

Chh. Shivaji Maharaj Naval Campaigns
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
सिद्दी व इंग्रजांच्या मैत्रीसंबंधामध्ये पाचर रोवण्यासाठी राजांनी एप्रिल १६७२मध्ये खांदेरी बेटावर ताबा मिळविला. कुत्बशाहाशी तह करून आर्थिक मदत मिळविली. जव्हार, रामनगर इत्यादी संस्थाने जिंकून पोर्तुगीजांकडून गावखंडी कराची वसुली केली तर सुरतेतून चौथाईची मागणी केली. १६७२च्या या मोहिमांमुळे उत्तरेकडील दमणगंगा नदीपासून ते दक्षिणेकडे भीमगडापर्यंतच्या सुमारे ५४० कि.मी. अंतराच्या भूभागावर शिवाजीराजांचे अधिपत्य निर्माण झाले.
सिद्दीचा उपद्रव ः राजांनी दंडाराजपुरीच्या सिद्दीची १६७१च्या सुमारास पुन्हा एकदा चहूबाजूंनी कोंडी केली, त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली. इंग्रज व पोर्तुगीजांकडून गुप्तपणे मदत मिळूनही सिद्दीला शिवसैन्याचा मुकाबला करणे कठीण जात होते. शिवसैन्याने वेढा आवळल्याने सिद्दी फतहखान या सिद्दीच्या प्रमुखाने राजांसमोर शरणागती पत्करण्याचा मनोदय सहकाऱ्यांसमोर मांडला. सिद्दी संबुल, सिद्दी याकूत व सिद्दी खैरियत या त्याच्या सरदारांनी कडाडून विरोध केल्यामुळे तो प्रस्ताव बारगळला. अखेर सप्टेंबर १६७२च्या सुमारास सिद्दी फतहखानाने मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारले.