

Chh. Shivaji Maharaj Agra Escape Plan
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
शिवाजीराजे आग्रा येथे ११ मे रोजी पोहोचले आणि २५ मे पासून पूर्णपणे नजरकैदेत अडकले. राजांना ठार मारण्याचा स्वतःचा आदेश ५ जून रोजी औरंगजेबाने मागे घेतला. तेव्हा येथून आपल्या सर्व माणसांसह निसटण्याशिवाय गत्यंतर नाही हे राजांनी जाणले. त्याप्रमाणे परतीचे मार्ग व त्यांतील धोके इत्यादींचा त्यांनी अंदाज घेतला आणि डावपेच आखण्यास सुरुवात केली.
राजांची सुटकेची तयारी ः शिवाजीराजांनी ८ जून रोजी आपल्या बहुतेक साथीदारांना परत पाठवण्याचे ठरविले. तशी राजांनी विनंती केल्यानंतर औरंगजेबाने प्रवासाचे परवाने (दस्तक) दिले आणि लवकरच राजांचे बहुतेक साथीदार आग्य्रातून बाहेर पडले. (काहीजण वेशांतर करून राजांच्या परतीच्या प्रवासात मदतीसाठी ठिकठिकाणी थांबले असावेत) काही काळ गेल्यानंतर १२ जूनच्या सुमारास राजांनी बादशाहाकडे अशी विनंती केली की, त्यांना फकीर बनून बनारस येथे राहण्याची परवानगी द्यावी. हे ऐकून औरंगजेबाने उपहासाने सांगितले की, ‘राजांना फकीर बनू द्या आणि त्यांना प्रयागच्या किल्ल्यात ठेवा.’ आता शिवाजीराजे कधी ना कधी पळून जाण्याचा प्रयत्न करणार याची सर्वांना कल्पना आली. त्यानुसार जून १६६६च्या सुरुवातीपासूनच सर्वत्र खबरदारी घेण्यास सुरुवात झाली. परतीच्या मार्गावर कडक तपासणी करण्याचे आदेश दिले गेले. बादशाह रामसिंहामार्फत राजांकडे वारंवार त्यांच्या सर्व किल्ल्यांचा ताबा सोपवण्याचा आग्रह धरत होता; मात्र राजे तसे करण्यास ठामपणे नकार देत होते. राजांवरील पाळत १३ ऑगस्टच्या सुमारास अधिकच कडक करण्यात आली आणि बादशाहाने त्यांना राजा विठ्ठलदास यांच्या हवेलीत हलवण्याचा आदेश दिला.