुळे राजकीय स्थैर्य येत नव्हते. लोकांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी व प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी त्यांचे अनभिषिक्त सम्राट होणे त्यावेळच्या परिस्थितीसाठी अत्यंत आवश्यक होते.

हिंदवी स्वराज्याची नवी राजधानी म्हणून शिवरायांनी रायगड किल्ल्याची निवड केली होती. राज्याभिषेकाची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती. ५ जून १६७४ रोजी संध्याकाळी राज्याभिषेकाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. तो सोहळा मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. खरे तर राजे जनतेच्या हृदयसिंहासनावर आधीच विराजमान झाले होते.

आता लौकिकार्थाने ते सिंहासनावर बसणार होते. काशीहून खास राज्याभिषेकासाठी आलेले पंडित गागाभट्ट यांच्या सूचनेनुसार राजमाता जिजाऊंना वंदन करून महाराज सिंहासनाकडे मार्गक्रमण करीत असताना, प्रत्येक पाऊल टाकताना त्यांच्या भावविश्वात सुख-दुःखाच्या आठवणींचा कल्लोळ माजला होता.

हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांची आठवण महाराजांना होत होती. राजांचा राज्याभिषेक त्या समस्त वीरांच्या समर्पणाचा आणि त्यागाचा होता. महाराजांच्या एकूण जीवन प्रवासाचा अभ्यास केला तर आपल्या सहजच लक्षात येते.

संकटेच आपल्याला शक्ती, साहस, ताकद, ऊर्जा, जिद्द देतात, तुमची उंची वाढवतात आणि तुमच्या सामर्थ्यात भर टाकतात. प्रत्येकाला हिंदवी स्वराज्य आपले वाटत होते. जणू प्रत्येक जण शिवरायच झाला होता. राज्याभिषेक शिवरायांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केला नव्हता, तर स्वराज्य अधिक भक्कम व्हावे म्हणून केला होता.

महाराज सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर रायगडाचा सारा आसमंत घोषणांनी निनादून गेला. ‘क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’... वाद्यांचा कडकडाट, ढोल-ताशे, सनई-चौघडे, नौबती अन् तुताऱ्या झडू लागल्या.

चारही दिशांना तोफा दुमदुमू लागल्या. राष्ट्रभूमीला राजे शिवाजी महाराज लाभल्याची आनंदवार्ता देशभरात पसरली. जणू वारा सह्याद्रीच्या रांगा आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन सांगत होता, ‘राजे छत्रपती झाले.’ रयतेचे राज्य स्थापन झाले. कित्येक शतकांनंतरची ती पहिली अलौकिक स्वातंत्र्याची रम्य पहाट होती.

त्या अद्वितीय सकाळी रायगडाचा परिसर सूर्याच्या सोनेरी प्रकाशात भगव्या रंगाने न्हाऊन निघाला होता. राजमाता जिजाऊंचे डोळे अलौकिक आनंद सोहळ्याने पाणावले होते. याचसाठी केला होता अट्टहास... ते त्यांचे स्वप्न आज पूर्ण झाले होते.

अलौकिक क्षणाची बातमी सर्व जगभर पसरली. राज्याभिषेकामुळे शेजारच्या राज्यांशी करार करणे सोयीचे झाले. राज्याभिषेकापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन ‘शक’ ही कालगणना सुरू केली. म्हणजे राजे शककर्ते झाले.

महाराजांनी राज्याभिषेकापासून दोन नाणी एक ‘शिवराई’ आणि दुसरे ‘होन’ काढली. फारसी भाषेतला राज्यकारभार स्वभाषेत व्हावा म्हणून महाराजांनी ‘रघुनाथपंत हणमंते’ यांच्याकडून राज्यव्यवहार कोषाची निर्मिती केली.

म्हणूनच हा राज्याभिषेक केवळ महाराजांचा नव्हता, तर तो येथील रयतेचाही होता. राज्याभिषेकाने त्यांच्या अंत:शक्तीवरच शिक्कामोर्तब झाले. महाराजांनी या रयतेच्या मनात स्वतःबद्दल एक आगळावेगळा विश्वास निर्माण केला होता.

स्वराज्याप्रती निर्माण झालेला हा विश्वास म्हणजे आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो, आपण आपले राज्य निर्माण करू शकतो... म्हणजेच आधी मरेपर्यंत लढणाऱ्या मराठ्यांना जिंकेपर्यंत लढण्याची प्रेरणा दिली.

राज्याभिषेकाचे सर्वात मोठे यश म्हणजे तो आजही तुम्हा-आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहतो. हे त्या शिवराज्याभिषेकाचे वैशिष्ट्य आहे. राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. कितीही मोठी संकटे येऊ द्या, राजांनी ध्येयाचे विस्मरण कधीही होऊ दिले नाही.

