

Shivaji Maharaj Mughal War
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
शिवाजीराजांच्या दख्खनेतील झंझावाती आक्रमणांमुळे औरंगजेब हडबडून जागा झाला. राजांचा ‘अश्वमेध’ रोखण्यासाठी महाबतखान, बहादूरखान, दिलेरखान यासारख्या मातब्बर योद्धांना त्याने दख्खनेकडे पाठविले खरे! परंतु त्याला हे माहीत नव्हते की, मराठ्यांनी मुघलांविरुद्ध पुकारलेले हे युद्ध खुद्द मुघल बादशाहा जरी आला तरी थांबणारे नव्हते. मातृभूमीस स्वतंत्र करेपर्यंत शिवाजीराजांचा हा ‘अश्वमेध’ आता कोणत्याही परिस्थितीत थांबणारा नव्हता!
राजांच्या झंझावातामुळे औरंगजेबाला परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळे त्याने २९ नोव्हेंबर १६७० रोजी महाबतखानाची दख्खनेतील मुघल सैन्याच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. (याचे मूळ नाव मिर्झा लहरास्प असे होते. शाहजहानने त्याला १६३८मध्ये ‘खान’ ही तर १६५२मध्ये ‘महाबत खान’ ही पदवी दिली होती.) सुमारे २५ हजार घोडदळ, पायदळ व मुबलक साधनसामुग्री सोबत घेऊन तो १० जानेवारी १६७१ रोजी औरंगाबाद येथे पोहोचला. तिथे त्याने दख्खनचा सुभेदार शाहजादा मुअज्जम याची भेट घेतली. दिल्लीवरून महाबतसोबत आलेल्या या अतिरिक्त फौजफाट्यामुळे दख्खनमधील मुघलांचे सैन्यबळ ४० हजार घोडदळापर्यंत पोहोचले होते. महाबतने तातडीने दाऊदखानाच्या भेटीसाठी औरंगाबादहून सुमारे १२५ कि.मी. वायव्येस असलेल्या चांदवडच्या (चांदूर) दिशेने कूच केले आणि २५ जानेवारी १६७१च्या सुमारास तो तिथे पोहोचला. या दोन्ही मुघल सरदारांचे मानसन्मानावरून एकमेकांशी खटके उडाले.