दुर्ग संस्कृती ते कार्य संस्कृती | Saptrang | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

saptrang
दुर्ग संस्कृती ते कार्य संस्कृती | Saptrang

दुर्ग संस्कृती ते कार्य संस्कृती

महाराष्ट्रातले गड (किल्ले/दुर्ग) आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा विषय आहे. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली, तर अनेक शिखरं आपल्याला तटबुरुजांनी नटलेली दिसतात. यातील बहुतेक दुर्ग श्री शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाले आहेत. या दुर्गांच्या आधारावरच शिवरायांनी परकीय सत्तांना नामोहरम केलं. महाराष्ट्राची स्वतंत्र भूमी तयार होण्याआधी शौर्याचा एक मोठा इतिहास या किल्ल्यांनी पाहिलेला आहे. त्याकाळी स्वसंरक्षणासाठी महत्त्वाचे असलेले किल्ले आज आपल्या इतिहासाची, पूर्वजांच्या शौर्याची सोनेरी पाने म्हणून आपल्याला तितकेच महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील दुर्ग कोणतीही तडजोड न करता झगडत राहिले. म्हणूनच ते आपली स्फूर्तिस्थाने आहेत.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीची सुरवातही किल्ले जिंकून केली. दुर्गांना स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व होते. महाराजांच्या आज्ञापत्रातदेखील दुर्गांविषयी समावेश आहे. बघता बघता साडेतीनशेपेक्षा अधिक किल्ल्यांचं साम्राज्य अवघ्या तीस-पस्तीस वर्षांत उभं राहिलं. यातील प्रत्येक किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आणि आपली स्वतंत्र ओळख जपणारा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, या किल्ल्यांची भौगोलिक रचना, अंतर्गत रचना, बांधकाम पद्धती, ऐतिहासिक घडामोडी आणि इतर बऱ्याच गोष्टी.

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मांगल्य, सचोटी, परिश्रम आणि ध्येयनिष्ठेचा पवित्र संगम! ३५० वर्षांपूर्वीचा आपला देदीप्यमान इतिहास आजच्या काळाच्या दृष्टिकोनातून बघणं, त्याचं अवलोकन करणं आणि त्यापासून प्रेरणा घेऊन वर्तमान सुकर करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. हे स्वराज्य ज्या गडकोटांच्या बळावर उभं राहिलं, त्या गडांचं वैशिष्ट्य समजून त्याचा गाभा आजच्या काळात कसा उपयोगी होऊ शकतो आणि दुर्ग संस्कृतीच्या दूरगामी परिणामांचे फायदे आपल्या कार्य संस्कृतीसाठी कसे होऊ शकतात, याचे विवेचन पुढील सर्व भागात असेल. या इतिहासामुळे आजच्या कठीण प्रसंगातही प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला यशस्वितेचा मार्ग मिळू शकतो. शब्द मर्यादेमुळे शक्य तितके जास्तीत जास्त मुद्दे समाविष्ट करण्याचा प्रयत्न असेल.

दुर्गांचा अभ्यास करताना असं लक्षात आलं, की या दुर्गांचा आणि तिथे जोपासल्येल्या संस्कृतीचा आपल्या कार्य संस्कृतीशीसुद्धा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या कामात अधिक सकारात्मकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी दुर्गांचे वैशिष्ट्य आणि तिथली संस्कृती समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे आपण आपले काम अधिक प्रभावीपणे आणि सकारात्मकतेने करू शकतो. कार्य संस्कृतीच्या विविध पैलूंचा आणि दुर्गांचा जवळचा संबंध सर्वसमावेशक पद्धतीने अभ्यासण्यासाठी आम्ही निवडक दुर्गांना भेटी दिल्या. या प्रत्यक्ष भेटीतून, तसेच इतिहासकार आणि जाणकारांशी चर्चा केल्यावर ‘दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती’ हा विषय समोर झाला. विविध व्याख्यानांच्या माध्यमातून तो सर्वांसमोर मांडायला सुरवात केली. आगामी काळात हाच विषय आणखी कल्पक पद्धतीने मांडण्याचा मानस आहे.

आज या विषयीची संकल्पना लेखमालेच्या या पहिल्या भागातून आपल्यासमोर मांडताना मनस्वी आनंद होत आहे. कार्य संस्कृतीच्या अनेक पैलूंपैकी महत्त्वाचे असलेले दृष्टिकोन, दूरदृष्टी, क्षमता, आत्मविश्वास, निष्ठा, मूल्य, कल्पकता, संवाद, तणाव व्यवस्थापन आणि वेळेचे नियोजन या सगळ्यांचा परिपाक म्हणजेच कार्य संस्कृती. हेच पैलू या मालिकेतील पुढील लेखांमधून आपल्या भेटीला येणार आहेत. पण थोड्या वेगळ्या पद्धतीने; अर्थात दुर्गांच्या माध्यमातून. यामुळे शिवविचार आणि महाराजांचे कार्य अधिक जवळून समजावून घेता येईल, अशी आशा आहे. तसेच कामाच्या ठिकाणी अधिक प्रभावीपणे आणि सकारात्मकतेने काम करण्यास आपल्याला बळ मिळेल.

आपल्यालाही हा विषय आवडेल, अशी खात्री आहेच. इतिहास नेहमीच आपल्याला जगायला बळ, विचारांना चालना आणि आचारांना आकार देतो. त्याचा मनोभावे स्वीकार करणं आणि ध्येय साध्य करण्यासाठी कार्यतत्पर होणं, हीच शिवरायांच्या विचारांना आणि कृतीला आदरांजली ठरेल. हेच शिवविचार एका नावीन्यपूर्ण पद्धतीने सर्वांसमोर मांडण्याचा हा आमचा छोटासा परंतु प्रामाणिक प्रयत्न आई भवानी, राजमाता जिजाऊसाहेब आणि छत्रपतींच्या चरणी अर्पण!

(लेखक गोखलेज अॅडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (‘गती’) जळगावचे संचालक आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top