आज शिवराज्याभिषेकाचे स्मरण करण्याचे कारण म्हणजे आपल्या देशात शिवरायांपूर्वी आणि त्यांच्यानंतर जे राजे होऊन गेले त्यांपैकी अनेकांना परकीय आक्रमकांच्या आक्रमणामागील मूळ उद्दिष्टांचे आकलन झाले नाही.

परकीय आक्रमणांमागील उद्देश हा केवळ साम्राज्यविस्तार किंवा धन-संपत्ती मिळवणे एवढाच नव्हता. त्यासोबत आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे हासुद्धा होता. ही गोष्ट कदाचित छत्रपती शिवाजी महाराज सोडून इतर अनेक भारतीय सत्ताधीशांच्या लक्षातच आलेली नाही.

त्यामुळे या आक्रमकांसंदर्भात आपण नेमकी काय भूमिका घ्यावी, हे त्यांना कळलेच नाही. याउलट त्यांनी आपापसांतील संघर्ष करतानासुद्धा त्यांची मदत घेतली. उदा. राजा जयचंदाने राजा पृथ्वीराज चौहानांचा पराभव करण्यासाठी मोहम्मद घोरीला आमंत्रित केले. नानासाहेब पेशव्यांनी आग्र्याचे बलशाली आरमार बुडवण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली.

मराठ्यांची सत्ता अटकेपार पोहचवणारे श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनीसुद्धा पेशवे पद मिळविण्यासाठी इंग्रजांची मदत मागितली. कर्नाटकच्या नवाबाच्या दोन्ही मुलांनी नवाब पदासाठी एकाने फ्रेंचांची, तर दुसऱ्याने इंग्रजांची मदत मागितली.

अशी अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात दिसतात. यासोबतच हा देश आपला आहे, इथे आपलीच सत्ता असली पाहिजे, परकीयांनी येथे सत्ता स्थापन करता कामा नये, त्यांना इथे राहायचे असेल तर त्यांनी आपल्या अटी मान्य केल्या पाहिजेत, ही परकीय आक्रमकांबद्दलची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांच्या आधीच्या व त्यांच्या नंतरच्या अनेक सत्ताधीशांच्या लक्षात आली नाही.

नाही तर मराठे १७०७ नंतर लगेचच दिल्लीपती झाले असते. कारण त्यांनी महाराजांच्या मृत्यूनंतर सतत २७ वर्षे औरंगजेबाच्या अवाढव्य सैन्याशी संघर्ष करून त्याला जेरीस आणले होते. मुघलांची सत्ता खिळखिळी होण्यास सुरुवात झाली होती. आपण महाराजांची विचारधारा विसरलो म्हणूनच परत पारतंत्र्यात गेलो. आजही सभोवतालचे चित्र बघितले की निश्चितच वाटून जाते जे शिवछत्रपतींना उमजले होते ते आम्हाला अजूनही नाही समजले.

खरे तर आज आपण हा दिवस का साजरा करायचा हा अनेकांना पडलेला एक मोठाच प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या उद्देशाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती तो आजही पूर्ण झाला असे म्हणता येत नाही.

महाराजांना दीर्घायुष्य न लाभल्याने त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. माझ्या मते, ते स्वप्न पूर्ण केले जावे असे ज्यांना ज्यांना वाटते त्या सर्वांनी यापुढेही शिवराज्याभिषेक दिन शिवरायांना समजून साजरा करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नेमके उद्दिष्ट काय?

आपल्या धर्मनिरपेक्ष देशात तो अनेक तर्क-वितर्कांचा मुद्दा होऊ शकतो. त्याबद्दल अनेक संशोधनेही नोंदविली जातात. स्वराज्याचा विस्तार कुठपर्यंत करायचा, या आपले सरदार रावजी सोमनाथ यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज म्हणाले, ‘‘सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर ‘श्रीं’ ची इच्छा.’’

खरे तर अखंड शिवचरित्र म्हणजेच विवेक. आज तुम्ही-आम्ही सर्वांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे हाच एक शिवरायांचा मावळा म्हणून त्यांना केलेला मानाचा मुजरा असेल. त्या माध्यमातून देशाचेही भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररूपी कार्यात आपल्यामुळे एका थेंबाची निश्चितच भर पडेल.

अशा असंख्य थेंबांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा भारत देश उद्या आत्मनिर्भर होऊन जगात विश्वगुरू होईल यात शंकाच नाही. त्याचबरोबर आपल्याला शिक्षणप्रणालीतून शिवविचार रुजवण्याचे व वाढविण्याचे कार्य करावयाचे आहे.

हा राज्याभिषेक सोहळा पुढील अनेक पिढ्यांना असेच संघर्षरत राहून यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा देत राहील. अभिमानाने सांगावा असा आपला देदीप्यमान इतिहास आहे. शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपली पुढील वाटचाल करण्याचा निश्चय ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळ्याच्या निमित्ताने करू या.

prashantshirude1674@gmail.com (लेखक शिक्षक असून सामाजिक विषयावर लेखन करत असतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com