Trimbak Fort Victory
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
नोव्हेंबर १६६९मध्ये मुघलांसोबतचा तह मोडल्यानंतर राजांनी डोंगरी किल्ले जिंकण्याकडे, मुघली शहरांतून संपत्ती मिळविण्यास प्राधान्य दिले होते. ३ ते ५ ऑक्टोबर १६७० रोजी सूरत मोहीम व १७ ऑक्टोबर रोजी कांचनबारीचे युद्ध विजयानंतर २२ ऑक्टोबरच्या सुमारास राजे कुंजरगडावर आले. स्वराज्याच्या उत्तर व ईशान्येकडील बागलाण, खानदेश, वऱ्हाड प्रांतांवर स्वाऱ्या केल्या आणि मुघलांचा हा प्रदेश ‘इक्षुवत् निष्पीड्य’ म्हणजे उसासारखा पिळून काढला.
त्र्यंबक किल्ल्यावर विजय ः १७ ऑक्टोबर १६७० रोजीच्या वणी-दिंडोरी ऊर्फ कांचनबारीच्या संग्रामानंतर शिवाजीराजे पेठ व तिथून नाशिक-त्र्यंबकच्या मधून सह्याद्रीरांगेच्या आडोशाने दक्षिणेकडे वेगाने निघाले. सैन्याची एक तुकडी मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वात देऊन त्यांना त्र्यंबक तसेच आसपासचे किल्ले व प्रांत जिंकण्याचा आदेश दिला. त्यानुसार या सैन्याने २५ ऑक्टोबर १६७०च्या सुमारास गोदावरी नदीच्या उगमाजवळील त्र्यंबकगड (त्रिंबक/श्रीगड/ब्रह्मगिरी) जिंकून घेतला. (जेधे शकावली).
कुंजरगडावर विश्रांती व एल्गार ः कांचनबारीचे युद्धविजयानंतर २२ ऑक्टोबर १६७०च्या सुमारास राजे कुंजरगडावर आले. दक्षिणेकडील भीमगडापासून ते उत्तरेकडे त्र्यंबकपर्यंतच्या सुमारे ५०० कि.मी.च्या सह्याद्रीरांगेवर प्रभुत्व मिळविल्यानंतर राजांना आता खुणावत होता खानदेशातील ‘बागलाण’ प्रांत. खरे तर नर्मदेच्या दक्षिणेकडील संपूर्ण ‘दख्खन’ काबीज करण्याचाच त्यांचा मनसुबा होता. तुर्तास राजांनी बागलाणातील डोंगरी किल्ले जिंकण्याकडे व शक्य तेवढ्या समृद्ध मुघली शहरांतून संपत्ती मिळविण्याची रणनीती आखली. कांचनबारीचे युद्धप्रसंगी या प्रांतात मुघल सैन्यसंख्या कमी असल्याचा त्यांना अंदाज आला होताच, याचा फायदा राजांनी घेतला.
इकडे, राजे कुंजरगडावर असल्याचे समजल्यामुळे दाऊद खान नाशिक (गुलशनाबाद) येथे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास थांबून राहिला होता. राजांचे सर्व सैन्य स्वराज्यात गेले, असे समजून १५ नोव्हेंबरच्या सुमारास दाऊद निर्धास्तपणे नाशिकहून आग्नेयेस सुमारे १४० किमी अंतरावरील अहमदनगरकडे निघून गेला. हे समजताच राजांनी देखील आपल्या वेगवान घोडदळाला सीमोल्लंघनाचा आदेश दिला.