डिजिटल संवादांची सुरक्षा (शिवानी खोरगडे)

रविवार, 4 नोव्हेंबर 2018

तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद साधण्यासाठी आणि त्यातलं खासगीपण जपण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती...

तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद साधण्यासाठी आणि त्यातलं खासगीपण जपण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती...

कोट्यवधी लोक आज डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पत्र, तार ही संवादाची माध्यमं केव्हाच मागं पडली आहेत. मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅब या साधनांनी प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या खिशात जागा मिळवली. आज जगात या टेक्‍नॉलॉजीच्या, साधनांच्या माध्यमातून कोट्यवधी लोक एकमेकांशी हजारो मेसेज शेअर करतात; पण आपण पाठवलेल्या मेसेजचं पुढं काय होते, आपण पाठवलेला मेसेज समोरच्यापर्यंत पोचतो म्हणजे काय होतं, मध्ये एखाद्या तिसऱ्याच वापरकर्त्यानं मेसेज पाठवण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणला तर, या गोष्टींबाबत आपल्याला माहिती नसते. इंटरनेटवर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असल्या, तरी त्या सगळ्यांवर नजर ठेवता येते आणि ती ठेवलीही जाते.

बऱ्याच एजन्सीज्‌ आणि संघटना तुमच्या खासगी डेटापर्यंत पोचू शकतात. एखादी अनधिकृत माहिती मिळवण्यासाठीची अनेक उदाहरणं घडली आहेत. अशा प्रकारच्या समस्यांना हाताळण्यासाठी आपण करत असलेलं चॅटिंगही सुरक्षित करणं महत्त्वाचं आहे. यासाठी अनेक ऍप्सचा उपयोग करून आपण आपले मेसेज आपण सुरक्षित करू शकतो. तसंच आपल्या चॅटिंगची सर्व माहिती या ऍप्सच्या साह्यानं आपल्याकडे सुरक्षित संग्रहित ठेवता येतात. या ऍप्सच्या मदतीनं केलेल्या चॅट्‌सना कोणतीही यंत्रणा वा ती टेक्‍नॉलॉजी विकसक असे कुणीही हात लावू शकणार नाहीत, अशी सोय ऍप्सचा वापर करून केलेल्या मेसेज बाबतीत करता येऊ शकते.
एक सुरक्षित संवाद साधण्यासाठी काही ऍप्स जी ऍन्ड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्म्सना सपोर्ट करतात, ती तुम्ही डाऊनलोड करू शकता. ही ऍप्स नक्कीच तुमच्या संवादाला सुरक्षित आणि गोपनीय ठेवतील.

सिग्नल प्रायव्हेट मेसेंजर
सिग्नल प्रायव्हेट मेसेंजर ऍपनं ऍन्ड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी असलेल्या सर्वांत सुरक्षित मेसेज ऍप्समध्ये स्थान मिळवलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचा "मास सर्व्हेलन्स प्रोजेक्‍ट' (वैयक्तिक माहितीवर गदा आणणारा प्रोजेक्‍ट) जगासमोर आणणाऱ्या एडवर्ड स्नोडेन यानंही या ऍपची भलावण केली आहे. आपण एखाद्याशी चॅटद्वारे केलेलं संभाषण हे आपण आणि त्या व्यक्तीपर्यंतच राहावं आणि कुणा तिसऱ्याला ते संभाषण मिळवता येणार नाही, अशा पद्धतीनं या ऍपची रचना केली आहे.
हे ऍप फ्री आणि युजरफ्रेंडली आहे. या ऍपची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे ते मुक्त स्रोत आहे. म्हणूनच ऍपमध्ये काही त्रुटी असल्यास तज्ज्ञ व्यक्तीच्या साह्यानं तुम्हाला त्या त्रुटी दूर करता येतात. व्हॉईस कॉल, ग्रुप चॅट, मीडिया ट्रान्सफर, संग्रह कार्यक्षमता आणि यासाठी कोणत्याही प्रकारचा पिन कोड किंवा इतर लॉग इन परवानगीची गरज नसते.

टेलिग्राम
टेलिग्राम हे ऍप डेटा सेंटरच्या एका नावीन्यपूर्ण नेटवर्कद्वारे जगभरातल्या लोकांना जोडतं. हे ऍप तुमच्या संभाषणाला उत्तम सुरक्षा पोचवतं. ज्याद्वारे समोरच्याशी झालेलं तुमचं संभाषण कधीच कुणीच हाताळू शकत नाही. मुख्य म्हणजे, "सिक्रेट चॅट्‌स' हा ऍपमधील पर्याय ऍक्‍टिव्ह करतो, तेव्हा या पर्यायाद्वारे तुम्ही केलेली चॅट ही तुम्ही कनेक्‍ट असलेल्या सगळ्या डिव्हायसेसमधून आपोआप नष्ट होते. तुम्ही या पर्यायाअंतर्गत हवा तेवढा वेळ सेट करून चॅट नष्ट होतील, अशीही सेटिंग करू शकता.
तसंच, या ऍपद्वारे आपण आपली विविध डिव्हायसेस सहज एकमेकांशी एकाचवेळी जोडू शकतो. चॅटद्वारे शेअर केलेल्या मीडिया फाइल्स, व्हिडिओज्‌, डॉक्‍युमेंट्‌स किंवा एखाद्या विशिष्ट कार्यासाठीचं फोल्डर/प्लॅन या ऍपमध्ये साठवून ठेवण्यासाठी वेगळी सोय असणारं फिचर आहे. हे ऍप कोणत्याही जाहिरातीला परवानगी देत नाही किंवा या ऍपसाठी कोणतीही किंमत मोजावी लागत नाही.

