

Shivaji Maharaj Surat Return Strategy
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
राजे ६ ऑक्टोबर रोजी सुरतहून निघाले. शत्रूचा धोका टाळण्यासाठी, त्यांनी जाण्या-येण्याचा मार्ग वेगळा ठेवण्याची रणनीती आखली. मुघलांचे मुख्य सैन्य औरंगाबाद व बुर्हाणपूर येथे असल्याने राजांनी घाटमाथ्यावरून स्वराज्यात परतण्याचे ठरविले. ही बातमी समजताच मुघलांनी त्यांना सातमाळ रांग ओलांडू न देण्याचा दृढनिश्चय केला. मुघलांची ही रणनीती हाणून पाडत राजांनी १७ ऑक्टोबर १६७० रोजी झालेल्या युद्धात स्वतः उतरून मुघलांचा दारूण पराभव केला.
मुघलांची हालचाल ः ही बातमी दख्खनचा सुभेदार शाहजादा मुअज्जमपर्यंत पोहोचली आणि एकच खळबळ उडाली. त्याने बुर्हाणपूर येथे असलेल्या दाऊदखानाला राजांना अडविण्याचा तातडीचा खलिता पाठविला. त्यानुसार दाऊदखान (कुरेशी) बुऱ्हाणपूरहून निघाला खरं, परंतु राजांच्या दिशेने जाण्याऐवजी त्याने नैऋत्येकडे सुमारे १८० कि.मी.चा प्रवास करून औरंगाबाद गाठले. (बहुधा त्याच्याकडे पुरेसे सैन्य नसावे). तिथे त्याने शाहजाद्याची भेट घेतली. तिथून तो पूर्वेला सुमारे ६३ किमी वरील वैजापूर येथे सैन्याची जमवाजमव करण्यासाठी पोहोचला. आता त्याच्यासोबत राव भाऊसिंग हाडा, इख्लासखान मियाना ऊर्फ अब्दुल मुहम्मद, राय मकरंद खत्री, शेख सफी, मीर अब्दुल मबूद (तोफखाना प्रमुख), संग्रामखान घोरी, भान पुरोहित, गालिब खान, नारोजी, बसवंतराव, भीमसेन सक्सेना (‘तारीख-इ दिल्कुशा’ या ग्रंथाचा लेखक) इत्यादी सरदार होते.
शिवसैन्याची मुल्हेरवर स्वारी ः सुरतपासून पूर्वेला सुमारे १०० किमी अंतरावरील सोनगढ मार्गे नवापूर येथे राजे पोहोचले. या मार्गावर उंच डोंगररांगा नसल्यामुळे, सोबतच्या खजिन्याची वाहतूक सुलभ व्हावी म्हणून हा मार्ग निवडला होता. वाटेत येणाऱ्या मुघली ठाण्यांची लूट करत, १४ ऑक्टोबरच्या सुमारास त्यांनी मौसम नदीजवळ व मुल्हेर (औरंगगड) किल्ल्याजवळची मुल्हेरची पेठ लुटली. मुल्हेरचा किल्लेदार असलेला नेकनाम खान हा किल्ल्यावर पळून गेला. मात्र मुल्हेर लुटल्याची बातमी त्याने तातडीने शाहजाद्याला व दाऊदखानाला धाडली. त्यानंतर पूर्वेकडील ८ किमी अंतरावरील ताहराबाद येथे पोहोचल्यानंतर राजांनी तिथून ईशान्येस सुमारे २२५ कि.मी. अंतरावरील बुऱ्हाणपूर व मार्गावरील मुघली प्रदेशात छापे टाकण्याची हूल उठविली. त्यामुळे जागोजागचे मुघल सरदार अजूनच बिथरले आणि सर्वत्र गोंधळ माजला. दाऊदखान सैन्यानिशी आपली परतीची वाट अडविण्यासाठी बुऱ्हाणपूरहून औरंगाबादला आल्याची बातमी राजांना टेहळ्यांनी (हेर) दिली होती. त्यामुळे जवळच्या साल्हेर व मुल्हेर किल्ल्याकडे न जाता, वेगाने सातमाळ डोंगररांग ओलांडण्यासाठी त्यांनी दक्षिणेकडे आगेकूच केली.