Premium|Second Surat Raid : सुरतेवर दुसऱ्यांदा स्वारी करण्यापूर्वी राजांनी आखली अशी व्यूहरचना

Shivaji Maharaj Surat Raid : औरंगजेबाने तह मोडल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध युद्धाची तयारी केली. गुप्तहेरांच्या माहितीवरून व्यूहरचना आखत महाराजांनी १६७०मध्ये दुसऱ्या सुरत स्वारीपूर्वी जुन्नर, नाणेघाट आणि कल्याणकडे कूच केले.
Shivaji Maharaj Surat Raid

Shivaji Maharaj Surat Raid

esakal

Updated on

औरंगजेबाने राजांसोबतचा तह मोडला आणि युद्धास आमंत्रण दिले. आता या युद्धाचा खर्च भागविण्यासाठी व मुघलांनी केलेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राजांनी त्यांच्या शहरांवर छापे मारण्याचे ठरविले. जानेवारी १६६४मध्ये पहिल्या सुरत स्वारीच्या धसक्यातून सावरत असतानाच मार्च १६७०पासून सुरत शहरात ‘शिवाजीराजे हल्ला करणार’ अशा अफवांचा महापूर आला होता. अखेर ३ ऑक्टोबर १६७० रोजी राजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर हल्ला करून मुघलांच्या सर्वांत मोठ्या व्यापारी केंद्राचे स्थान डळमळीत केले.

सुरत शहरात अनेक अफवा पसरत असल्यामुळे तेथील सर्व कारभार ठप्प पडला होता. अखेर तेथील रहिवाशांची भीती दूर करण्यासाठी एप्रिल १६७०मध्ये गुजरातचा सुभेदार बहादूर खान हा ५ हजार घोडेस्वारांसह शहरात दाखल झाला. ज्यामुळे सुरतेतील घबराट बऱ्याच अंशी शांत झाली. सप्टेंबर १६७०मध्ये पुन्हा एकदा अशा अफवा पसरू लागल्या, ज्यामुळे पुन्हा सर्वत्र घबराट निर्माण झाली.

राजांची व्यूहरचना ः मुघलांविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर मुघली प्रांतातील प्रमुख शहरांतून किती संपत्ती मिळू शकेल, याचा अंदाज घेण्यासाठी राजांनी आपले हेर सर्वत्र पाठविलेले होते. गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक यांनी राजांच्या आज्ञेप्रमाणे प्राणांची बाजू लावून सर्व ठिकाणची बित्तंबातमी राजांना पोहचविली आणि राजांनी त्याप्रमाणे आपली व्यूहरचना आखली.

राजांचा सुरतेचा प्रवास ः राजांनी ऑगस्ट १६७०च्या पूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘रायगड’ येथे आपला मुक्काम हलविला आणि मोरोपंत पिंगळे यांना त्रिंबकगड व शिवनेरी जिंकण्यासाठी पुढे रवाना केले. त्यापाठोपाठ राजांनी देखील सुमारे २० हजार सैन्यासह रायगड येथून मोहिमेसाठी प्रस्थान केले. ईशान्येस सुमारे १२० किमी अंतरावरील जुन्नर येथे १५ ऑगस्ट १६७०च्या सुमारास त्यांनी स्वारी केली. त्यांनी जुन्नरला वेढा दिला. (जेधे शकावली). परंतु, शिवनेरी जिंकण्यास वेळ लागत असल्याचे पाहून त्यांनी वेढा उठवला व ५ सप्टेंबरच्या सुमारास १५ हजार घोडेस्वार व तेवढ्याच पायदळाच्या साहाय्याने नाणेघाटामार्गे पश्‍चिमेस सुमारे ८० किमी अंतरावरील कल्याणकडे कूच केले. राजे ९ सप्टेंबरच्या सुमारास कल्याण प्रांतात दाखल झाले. (१२ सप्टेंबर १६७० रोजीचे इंग्रजांचे पत्र).

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com