

Shivaji Maharaj Naval Campaign
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
डिसेंबर १६६४पर्यंत सत्तरी, फोंडा, भिमगडापावेतो प्रांत राजांनी जिंकला होता. आता वेळ होती मिरजानपर्यंतचे ‘तळकोकण’ व कानडा प्रांत जिंकण्याची. मोहीम अत्यंत जोखमीची होती; कारण लढाई केवळ शत्रूशी नाही तर स्वधर्मातील अनिष्ट रूढींशीही होती. अखेर जुनाट रूढीपरंपरेच्या बेड्या झुगारून राजे सिंधुसागरावर स्वार झाले...!
केळदीचे नायक ः शिवप्पा नायक हे केळदीचे (इक्केरी/बेदनूर) कर्तबगार राजे होते. त्यांनी पोर्तुगीज, आदिलशाही इत्यादींशी संघर्ष करून राज्यविस्तार केला होता. १६६० मध्ये शिवप्पा नायक व १६६४मध्ये ‘दाक्षिणात्य राज्यकर्त्यांचे संरक्षक’ शाहजीराजे यांच्या निधनानंतर, केळदीचे राज्य बळकाविण्यासाठी चढाओढ सुरू झाली. शिवाजीराजांना हेरांकरवी ही बातमी कळताच त्यांनी आरमारी मोहिमेची एक अचाट योजना आखली. चोळराजांनंतर ‘सिंधुबंदी’सारख्या अनिष्ट रूढी परंपरांमुळे शेकडो वर्षांची आरमारी परंपरा खंडित झालेली होती. अशा खुळचट परंपरा झुगारून, नौदलाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना राजे स्वतः आपल्या नौदलासह कानडा प्रांतावरील या मोहिमेसाठी जाण्यास सज्ज झाले.
यावेळी केळदीच्या गादीवर सोमशेखर हा अकार्यक्षम राजा असल्याने, कारभाराची सूत्रे राणी चन्नम्मा हिने स्वतःच्या हाती घेतली होती. बहुधा तिनेच राजांकडे मदतीचा सांगावा धाडला होता. इकडे मिर्झाराजा जयसिंहाची दख्खनेकडे नेमणूक झाली आणि शिवाजीराजांसह आदिलशाहीवर देखील तो स्वारी करणार या शक्यतेने आदिलशाहा स्वसंरक्षणाच्या उद्योगास लागला. कानडा प्रांतातील आदिलशाहीचे सैन्य त्याने सीमेवर वळविले. यामुळे राजांचा कानड्याकडे जाण्याचा रस्ता मोकळा झाला. आता एकच अडचण होती, पोर्तुगीजांची... ती देखील हेरांनी आणलेल्या एका बातमीमुळे दूर झाली. आणि मोहिमेची तारीख ठरली ‘८ फेब्रुवारी’. काय होते या तारखेला?
हुंडा दिलेले शहर ः मुंबई ः मे १६६१मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचा विवाह पोर्तुगालचा राजा चौथा जॉन याची कन्या कॅथरीन ऑफ ब्रिगांझा हिच्याशी ठरले. या विवाहाचा हुंडा म्हणून पोर्तुगालच्या राजाने ‘मुंबई बेट’ इंग्रजांना द्यायचे ठरविले. या बेटाच्या हस्तांतरणाचा समारंभ ८ फेब्रुवारी १६६५ रोजी मुंबई येथे होणार होता. गोव्यामधील बहुतांश पोर्तुगीज आरमार यासाठी मुंबईला जाणार होते. ही बातमी राजापूरच्या इंग्रजांकडून आपल्या हेरांना समजली आणि नंतर राजांना. आलेल्या बातम्यांद्वारे रणनीती आखण्यास वाकबगार असणाऱ्या राजांनी ही दुर्मिळ संधी अचूक साधली.