थ्रीमा
थ्रीमा हे ऍप मिलियन डाऊनलोडसह ऍन्ड्रॉइड, आयओएस आणि विंडो फोनसाठी सर्वांत सुरक्षित चॅटिंग ऍप बनलं आहे. हे ऍप "पेड' आहे. जवळपास अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत या ऍपसाठी किंमत मोजावी लागेल. या ऍपमध्ये तुमचं संभाषण सरकारी यंत्रणा, महापालिका यंत्रणा आणि हॅकर्स यांच्यापासून सुरक्षित ठेवणारी अनेक फिचर्स आहेत.
या ऍपवर नोंदणी करताना ते तुमचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर विचारत नाही. त्याऐवजी ऍप तुम्हाला नवीन "थ्रीमा आयडी' देतं. टेक्‍ट संभाषणाशिवाय थ्रीमा हे तुम्हाला व्हॉइस कॉल, ग्रुप चॅट, फाईल्स्‌ आणि स्टेटस मेसेजसाठी तुमचं समोरच्याशी झालेलं शेअरिंग याविषयी संपूर्ण माहिती देतं. तुम्ही समोरच्याला मेसेज पाठवला असेल आणि तो मेसेज समोरच्याला पोचला असेल तर तो नंतर तात्काळ डिलिट होतो.

विकर मी - प्रायवेट मॅसेंजर
"विकर मी' हे गोपनीय संभाषणासाठी ऍन्ड्रॉइड आणि आयओएस फोनसाठी आणखी एक प्रभावी ऍप आहे. प्रगत फिचर वापरून दोघांमधलं संभाषण केवळ दोघांत राहील, हॅक करता येणार नाही, अशी गोपनीयता हे ऍप पाळतं. स्वतः वेळ सेट करून चॅट नष्ट होतील अशी सेटिंग, फोटोज्‌, व्हिडीओज्‌ आणि व्हॉइस मॅसेज तुम्ही समोरच्या "विकर मी' युजरला पाठवू शकता.
ऍपनं "श्रेडर' नावाचं नवीन फिचर सादर केलं आहे. ते आपल्या डिव्हाइसवरचे चॅट्‌स, माहिती समोरच्यापर्यंत पोचले, की ते नष्ट करतं. तुम्ही आपल्या मेसेजसाठी "कालबाह्यता टाइमर' (ठराविक काळानंतर मेसेज डिलिट करणारा) पर्याय सेटदेखील करू शकता. नोंदणी करताना "विकर मी'ला कोणताही फोन नंबर किंवा ई-मेल पत्ता आवश्‍यक नाही आणि तो आपल्या संपर्काशी संबंधित कोणताही मेटाडेटा संग्रहित करत नाही. या सर्व विश्वासार्ह वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, हे ऍप सुरक्षित संभाषण मोकळेपणानं करण्यासाठी उपयुक्त आहे. ते कोणत्याही जाहिराती प्रदर्शित करत नाही.

सायलेंन्स
आपली एसएमएस चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी हे ऍप उपयुक्त आहे. तुमच्या स्मार्ट फोनसाठी मेसेज पाठवणारा आणि ज्याला पाठवला आहे ती व्यक्ती या दोघांतच राहील अशा संभाषणासाठी हे उत्तम ऍप आहे. एक्‍झोलोटल सुरक्षा म्हणजे डिजिटल संभाषण सुरक्षित ठेवणारं सॉफ्टवेअर असलेलं हे ऍप तुमच्यासोबतच तुम्ही करत असलेल्या समोरच्या व्यक्तीच्या संभाषणालाही सुरक्षित ठेवतं. समोरची व्यक्ती हे ऍप वापरत नसली, तरी तुम्ही करत असलेली साधी एसएमएस चॅट सुरक्षित राहतात.
अगदी साध्या एसएमएस ऍप्लिकेशनप्रमाणं हे काम करतं. हे ऍप वापरण्यासाठी कोणताही सर्व्हर किंवा इंटरनेट कनेक्‍शन लागत नाही. हे ऍप विनामूल्य आहे. "सिग्नल' ऍपप्रमाणंच या ऍपमध्येही काही त्रुटी असल्यास तज्ज्ञ व्यक्तीच्या साह्यानं तुम्हाला त्या दूर करता येतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivani khorgade technodost digital security article in saptarang