Premium|Chh. Shivaji Maharaj Karnataka Campaign : कानडा प्रांतावरील मोहिमा

Shivaji Maharaj Karnataka Campaign 1673 : ऑक्टोबर १६७३मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरून कानडा प्रांताच्या मोहिमेला सुरुवात केली. प्रतापगडावरील भवानी देवीचे दर्शन, दक्षिणेकडील दीर्घ प्रवास आणि कारवारजवळील काळी नदीपर्यंत स्वराज्याचा विस्तार या ऐतिहासिक मोहिमेतील महत्त्वाचे टप्पे होते.
Shivaji Maharaj Karnataka Campaign 1673

Shivaji Maharaj Karnataka Campaign 1673

esakal

Updated on: 

ऑक्टोबर १६७३मध्ये राजांनी कानडा प्रांतावर मोहीम काढून स्वराज्याच्या सीमा कारवारच्या काळी नदीपर्यंत विस्तारल्या. दिलेरखानाचा जानेवारी १६७४मध्ये कोकणात धुव्वा उडवला. फेब्रुवारीत नेसरीच्या युद्धात सेनापती प्रतापराव गुजर यांना वीरमरण आले, त्यानंतर आनंदराव मकाजी यांनी नेत्रदीपक विजय मिळवला. सिद्दीसोबतच्या नौदल युद्धात सरशी मिळवत, शिवसैन्याने बहादूरखानाच्या छावणीवर छापा टाकून मोठी लूट हस्तगत केली आणि तीनही शत्रूंविरुद्ध आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

कानडा प्रांतावरील मोहिमा

विजयादशमीच्या मुहूर्तावर १० ऑक्टोबर १६७३रोजी १० हजार घोडेस्वार व १५ हजार पायदळ घेऊन राजे रायगडाहून या मोहिमेसाठी निघाले. तोपावेतो भीमगडापर्यंतचा प्रांत राजांच्या ताब्यात होता आणि हुबळी-लक्ष्मेश्‍वरापर्यंत शिवसैन्याने धडका मारलेल्या होत्या. यावेळी त्याहीपुढे दक्षिणेला सोंदेकरांपर्यंत मजल मारण्याचा राजांचा विचार होता. अगदी लुटीचे साहित्य वाहून आणण्यासाठी त्यांनी २० हजार पिशव्या सोबत घेतल्या होत्या.

कद्रा येथे मुक्काम ः रायगडहून निघाल्यानंतर प्रथम राजांनी प्रतापगडावर जाऊन श्रीभवानी देवीचे दर्शन घेतले व १३ ऑक्टोबर रोजी ते सातारा येथे आले. तिथून दक्षिणेकडे सुमारे ३१० कि.मी.चा सह्याद्री डोंगररांगांजवळून प्रवास करत २५ नोव्हेंबर १६७३च्या सुमारास ते कारवारजवळील काळी नदीच्या काठावरील कद्रा येथे पोहोचले. येथे २-३ दिवस मुक्काम करून सर्व प्रांत ताब्यात घेतला. त्यापलीकडील सोंदेचे राजे (सदाशिव नायक) यांच्याशी राजांनी चौथाई देण्याबाबत पूर्वीच पत्रव्यवहार केलेला असावा. सिरसी, कारवार, अंकोला ही मुख्य ठाणी असलेल्या या राज्याची राजधानी ‘सोंदे/सोंदा’ येथे होती.

बंकापूर लूट व सोंदेकरांशी तह ः कद्रा येथे पोहोचण्यापूर्वीच राजांनी आपल्या सैन्याची विभागणी करून काहींना आदिलशाही प्रांतात पाठविले होते. त्यापैकी एका तुकडीने हुबळीपासून दक्षिणेस सुमारे ५० कि.मी.वरील बंकापूर शहरावर २० नोव्हेंबर १६७३च्या सुमारास स्वारी केली. (बंकापूरच्या ईशान्येस सुमारे ३२ कि.मी.वरील लक्ष्मेश्‍वर शहरावर शिवसैन्याने फेब्रुवारी १६६०मध्ये स्वारी केली होती.) आपले बहुतेक सैन्य राजांनी सह्याद्री रांगेच्या आडोशाला सुपे (सुपा) व दिघी (डिग्गी) घाटाजवळ तैनात केले होते. आणि ४ हजार पायदळ व २ हजार घोडेस्वारांनिशी राजे स्वतः सोंद्याच्या दिशेने निघाले. मात्र राजांनी सोंदेकरांवर आक्रमण न करता त्यांच्याकडून चौथाई घेऊन मैत्रीपूर्ण तह केल्याचे दिसते. तह झाल्यामुळे येथून राजांनी आपल्या सैन्यासह स्वराज्याकडे परतीचा प्रवास सुरू केला.

शर्जा खानाशी युद्ध ः बंकापूर प्रांत बहलोल खानाच्या ताब्यात असल्याने तेथील लुटीची बातमी कळताच तो चवताळला आणि त्याने रागाने तिकडे धाव घेतली. बंकापूरच्या लुटीसाठी गेलेल्या राजांच्या व बहलोलच्या सैन्याचा किरकोळ संघर्ष झाला. पुरेशी लूट ताब्यात मिळाल्याची खात्री झाल्यानंतर शिवसैन्याने शिताफीने येथून माघार घेतली. मात्र चंदगड (किंवा चंद्रगुत्ती) येथे गेलेल्या शिवसैन्याच्या तुकडीचे व शर्जा खानाचे (नोव्हेंबर १६७३ मध्ये) युद्ध जुंपले. यामध्ये विठोजी शिंदे धारातीर्थी पडले. विठोजींच्या मृत्यूूचा बदला घेण्याची संधी शिवसैन्याला पुढे लगेचच मिळाली. महिमाजी शिंदे यांनी १५ डिसेंबर १६७३च्या सुमारास पन्हाळ्याजवळ झालेल्या युद्धात सय्यद हबीब शर्जा खान याला ठार करून हा सूड घेतला. या युद्धात दोन हत्ती व ३०० घोडे शिवसैन्याने हस्तगत केले.

स्वराज्यविस्तार ः अशाप्रकारे स्वराज्याच्या सीमा कारवार येथील काळी नदीपर्यंत व सोंदेकरांच्या राज्यापर्यंत नेऊन, शिवाजीराजे २० फेब्रुवारी १६७४ मध्ये रायगडावर परत आले. त्यानंतर मात्र एक दुःखद घटना घडली; १६ मार्च १६७४च्या सुमारास राजांची पत्नी काशीबाई यांचे निधन झाले. ऑक्टोबर १६७३ ते फेब्रुवारी १६७४च्या या पाच महिन्यांच्या मोहिमेमुळे उत्तरेकडील दमण जवळच्या दमणगंगा नदीपासून ते दक्षिणेकडे कारवार जवळच्या काळी नदीपर्यंतच्या सुमारे ६०० कि.मी. अंतराच्या भूभागावर शिवाजीराजांचे अधिपत्य निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com